प्रा. गंगाधर पाटील यांच्या अभ्यासाच्या दिशेनं मराठी समीक्षेची वाटचाल आवश्यक !

प्रा. गंगाधर पाटील यांच्या अभ्यासाच्या दिशेनं मराठी समीक्षेची वाटचाल आवश्यक !

प्रा. गंगाधर पाटील यांच्या अभ्यासाच्या दिशेनं मराठी समीक्षेची वाटचाल आवश्यक !

प्रा. गंगाधर पाटील(६ एप्रिल १९३१) यांच्या संबंधी कोणी लिहिल्याचं माझ्या स्मरणात नाही. ‘मातीची चूल’ या आनंद साधले यांच्या, ‘धुळाक्षरापासून मूळाक्षरांपर्यंत अर्थात माझे विद्याजीवन’ या डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या आणि ‘लांबा उगवे आगरी’या म. सु. पाटील आणि ‘खार जमिनीतील रोप’ या मधुकर पाटील यांच्या आत्मचरित्रात काही उल्लेख असेल तेवढाच.

प्रा. पाटील हे पोयनाड-बांधण-शहापूर या पंचक्रोशीतील गावातून आलेले. १९४० च्या दरम्यान इथल्या समस्त पाटील मंडळींनी शिक्षणक्षेत्रात काम करायचा जणू चंग बांधला होता. तेव्हा त्यांच्यापैकी अनेक तरुण प्राथमिक नाहीतर माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक झाले.

गंगाधर, म. सु. आणि एम. पी. पाटील यांनी मुंबई गाठली आणि प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. सुदैवानं‌ पुढे ते प्राध्यापक झाले. या मंडळीचं वैशिष्ट्य असं राहिलं की अध्यापनाबरोबरच आयुष्यभर वाचन-व्यासंग आणि लेखन हे त्यांनी आपलं जीवित कार्य मानलं आणि आपण स्वीकारलेल्या विषयावर आपली मोहर उमटविण्याचं कार्य त्यांनी केलं.
प्रा. पाटील के. सी. काॅलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. १९८२ साली ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून रुजू झाले. १९८९ मध्ये ते तिथून निवृत्त झाले.

१९६५ च्या काहीसं आधी मर्ढेकरांपासून मराठी समीक्षेत सौंदर्यविचार या विषयाचा खल होऊ लागला होता आणि त्या अनुषंगाने पाश्चात्त्य समीक्षासिद्धांत आणि त्यांची मूलभूत मांडणी करणारे सोस्यूरपासूनचे विचारवंत यांच्यासंबंधीची चर्चा होऊ लागली होती. सुरेंद्र बारलिंगे, रा. भा. पाटणकर, प्रभाकर पाध्ये, भा. ज. कविमंडण, शरचंद्र मुक्तिबोध, चंद्रशेखर जहागीरदार हे विद्वान आणि सत्यकथा मासिक यात विशेषत्वानं चर्चा झडत असत.

यापूर्वी वि. ह., वा. ल., व. दि., द. भि. वगैरे कुलकर्णी, श्री. के. क्षीरसागर, दि. के. बेडेकर यांचे समीक्षालेखन काहीसं मागं पडलं होतं. समीक्षेत आता नवा जमाना आला होता. तरीही संस्कृत काव्यशास्त्रापासून‌ प्रेरणा घेऊन लेखन करणारे, विविध सामाजिकशास्त्रांतील विचारव्यूह लक्षात घेऊन लिहिणारे, साहित्यकृतींचा आस्वादक अंगानं विवेचन करणारे असे समीक्षक इथं‌ निर्माण झाले होते. तथापि तुलनेनं वरचष्मा राहिला तो नवसमीक्षेचा.

कार्ल मार्क्स, फ्राॅईड, युंग, ॲडलर, एलिस, रोलाॅ बार्थ, इगलटन, सार्त्र, काम्यू, ब्रेख्त यांच्या लेखनाचे सातत्यानं संदर्भ देऊन चर्चासत्र गाजवणारा आणि त्याची लेखनातून मांडणी करणारा समीक्षकांचा एक वर्ग निर्माण झाला. त्यांच्या बोलण्यानं आणि लेखनानं विलक्षण दबदबा निर्माण झाला. इतर समीक्षकांचं लेखन तुलनेनं फिकं तर या समीक्षकांचं लेखन पथदर्शी वाटू लागलं.

प्रा. पाटील यांच्या हे सारं लक्षात आलं होतं. केसी काॅलेजात त्यांची व्याख्यानं लवकर आटपत. मग ते तिथून जवळ असलेल्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात बसू लागले. नवसमीक्षा आपण समजावून घेतली पाहिजे, तिचा तलस्पर्शी अभ्यास करायला हवा असा त्यांच्या मनानं ध्यास घेतला.
मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररीत या विषयावरील असंख्य नवनवीन पुस्तकं आलेली असत. प्रा. पाटील तिथं बसून त्यांचा अभ्यास करू लागले.

एक पुस्तक घेतलं की त्या शेवटी संदर्भग्रंथसूची असे. तिच्या आधारानं मग ते अन्य उपयुक्त ग्रंथ मिळवू लागले आणि त्यांनी आपला अभ्यास वाढवला.

त्यामुळं त्यांनी काही गोष्टी साधल्या. पहिली म्हणजे त्याविषयाच्या संबंधात त्यांनी इथल्या कोणत्याच व्यक्तीचं मार्गदर्शन न‌ घेता स्वत:च स्वत:चा मार्ग धुंडाळला. दुसरी म्हणजे त्यांनी इंग्रजी भाषेच्या द्वारे उपलब्ध झालेल्या ग्रंथांच्या आधाराने अभ्यास केला. त्यात अनेक ज्ञानशाखांशी त्यांचा संबंध आला आणि सर्वच ज्ञानशाखा आपल्याला मुळाशी जाऊनच अभ्यासायला हव्यात ही त्यांची वृत्ती राहिली. मग त्या त्या ज्ञानशाखेतील सैद्धांतिक व्यूहांसंबंधी वस्तुनिष्ठ आकलन मराठीत मांडायला हवे या विचारातून त्यांनी तशी मांडणी केली.

इतकं झाल्यावर आता हे व्यूह आपल्याला आपल्या मराठीतील साहित्यकृतींना लावून दाखवायला हवेत असं त्यांना वाटलं. ते करीत असताना एखादा विचारव्यूह जसाच्या तसा घेऊन आपल्या साहित्यकृतींना लावता येत नाही हे त्यांना जाणवलं आणि त्यातून त्यांनी योग्य ते पर्यायही स्वीकारले.

दरम्यानच्या काळात धुळ्याहून ‘अनुष्टुभ’ नावाचं वाड्मयीन नियतकालिक सुरू झालं. त्यामधून त्यांनी ‘रेखेची वाहणी’ सदरातून ते आपलं लेखन प्रकाशित करू लागले.
मराठी साहित्यविश्वात एक आधुनिक समीक्षेचा अद्यवयावत अभ्यास असणारा समीक्षक म्हणून प्रा. पाटील यांच्याकडे आणि त्यांच्या लेखनाकडे पाहाण्यात येऊ लागले.
त्यांचे ‘अनुष्टुभ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचा बोलबाला झाला होताच. त्यातून मग त्यांनी ‘समीक्षेची नवी रूपे’ हा लेखसंग्रह सिद्ध‌ केला.

“साहित्यकृती ही अनेकविध अंगांनी व रचनांनी संघटित झालेली एक बहुस्तरीय बहुजिनसी समष्टी असते.
साहित्यकृतीच्या या अनेआंगी व व्यामिश्र समष्टिरूपाचे अर्थग्रहण, सौंदर्यग्रहण, व मूल्यमापन एकाच प्रकारच्या वाड्मयीन दृष्टीतून व समीक्षापद्धतीतून केले, तर पुष्कळदा तिची समीक्षा व अभ्यास ही एकांगी होण्याची शक्यता असते. म्हणून तिच्या समग्ररूपाचे अर्थग्रहण, सौंदर्यग्रहण, व समीक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या वाड्मयदृष्टिकोणांची, जीवनदृष्टीची व समीक्षापद्धतींची उचित जाण असणे आवश्यक असते.

आज पाश्चात्त्य, युरोपीय सौंदर्यमीमांसेच्या विश्वात घटितार्थशास्त्रीय, अस्तित्ववादी, संरचनावादी, नवमार्क्सवादी, आदिबंधात्मक इत्यादी सौंदर्यविचाराचे व समीक्षेचे नवे प्रवाह प्रवर्तित झाले आहेत. प्रा. गंगाधर पाटील यांनी या नवीन सौंदर्यविचाराच्या व समीक्षेच्या दृष्टीतून साहित्यविषयक प्रश्नांचा विचार प्रस्तुत पुस्तकात केला आहे. ही ‘समीक्षेची नवी रूपे’ मराठी साहित्य समीक्षेत प्रथमच येत आहेत, असे या पुस्तकातील लेखनाविषयी म्हटले गेले आहे.

१९८२ साली एक सुखद घटना घडली. ‘मुंबई विद्यापीठा’च्या मराठी विभागात त्यांची प्रपाठक म्हणून नेमणूक झाली आणि समीक्षा हा पेपर त्यांना शिकवायला मिळाला. त्याचा असा परिणाम झाला की १९८२ ते १९९८पर्यंत तिथं एम. ए. झालेल्या विद्यार्थ्यांची तोंड ओळख नवसमीक्षेशी झाली. याचा परिणाम असा होई की आता ‘प्रा. गंगाधर पाटील स्कूल’ तयार होईल असे वाटू लागले. प्रा. पाटील ह्यांचे विद्यार्थीही तसे हुशार होते.

पण जी जिद्द, ऊर्जा आणि चिवट ज्ञानजिज्ञासा या गोष्टी प्रा. पाटील यांच्याकडे होत्या त्या त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये फारशा नसाव्यात.

प्रा. पाटील यांच्यानंतर म. सु. पाटील यांनी त्या विषयात आपला अभ्यास वाढवला, अन्यही काही त्या विषयात लिहिते झाले. पण त्यांच्या लेखनाविषयी प्रा. पाटील माझ्यापाशी असमाधानच व्यक्त करीत.

याच काळात त्यांना दोन‌ आघात सहन करावे लागले.
त्यांच्या पत्नीचं निधन आणि स्वत: प्रा. पाटील यांचं‌ आजारपण. डॉक्टरांनी त्यांना त्यांचे सारे व्याप आणि ताण सोडायला सांगितले आणि फक्त संगीत ऐकण्याची शिफारस केली. पाटील यांनी ते मानले. त्याचं लेखन मंदावलं.

या दरम्यान पाटील यांच्या विद्यार्थ्यांचा एक गट असा होता की त्यांच्या हातून‌ नवं‌ लेखन तर मिळू शकत नाही तर एम. ए. च्या वर्गात त्यांनी दिलेल्या नोट्स तरी आपण प्रसिद्ध करू या या विचाराने कार्यरत झाला. पुढे त्यांचा उत्साह मावळला. ज्यांच्यापाशी होता, त्यांनी ते संकलन प्रा. पाटील यांना दाखवलं. त्यांनी ते प्रसिद्ध करायला संमती दिली नाही.

प्रा. पाटील हे काही वेळा अमेरिकेत आपल्या मुलीकडं जातात. तेव्हा ते जवळच्या लायब्ररीमध्ये तासंतास बसून वाचन करीत असतात. ज्ञानसंग्रह करणंं हे त्यांनी सातत्यानं केलं आहे..

अलिकडच्या काळात त्यांचे ‘समीक्षामीमांसा’ हे पुस्तक मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्यातील प्रकरणांची रचना त्यांनी पुढीलप्रमाणे केली आहे-

साहित्यसमीक्षेचे स्वरूप, साहित्यकृतीचे स्वरूप, साहित्यकृतीचे वाचन, आकलन,‌ साहित्यकृतीचे विश्लेषण, साहित्यकृतीचे अर्थनिर्णयन, साहित्यिक अर्थनिर्णयन मीमांसा, साहित्याची महानता, आशयसूत्रमीमांसा, अस्तित्ववाद, चिन्हमीमांसा, कथनमीमांसा, रूपवादी समीक्षा, सौंदर्यभावना, मराठी समीक्षेतील ग्रह आणि पूर्वग्रह, रशियन रूपवाद, मानसशास्त्रीय समीक्षा, आदिबंध आणि आदिबंदात्मक समीक्षा, साहित्यिक संज्ञामीमांसा, साहित्येतिहास, सौंदर्य आणि आनंद, वाचक प्रतिसादमुखी सिद्धांत, संरचनावाद, उत्तर-संरचनावाद, विरचनावाद, साहित्यिक ज्ञानक्षमता, स्त्रीवादी समीक्षा.

प्रा. गंगाधर पाटील यांच्या या अभ्यासाच्या दिशेनं मराठी समीक्षेनं‌ वाटचाल करणं अगत्याचं आहे, असं राहून राहून वाटतं.

 

 

 

 

अनंत देशमुख

साहित्य संशोधन, समीक्षा आणि चरित्रात्मक लेखन या प्रकारांत लेखक-संशोधक-समीक्षक म्हणून नावलौकीक
संपर्क : ८६८९९७८७४४

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!