मुंबईत तुषार वारंग वाढायला हवेत !!!

मुंबईत तुषार वारंग वाढायला हवेत !!!

मुंबईत तुषार वारंग वाढायला हवेत !!!

तुषार वारंग हा मुंबईतला युवक सद्या मुंबई महानगरपालिकेला भिडलाय. ट्वीटरवर नियमितपणे तो आपल्या राहत्या परिसरातील छोटे-मोठे प्रश्न महानगरपालिकेच्या निदर्शनास आणतोय. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेकडूनही त्याला काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे तुषारचाही हुरूप वाढलाय. तो दादर, महालक्ष्मी, वरळी भागातले नागरी प्रश्न डेली चॅलेंज या शीर्षकाखाली अथकपणे मांडतोय.

मुंबईतील निर्मला निकेतनमधून तुषारने समाजसेवेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं, तर तुषार इन बुईल्ट समाजसेवी आहे. समोर समस्या दिसली की तो अस्वस्थ होतो. हातातला स्मार्टफोन मग कामाला लागतो. समस्या टिपली जाते. आजुबाजुला थोडीफार चौकशी करून माहिती संकलन होतं आणि त्यानंतर ती समस्या मुंबई महानगरपालिकेच्या ट्वीटर हॅन्डलवर पोस्ट होते.

तुषार तसा आधीपासूनच टीम परिवर्तन, अंघोळीची गोळी, एकलव्य-गाव तिथे ग्रंथालय अशा उपक्रमात कार्यरत होताच. खिळेमुक्त झाड उपक्रमात त्याचा सक्रीय सहभाग असतो. पण नागरी समस्यांचं निवारण कसं होतं, याबाबत तो अनभिज्ञ होता.

मूळात आपलं ऐकलं जातं का, आपण कोणती तक्रार कुठे करायची, भाषा कशी वापरायची, तक्रारीचा अनेक टप्प्यात पाठपुरावा कसा करायचा, प्रशासनाशी संवाद कसा ठेवायचा, तक्रार तडीस कशी न्यायची, हे मला कायद्याने वागा लोकचळवळीत शिकायला मिळालं, असं तुषार सांगतो.

 

तुषार ने मुंबईतील बंद सिग्नल्सच्या तक्रारी केल्यात. स्कायवाॅकच्या बंद सरकत्या जिन्याबाबत त्याने आवाज उठवलाय. फुटपाथ अडवून बसलेले फेरीवाले, फुटपाथवरच्या उखडलेल्या टाईल्स, ढिले पडलेले अपघाती पेवर ब्लाॅक्स, रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या कचरापेट्या, रेल्वे पुलावरील गायब झालेले बाक अशा समस्या रोजच्या रोज मांडून तुषार यंत्रणांना भंडावून सोडतो.

आपलं काम आहे, खटकलेल्या गोष्टींविरोधात आवाज उठवणं, त्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोचवणं. एक नागरिक म्हणून हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपल्या तक्रारींवर समस्यांचं निवारण झालंच पाहिजे, हा हट्ट आपल्यालाच मनस्ताप देतो, पुढे जाऊन निराश करतो. वास्तविक, लोकशाहीत यंत्रणांना बहुमताची भाषा कळते. त्यामुळे आपली तक्रार वैयक्तिक न राहता, ती लोकचळवळ होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून यंत्रणांवर वेगाने दबाव येऊ शकतो. तक्रारीला पाठबळ नाही मिळालं, तरी शांतपणे संयमाने संबंधितांना स्मरण करत राहणं जमलं पाहिजे. पूर्वी तक्रार पत्रव्यवहारात असायची. आता समाजमाध्यमांमुळे ती चव्हाट्यावर येते. त्यामुळे यंत्रणांवर दबाव निर्माण होऊन लवकर दखल घेतली जाते. इतरांनी दिलेल्या प्रतिक्रिया, प्रतिसाद हे एकप्रकारचं पाठबळच ठरतं. ते लक्षात घेऊन संसाधनांचा परिणामकारक वापर करण्याचं कौशल्य शिकलं पाहिजे. कायद्याने वागा लोकचळवळ ते शिकवते, असं तुषार सांगतो.

राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था बिघडवलीय. कधी सत्तेच्या दबावाने तर कधी धाकदपटशाने प्रश्न सोडवले जातात. व्यवस्थेला तीच सवय लागते. उत्स्फुर्तता संपुष्टात येते आणि बोभाटा होईस्तोवर यंत्रणाही ढिम्म राहतात. अशा वेळी सर्वसामान्य नागरिक, ज्यांच्याकडे राजकीय दबावाचे, दादागिरीचे पर्याय नसतात, त्यांची कोंडी होते. त्यांचे हाल होतात.

कायद्याने वागा लोकचळवळीचं ब्रीदवाक्य आहे, अव्यवस्थेला व्यवस्थित उत्तर. व्यवस्थेची बिघडलेली घडी आधी निस्तारावी लागेल. त्यासाठी समाजाला गरज आहे, सकारात्मकरित्या काम करणार्या संयमी कार्यकर्त्यांची, म्हणूनच देशात खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणायचं असेल, तर संविधानिक मार्गांचा अवलंब आणि आधुनिक संसाधनांचा वापर करणारं लोकप्रबोधन वाढायला हवं. त्यासाठी तुषार वारंगसारख्या युवकांची संख्या वाढायला हवी.

MediaBharatNews

Related Posts
comments
 • Please spread this movements among the people.
  It’s time to take seminars on citizens unsolved problems.

 • Please spread this movements among the people.
  It’s time to placed seminars on public unsolved problems, issues.

 • ज्या व्यक्तीला आपल्या परिसरात, आजूबाजूला असलेल्या समस्या भेडसावत असतील त्यांनी वारंग यांच्यासारखेच जागरूक असले पाहिजे, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा, आपल्या वार्डातील वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी तक्रार करत राहावे.
  आपल्या भागात वीज गेली असेल, ट्रॅफिक जाम झाली असेल, अतिक्रमण, रहदारी, रस्त्यांवरील खड्डे अशा काहीही समस्या असू द्या! व्यक्त व्हायला शिकले पाहिजे, सर्व महत्वाचे नंबर आपल्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवा. आपल्याला काय करायचे आहे? मरू दे ना? आपल्या एकट्याला त्रास होतो का? ह्याच आपल्या मानसिकतेचा फायदा लोकप्रतीनिधीं आणि प्रशासन उचलते आणि आपल्या समस्या जैसे थे राहतात. स्वतःला सवय लावून घ्या, कधी कधी फक्त फोन वर काम होतात. जास्त मोठी समस्या असली की कायद्याने वागा लोकचळवळीच्या कार्यालयात जाऊन मार्गदर्शन घ्या. मी अनेकवेळा आपल्या समस्या महानगरपालिका, वार्ड कार्यालयात न जाता सोडवल्या आहेत. ही कार्य करण्याची पद्धती मला शिकवली कायद्याने वागा या संघटनेचे संस्थापक राज असरोडकर यांनी.

 • Very nice work dear sir Tusahar warang hota yenar nahi but Tusahar Warang Sarkhe hota yeiel nakkich ?☝️??

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!