मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार !

मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार !

मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार !

इलाही जमादार हे मराठी गज़लेच्या क्षेत्रात मानदंड मानले जातात. मराठीचे प्रसिद्ध गजलकार इलाही जमादार यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त आज, १ मार्च रोजी नांदेड येथे सत्कार करण्यात आला होता. त्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी लिहिलेला लेख. १ मार्च २०१४ रोजी तो महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आला होता.

इलाही जमादार यांच्याशी माझी ओळख आहे म्हटल्यावर अनेकजण मी थापा मारतोय अशा नजरेने माझ्याकडे पहायला लागतात. मी एक छोटासा कार्यकर्ता. म्हटलं तर पत्रकार. अंबाजोगाईसारख्या तालुक्याच्या गावात राहणारा. इलाही पुण्यात राहतात. ते उत्तुंग गजलकार. सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. सुरेश भटांना जवळून पाहण्याची संधी मिळाली नाही. पण इलाहींशी ओळख झाली. योगायोगाने झाली. पण लोक शंका तर घेणारच.

ज्यांचे शेर ठिकठिकाणी संदर्भासाठी वापरले जातात. गज़लेच्या तंत्राचा आणि शास्त्राचा जेव्हा विषय निघतो तेव्हा ज्याच्या रचना प्रमाण मानल्या जातात, ज्याच्या ओळी लोक फलकावर मिरवतात. पत्रिकांमध्ये छापतात. अशा दिग्गज कवीशी माझ्या सारख्या कवितेचा ‘क’ देखील समजत नसलेल्याची ओळख कशी काय असेल, अशी शंका येणे स्वाभाविक आहे.

या प्रतिभासंपन्न कवीची ओळख करून देण्याचे श्रेय शशीकांत डोंगरे यांना जाते. शशी आज आपल्यात नाही. अत्यंत संवेदनशील माणूस. माणसांचे मधुकण गोळा करणारा. प्रतिभासंपन्न चित्रकार. कॅन्व्हासवर रंगात रंग आणि रेषांत रेषा मिसळण्याची कला करणारे अनेक असतात. शशीकांत ती माणसांवरही वापरायचा. त्यानेच माझा आणि इलाहीचा रंग मिसळला. याला हवे तर कॉन्ट्रॅस्ट म्हणा! एका अपघातात त्याचे निधन झाले. अचानक उमेदीच्या काळात निघून गेला.

शशीकांत डोंगरे सर अंबाजोगाईच्या अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक होते. सेवादल, आंतरभारतीशी त्यांची नाळ जुळलेली. तिकडून ते माझे सगोत्र होते. लातूरचे महारुद्र मंगनाळे, दीपरत्न निलंगेकर आदींनी मिळून लातूरला कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा पहिल्यांदा इलाही जमादारांची मैफल ऐकली. रात्री गप्पा मारल्या. त्या दिवशी जो धागा जुळला तो कधी तुटला नाही. कधी विरला नाही. तो स्नेह वाढतच गेला. भाषा, गज़ल, माणसे, समाज, काय काय म्हणून सांगू. असंख्य विषयांवर आम्ही बोलत राहिलो. अजून बोलणे संपलेले नाही. प्रवास चालूच आहे.

अमरावतीच्या ट्रॅव्हल्सच्या स्टॉपवर अंबाजोगाईला जाणाऱ्या गाडीची वाट पाहात बसलो होतो. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. माझ्या सोबत संजयभाऊ वानखडे होते. बोलताना कशावरून तरी इलाहींचा विषय निघाला. तेवढयात एक मुलगी ट्रॅव्हल्सच्या काऊंटरवर चौकशी करायला आली. तिने चौकशी केली. चौकशी करून झाली तरी तेथेच थबकली. आमचे बोलणे ऐकू लागली.

मला वाटले ती संजयभाऊंना ओळखत असावी. पण विचारावे कसे? संजयभाऊंना वाटले, ती माझ्या ओळखीची असेल. तेही संभ्रमात. शेवटी तीच पुढे आली. म्हणाली, ‘तुमची इलाही सरांची ओळख आहे का?’ आम्ही काही उत्तर देण्याआधी ती म्हणाली, ‘माझी ओळख आहे. मला त्यांच्या गजला खूप आवडतात. तुम्ही त्यावर बोलत होता म्हणून मी ऐकत होते. ‘तेवढयात तिची गाडी आली अन् ती भुरकन निघून गेली. कोण होती ती?

मी तेवढया रात्री इलाही सरांना फोन लावला. ‘आहो, या वेळी, या स्थळी आम्हाला तुमचे चाहते त्रास देतात. मग इतक्या रात्री आम्ही तुम्हाला का त्रास देऊ नये?’ फोनवर बोलतानाही मला लक्षात आले की इलाही सर खास त्यांच्या शैलीत हसत आहेत.

या माणसाचे हसणे विशेष आहे. असे हसणे सर्वांना जमत नाही. मनातून हसतात. त्यात संकोच आणि आनंदाची सरमिसळ होऊन नवेच रसायन तयार होते. आम्ही फोन ठेवल्यानंतर बहुदा त्या मुलीचा त्याना फोन गेला असणार आणि इलाहींनी त्यांच्या स्वभावानुसार माझे कौतुक करीत तिला सांगितले असणार की तू ज्या माणसाशी बोलली तो अमुक अमुक आणि ढमुक ढमुक होता.

ही घटना घडून काही वर्षे लोटली असतील. मी राजुरा (चंद्रपूर) येथे महिला संमेलनाच्या उद्धाटनाला गेलो होतो. त्यानंतरच्या परिसंवादाचा मी अध्यक्ष होतो. तीन वक्ते छान बोलले. त्यातली एक मुलगी खूपच छान बोलली. मुद्देसूद आणि प्रभावी. परिसंवाद संपताना इलाही सरांचा फोन आला. मी मोठेपण मिरविण्यासाठी, इलाही जमादारांचा फोन आहे असे म्हणत बाजूला झालो. परंतु फोन कटला. नंतर लागेना.

ती मुलगी माझ्याकडे पहात होती. म्हणाली, ‘सर मी लावून देऊ का?’ तिने उत्तराची वाट न पाहता फोन लावला. बोलली. फोन मला दिला. इलाही म्हणाले, ‘जिच्या फोनवरून तुम्ही बोलता आहात तीच ती मुलगी आहे जी तुम्हाला अमरावतीच्या स्टॉपवर भेटली होती. ‘इलाहीचे फॅन कुठे भेटतील याचा नेम नाही. कोल्हापूर सांगली असो, चंद्रपूर नागपूर असो की नांदेड लातूर अंबाजोगाई…

कविता माणसाला किती समृद्ध करते याची दुसरी साक्ष कशाला हवी? प्रत्येक चाहत्याची अशी एक वेगळी कहानी आहे. कविता हा भावनेचा प्रांत आहे हे खरे परंतु विचारांचे अधिष्ठान मिळालेली कविता सिंहासनावर विराजमान होते हे इलाहींच्या कवितेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भावनांचा साज (संगीत) बाहेर पडायला विचारांचे सामान (वाद्य) लागते. वाद्य नीट नसेल तर त्यातून चांगले संगीत बाहेर कसे पडेल? म्हणूनच इलाही सरांची कोणतीही रचना पाहा. ती आशयगर्भच असते.

शब्दांचा खेळ करून पत्त्याचे महाल बांधता येतात. पण ते वादळात कोसळतात. इलाहींची कविता मात्र तग धरून उभी राहते कारण तिचा पाया मजबूत आहे. तो त्यांच्या वैचारिक चिंतनातून निर्माण झाला आहे.

आकाशाला भास म्हणालो चुकले का हो,
धरतीला इतिहास म्हणालो, चुकले का हो…

ही एक कविता हा कवी किती विचार करतो हे समजून घ्यायला पुरेशी आहे.

विचारांची परिपक्वता केवळ वाचनातून येत नाही. त्यासाठी तसे जगावे लागते. जगता जगता जीवन समजावून घ्यावे लागते. तवा नीट तापलेला असला तरच त्यावर पोळी चांगली भाजली जाते. त्याप्रमाणे जीवन खडतर असेल व जीवन समजावून घेण्याची दृष्टी तेवढी तिक्ष्णअसेल तर दुसऱ्या कोण्या शिक्षकाची गरज उरत नाही. इलाहींनी जीवनावर भरभरून प्रेम केले आहे. ओतप्रोत जगण्याचे धाडस केले. त्यांच्या कवितेचे सगळे सामार्थ्य त्यांनी जे जीवन अनुभवले त्यातून निर्माण झाले आहे. त्यांनी त्यावर केलेले चिंतन त्यांच्या प्रत्येक कवितेतून व्यक्त होते.

अलीकडे ते दोहे लिहितात. प्रत्येक दोह्यातून ते एक विचार सांगतात. ‘कवींना काय कळते?’ असे म्हणणाऱ्यांनी इलाहींच्या कविता एकदा जरूर पाहून घ्याव्यात.

मी फार कवी पाहिलेले नाहीत परंतु इलाही जमादारसारखा कवी दुर्मिळ असतो हे कोणीही मान्य करेल. दुर्देवाने इलाही सरांचा उमेदीचा काळ अशा काळात गेला, ज्या काळात सुमारांचीच चलती होती. हिऱ्यांची संख्या कमी असते. त्याचे पारखीही कमीच असतात. पारखी नसले म्हणून कदाचित हिरा बाजूला पडेल परंतु त्याचे तेज त्यामुळे कमी होत नाही.

कवी इक्बाल म्हणतात,
हजारो साल नर्गिस अपनी बेनूरी पे रोती है…
बडी मुश्किल से होता है दीदावर पैदा…

गुणवत्तेची कदर करण्याचा काळ आला तर अशा प्रतिभावंतांना समाज डोक्यावर घेऊन नाचेल. कारण खरे प्रतिभावंत समाजाला जे देतात ते दुसरे कोणालाही देता येत नाही.

आज साऱ्या महाराष्ट्रात त्यांचे चाहते दिसू लागले आहेत. हा महान कवी पुण्यात एका आऊट हाऊसच्या छोटया खोलीत राहतो. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसते. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असतो. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठे आहे. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली आहे.

इलाही सरांचे मन मोठे असल्यामुळेच माझ्यासारख्यालाही त्यांच्याकडे प्रवेश मिळाला. जागा मिळाली. इलाहींशी माझी ओळख आहे, म्हटल्यावर ज्यांचा विश्वास बसत नाही, खरे तर त्यांचीच इलाहींशी ओळख नसते किंवा त्यांनी इलाहींना ओळखलेले नसते. मी मात्र अभिमानाने सांगू शकतो, इलाही जमादारांशी माझीही ओळख आहे.

( सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स, १ मार्च २०१४ )

 

अमर हबीब

ई मेल- habib.amar@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!