डाॅक्टरातला मांत्रिक बाबा !!!

डाॅक्टरातला मांत्रिक बाबा !!!

डाॅक्टरातला मांत्रिक बाबा !!!

माणसे किती जरी शिकली तरी त्यांच्यावरचा धर्माचा व त्या मागोमाग येणाऱ्या अंधश्रद्धांचा पगडा समाजात किती खोलवर रुजलाय, त्याचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना पुण्यातून समोर आलीय. भारतातील वैद्यकीय शिक्षणाची लक्तरं या घटनेने काढलीत, असं म्हणायला हरकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या समाजसुधारकांची इथल्या बुद्धीबधीरांना किती आवश्यकता आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. चुकीचे केलेले उपचार अंगलट येऊ नयेत म्हणून पुण्यातील एका अनुभवी डॉक्टरने तंत्र मंत्राचा आधार घेतला व आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या महिला रुग्णावर मांत्रिकाला बोलावून चक्क अंगाराधुपारा उतरवला.

पुण्यातील स्वारगेट परिसरात चव्हाण नर्सिंग होम हे डॉ. सतीश चव्हाणांचं नामांकित हॉस्पिटल आहे. तीन महिन्यापूर्वी त्यांनी संध्या सोनावणे यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. संध्या यांना स्तनाचा आजार झाला होता. मात्र नंतर तिथली जखम चिघळली. त्यात पु झाला. त्यामुळे पुन्हा त्या युवतीवर उपचार करायचे होते. पुन्हा शस्त्रक्रिया झाली, पण रक्तस्त्राव वाढला आणि डॉक्टरांचे धाबे दणाणले. मग त्यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं. तिथेही फरक पडेना, म्हणून मांत्रिकाला बोलावून उतारा काढण्याचा तथाकथित उपचार केला. अखेर संध्या सोनावणे दगावलीच.

अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या संध्या सोनावणेचा भाऊ महेश जगताप याने पोलिसांना जबाब दिलाय की डिसेंबर, २०१७ मध्ये जेव्हा डाॅ. चव्हाणांना आॅपरेशन करायचं होतं, तेव्हा त्यांनी हाॅस्पिटलमध्ये आल्या आल्या संध्याच्या कुटुंबियांना सांगितलं होतं की मी आताच पंचांग पाहून आलोय. सकाळी ७ ते ८ या वेळेत यमाची घंटा आहे. आपण आॅपरेशन ९ नंतर करू. मग त्यांनी ९ ते ११ वाजेपर्यंत आॅपरेशन केले. आॅपरेशन झाल्यावर संध्या बरी होण्याकरिता मंत्रपठन करायला सांगितले होते.

संध्या सोनावणेवर तिसरं आॅपरेशन २० फेब्रुवारी २०१८ रोजी डाॅ. सतिश चव्हाणांच्या हाॅस्पिटलात झालं. पण तिला मोठा रक्तस्त्राव होऊ लागला, मग डाॅ. चव्हाणांच्याच सल्ल्याने संध्याला दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात हलवण्यात आलं. तिथल्या डाॅक्टरांनी सांगितलं होतं की तिची प्रकृती गंभीर आहे. सात आठ दिवस ती बेशुद्धावस्थेतच होती. डाॅ. समीर जोग यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. हळुहळू तिच्या तब्येतीत सुधारणा होत होती. दरम्यानच्या काळात डाॅ. चव्हाणसुध्दा तिला पाहायला येत. एकदा त्यांनी संध्याचं जन्मनाव, जन्मगाव, तारीख, वेळ, कुंडली याबाबत विचारलं. डाॅक्टर म्हणाले की त्यांच्या एक ओळखीचा मांत्रिक आहे, तो पेशंट किती दिवसात बरा होऊ शकतो, हे सांगतो!!!!

नेहमी फेरी मारणारे डाॅक्टर चव्हाण एकदोन दिवस आले नाहीत, म्हणून संध्याच्या कुटुंबियांनी संपर्क केला असता, मी संध्या बरी व्हावी, म्हणून देवाजवळ प्रार्थना करतोय, असं चव्हाणांनी सांगितलं.

एक दिवस अचानक ते एका मांत्रिकाला सोबत घेऊन आले व आयसीयुत उपचाराखाली असलेल्या संध्यावर उतारा काढला. संध्याच्या मावशीने त्याचं मोबाईलमध्ये शुटींग केलं.

सदरची क्लिप सार्वजनिकरीत्या प्रसारित होऊ नये, म्हणून डॉक्टर सतीश चव्हाण यांनी राजकीय दबावतंत्रही वापरून पाहिले. संध्याचा भाऊ त्यामुळे पोलिसात जायला कचरत होता, पण उपयोग झाला नाही. अंनिस च्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी सरळ पोलिसात तक्रार अर्ज दिला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हस्तक्षेप केल्यावर त्याला धीर आला आणि अलंकार पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यातील कलम ३ नुसार डॉक्टर चव्हाण, संबंधित मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात संध्याचा भाऊ महेश जगताप याने कायद्याने वागा ला सांगितले की असल्या मंत्रतंत्राच्या उपचारावर आमचा विश्वास नाही, त्यांच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला खटकायच्या. पण संध्यावरील वैद्यकीय उपचार डाॅ. चव्हाणांकडेच सुरू असल्याने आम्ही गप्प बसलो.

पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी गुन्हा दाखल झाल्याला दुजोरा दिला, पण डाॅक्टरांना अटक कधी करणार, या प्रश्नावर त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत अटकेची आवश्यकता नसल्याचे सांगितले. जिथे कसलीही रिकवरी नाही व आरोपी तपासात सहकार्याला तयार असेल, तिथे त्यांना नोटीस बजावून जबाबाला व चौकशीला बोलावले जाऊ शकते, असे साळुंखे यांनी सांगितले.

– राज असरोंडकर

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!