"अरुणाताई, समस्त समाजाला जागं करण्यासाठी असा लेखन उद्योग वाढवत रहा!”
जेंव्हा जेंव्हा बायको नवऱ्याच्या पाया पडण्यासाठी वाकत असे, तेंव्हा तेंव्हा तिचा नवरा तिला अडवून म्हणायचा, “नवरा बायकोच्या नात्याने जर का बायको नवऱ्याच्या पाया पड़त असेल, तर मीही तुझ्यासमोर तितक्याच वेळा वाकेन बघ !” नवरा बायकोच्या ह्या संवादातून रुढी परंपरांच्या जोखड़ाने लादलेलं श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व झुगारून देण्याची कृतीशील भावना मला फार क्रांतिकारी वाटते ; कारण हे वाक्य २०० वर्षांपूर्वी एखाद्या नवऱ्याने स्वतःच्या बायकोसाठी उच्चारणे अन् तसच वागणे हे समताधिष्टीत सहजीवनाचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणावे लागेल.
आजच्या वर्तमानात स्री पुरुष समानतेच्या गप्पा मारुन, नुसती व्याखाने झोडून घरी जावून स्वतःच्या बायकोला मारझोड करणाऱ्याला जोतिबा सावित्री ह्यांनी हातात हात घेऊन केलेला सहजीवनाचा प्रवास, स्वत:चा संसार त्याग कळनार नाही. हे जाणून घ्यायच असेल तर ‘ज्योतिर्मय सावित्री- एक समताधिष्टीत सहजीवन’ हे पुस्तक आवर्जून वाचलच पाहीजे.
हे पुस्तक नेमकं काय सांगतं आपल्याला. हे सांगतं विचार अन कृतीतलं अंतर कमीत कमी असणारी माणसेच खऱ्या अर्थाने समाजात क्रांती घडवनू आणत असतात. सावित्रीने केवळ स्वत:ला वाचायला यावं म्हणून नाही तर, जोतिबाने स्री शिक्षणाच्या पेट्वलेल्या मशालीला पेटतं ठेवण्यासाठी तत्कालीन उच्चवर्णीयांच्या शिव्या-शाप खावुन, दगड- गोटे झेलून, हल्ले पचवून खांद्याला खांदा लावून जेंव्हा लढते, तेव्हा आजच्या महिलांनी किमान पक्षी आपल्या समोर असलेली अरीष्ठ जरी उलथवून टाकण्याची ठिणगी पेटवली तरी पुरेसं आहे, असं मला वाटत.
मी इयता चौथीला असताना जोतिबा अन सावित्री वाचले. ते माझं पहिलं अवांतर अन् आवडलेलं छोटसं पुस्तक होतं. आज त्यानंतर इतक्या वर्षांनीं अरुणा दिवेगावकर ह्यांचं "ज्योतिर्मय सावित्री- एक समताधिष्टीत सहजीवन" हे पुस्तक आवडलं आहे. बऱ्याच पुस्तकांच्या प्रस्तावना ह्या फक्त पुस्तकांची पाने वाढवण्यासाठी असतात की काय? हा गैरसमज मयूरी सामंत ह्यानी ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या अनुषंगाने दूर केला.
अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहित असताना वर्तमानाचा पदर न सोडता सावित्री जोतिबा ह्यांचं समताधिष्टीत सहजीवन किती महत्वाचं अन् आजच्या पिढीला प्रेरणा देणारं आहे, ह्याची अतिशय उत्तम मांडणी केली आहे.
त्याचसोबत अख्या पुस्तकाचा आशय कवेत घेणारं अन् नजरेत भरणारं अतिशय देखणं मुखपृष्ठ अनिता सावंत देशपांडे ह्यांनी केलं आहे. ह्या पुस्तकाच्या यशात त्यांचाही वाटा खारुताईपेक्षा मोठा आहे.
हरिती प्रकाशनने एक रुपयाही न घेता खऱ्या अर्थाने चांगले विचार प्रकाशात आणण्याचे महत्वाचे कार्य मला, शाळा सुरु करण्यासाठी स्वतःची राहती जागा जोतिबांना देणाऱ्या तात्यासाहेब भिडयांच्याच उदात्त हेतूसारखे वाटते.
एकुणच हे पुस्तक सावित्री ज्योती यांनी एकजीव होउन समाजासाठी कार्य करताना कशी लढत दिली, याचं दर्शन घडवतं. केवळ मूल होत नहीं म्हणून दुसरी बायको करणारा पुरुष मग तो अगदी आजच्या काळातलाही असुद्या, स्वतःच्या बायकोला दुसरा नवरा करुन देतो का हो? नाही ना ? मग पुरुषाने दुसरी बायको का करावी असं म्हणणारा ज्योतिबा मला समाजक्रांतीचा आद्य उद्गाता, प्रणेता व प्रवर्तक वाटतो.

ज्या काळात चार चौघात स्त्रियांना पायात चप्पल घालायची मुभा नव्हती, त्या काळात सावित्रीच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून जोतिबा अंगरक्षक नेमतो ; पण स्त्री शिक्षणाच्या पवित्र कार्यात खंड होऊ देत नाही. धर्मनिष्ठ वडिलांचा अजिबात अनादर न करता केवळ समाजाच्या दबावापायी ज्योतिबा सवित्रीसह घरदार सोडतो, नोकरी करतो , पण स्त्री शिक्षणाचं क्रांतिकारी कार्य मात्र चालूच ठेवतो.
ह्या खडतर प्रवासात सावित्री मात्र कधीच अन् कुठेच खचलेली दिसत नाही. नाराज दिसत नाही. आजच्या काळात जसे केवळ सिनेमाला नेले नहीं म्हणून बायको रुसून बसते असले फ़ालतू हट्ट करत नाही. परंतु केवळ पावलावर पाऊल टाकत चालायचं आहे म्हणूनही ती चालताना दिसत नाही तर तिलाही स्वतःचा एक विचार आहे. तळमळ आहे. आपल्या प्रयत्नाने किमान पुढच्या पिढ्या तरी शकतील म्हणून तिचा आटापिटा दिसून येतो.
लेखिका अरुणाताईनी खुप चांगल्या चांगल्या संदर्भ ग्रंथाचा सुयोग्य वापर करून समाजातल्या सर्वच स्तरातल्या वाचाकांना अगदी सहजपणे समजेल, अशा भाषेत ह्या पुस्तकाचे लेखन केले आहे.
अतिशय सोप्पी भाषा. ज्योतिबा सावित्री ह्यांचा काळ समजून घेताना, त्यावेळची नेमकी सामाजिक अन राजकीय पारतंत्र्य ते त्या धगधगत्या युगाचा अंत इथवरचा सगळा संघर्ष अन् त्यात एकमेकांना लाभलेली मोलाची साथ ही सगळी मांडणी अतिशय सोप्प्या व ओघवत्या शैलीत केली आहे.
हयात जरी नवखेपणाच्या खुणा जाणवत असल्या तरीही पुस्तकाचा विषय मांडताना लेखिका म्हणून अरुणाताई यशस्वी झाल्या आहेत, असे मला खात्रीपूर्वक वाटते.
खरं तर समाजासाठी आपल जीवन पणाला लावणाऱ्या अशा अनेक प्रेरक गोष्टी घेउन त्यांनी असे प्रयोग करत रहावेत. कारण आजच्या मोबाईल स्क्रीनच्या प्रेमातल्या डोळ्यांना फार मोठी जीवन चरित्रे वाचवत नाहीत. त्यासाठी अशा छोट्या छोट्या पुस्तिका आपण लिहून अशी चरित्रे सर्वदूर पोहोचवावीत, असे मला वाटते. कारण अशी चरित्रे वाचूनच आम्ही घडलो अन् अजून पुढचेही घडतील.
जो उद्देश जोतिबाचा होता की फक्त सावित्रीला साक्षर करायचे म्हणून नाही तर तिला एक कार्यकर्ती म्हणून उभी करायची, तोही उद्देश आपण लिहिलेल्या पुस्तकांमधून साध्य होईल. माणसांची डोकी नांगरली जातील. चांगल्या विचारांची पेरणी होइल. सध्याचया अस्वस्थ वर्तमानात त्याची जास्त गरज आहे.
पुढील लेखनासाठी शाश्वत शुभेच्छा....

देवा झिंजाड
नामवंत कवी / 9881235377
-