जळगाव शहराला खड्ड्यांचा संसर्ग

जळगाव शहराला खड्ड्यांचा संसर्ग

जळगाव शहराला खड्ड्यांचा संसर्ग

 

जळगांव मधील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. खूप त्रास, मनस्ताप होतो. खड्ड्यांचा मुद्दा नागरी सुविधांचा राहिलेला नाही. तो जीवघेणा झालाय. अपघात वाढलेत. माणसं मरताहेत. पण महिलांसाठी रोजच्या मरणप्राय वेदना आहेत. रिक्षा, बस किंवा कोणतंही वाहन खड्ड्यात उडालं की जो पोटात धक्का बसतो, तो प्रचंड वेदनादायी असतो. पण इतक्या खोलवर कोण विचार करतं? इतके सारे नगरसेवक, आमदार, खासदार, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते असतानाही लोकांच्या वाट्याला सुस्थितीतले रस्ते असू नयेत, हे खेदजनक तितकंच संतापजनक आहे. आपण सामान्य माणसं यात काय करू शकतो? आपलं ऐकलं जातं का?

वैशाली झाल्टे, सामाजिक कार्यकर्त्या

अभेद्या फाऊंडेशनच्या वैशाली झाल्टे यांनी जळगांव महानगरपालिकेच्या आयुक्तांना शहरातील खड्ड्यांसंदर्भात पत्र पाठवलंय. स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करत त्यांनी आपले सरकारमार्फत आपली कैफियत मांडलीय.

रस्ते दुरूस्तीची निविदा प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होऊन मे अखेरपर्यंत रस्तेदुरूस्तीचे काम पूर्ण झाले पाहिजे होतं. पण आपण सर्व संबंधित लोक संगनमत करून यथायोग्य काळात रस्ते दुरुस्तीची कामे करत नाहीत. जेणेकरून, पाऊस सुरू झाला की खड्डे वाढावेत, लोकांची ओरड वाढावी, असा आरोप वैशाली झाल्टे यांनी केलाय.

पावसाच्या दिवसांतच गणेशोत्सव, नवरात्रौत्सव येणार असतो. त्यामुळे रस्ते दुरूस्तीचं काम तातडीचं आहे, याचा दबाव निर्माण करायला लोकांच्या श्रध्देचा गैरवापर करायला संबंधितांना वाव मिळतो. त्यातून, महापालिका आयुक्तांकडे असलेल्या तातडीच्या अधिकारांचा वापर करून हव्या त्या ठेकेदाराला हव्या त्या चढल्या दराने रस्ते दुरूस्तीचे काम देता येते. सगळ्यांचा खिसाही व्यवस्थित ओला होतो. हेच, निविदा मागवल्यास तुलनात्मक दरात देवाणघेवाणीला वाव राहत नाही. रस्ते दुरूस्तीचे काम ओलाव्यात करून ते टिकू शकत नाही. शिवाय, खड्डे भरण्याची तांत्रिक पध्दत आहे. ती अनुसरली जात नसल्याने पैशाची निव्वळ नासाडी होते, असे नमूद करून वैशाली झाल्टे यांनी रस्ते दुरूस्ती कामातील चर्चित भ्रष्टाचाराकडेही लक्ष वेधले आहे.

वैशाली यांनी महापालिका आयुक्तांना जो उपाय सुचवलाय, तो तात्पुरते खड्डे भरणेकामी होत असलेला महापालिकेचा खर्च वाचवणारा तर आहेच, उलट महापालिकेस या कामासाठी निधी उपलब्ध करून देणारा आहे. शहरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणचे डेबरीज महापालिकेने संबंधितांना विहीत भार आकारून उचलल्यास ते तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याच्या कामी येऊ शकेल, असे वैशाली यांनी सुचवलं आहे. तसेच आतापासूनच रस्ते दुरूस्तीची निविदा मागवून पावसानंतरच योग्य पध्दतीने रस्ते दुरूस्तीची कामे करण्यात यावीत, अशी मागणीही केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!