मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
९३-९४ ची गोष्ट ! ‘आपलं महानगर’मध्ये पत्रकारिता करत होतो. सीएसएमटीच्या बाहेर बसडेपो परिसरात एकजण खडे विकत होता. ग्रहतारेवाले खडे !
लोक घोळका करून होते. तो लोकांना खडा निवडून एका फरशीच्या तुकड्यावर ठेवायला आणि त्यावर हाताचा पंजा उलटा टेकवायला सांगायचा. त्याच्याकडे एका डब्यात सफेद पातळ द्रव होता. तो हाताने तो द्रव गिऱ्हाईकाच्या हातावर सोडायचा.
जर द्रव तसाच सफेद राहिला तर खडा तुमच्या उपयोगी नाही. जर द्रवाचा रंग लाल झाला, तर तो खडा तुम्हाला पूरक आहे. भाग्यवान आहे. फायद्याचा आहे.
गर्दीत काही हायफाय लोक होते. तेही खाली बसून आपल्या भाग्याचा खडा शोधत होते. काही विकतही घेत होते. एवढे हायफाय शिकलेसवरलेले खड्यावर विश्वास ठेवताहेत, म्हणजे नक्कीच हे ‘देशहिताचं’ आहे, असं मत बनवून इतरही लोक खरेदी करत होते. शिकल्यासवरलेल्यांच्या विवेकद्रोहामुळे साधे दगडही मौल्यवान खडे ठरले होते.
मी गर्दीतून त्या चमत्काराचं ‘फॅक्टचेक’ करायचा प्रयत्न करत होतो. मला मागाहून कळलं की गर्दीत, गर्दीसोबत राहून ‘फॅक्टचेक’ होत नाही, त्यासाठी गर्दीपासून थोडं लांब जायला हवं. पण एक गोष्ट निश्चित होती, खडेवाला होता ‘स्मार्ट’ ! गर्दीवर त्याचा पूर्ण प्रभाव होता.
मी आॅफिसला आल्यावर, Bapu Raut च्या कानावर विषय टाकला. तो अंनिसचं काम करत होता.
बापू मला सोबत नेऊन एका मेडिकल स्टोअरमधून जुलाब बंद करण्याची खाकी गोळी घेतली. मग आम्ही पानदुकानात गेलो. तिथून थोडासा चूना त्याने हातावर चोळला आणि त्यावर ती गोळी घासली. रंग लालभडक झाला. मला म्हणाला, उद्या पुन्हा जा आणि नीट बघ !
मी दुसऱ्या दिवशी पुन्हा खडेवाल्याच्या गर्दीत गेलो. पण आता मी गर्दीचा भाग नव्हतो. शांतपणे निरीक्षण केलं. खडेवाल्याच्या हालचाली टिपल्या.
डब्यात चुन्याची निवळी होती. डब्याच्या बाहेरील बाजूने कसलासा लेप काढलेला होता. रंग लाल करायचा असेल, तेव्हा खडेवाला चार बोटं पाण्यात बुडवतावेळी अंगठ्याने बाहेरील लेप घेई. ग्राहकाच्या हातावर पाणी सोडताना तो अंगठा घासून सोडी. आपलं महानगर मध्ये हे सगळं आल्यावर तिथून खडेवाला गायब होता. पण तो किंवा त्याचा वारसा आजही दुसरीकडे कुठेतरी जागा धरून असेल.
पण, एक लक्षात आलं ! खडेवाला स्मार्ट नव्हता, भोवतालची गर्दी मूर्ख, अज्ञानी, धर्मभोळी होती. खडेवाल्याची लबाडी कोणीही पकडू शकलं असतं ; फक्त गर्दीतून थोडं बाहेर येण्याची आवश्यकता होती.
काळ बदलला. गर्दीच्या झुंडी झाल्या. झुंडीपासून अलिप्त राहणारे विवेकी खलनायक ठरले ; कारण, खडेवाला लोकमान्य झाला आणि लबाडी राजमान्य ! लोकांना चुन्याची निवळी आणि लेपाबद्दल सांगितलं की लोक म्हणतात, तुम्ही तुमच्या धर्माचं बघा ! तुमचा नसेल विश्वास तर सोडून द्या ! आमच्या भावना दुखावल्यात तर याद राखा ! आमचा खडेवाला तसा नाही ! अशावेळी मला खडेवाला गुर्मीत माझ्याकडे बघताना आणि छद्मी हसताना दिसतो.
संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मिडिया भारत न्यूज