राष्ट्रभक्तीमागची लैंगिक समरसता

राष्ट्रभक्तीमागची लैंगिक समरसता

राष्ट्रभक्तीमागची लैंगिक समरसता

वंदेमातरम…भारत माता की जय चा घोष…कपाळावर भगवे टीळे. मोदी मोदी चा नारा… हिंदुराष्ट्र आणण्याचं स्वप्न.‌ देशभक्तीच्या बड्या बड्या बाता आणि प्रत्यक्षात काम काय, तर नेत्यांची लैंगिक वासना शमवणं. नेत्यांचं काम काय, तर या सगळ्याचा नाद लागून जे युवक जाळ्यात सापडतील, त्यांचं लैंगिक शोषण करणं. हिंदुत्ववादी राजकारणाचा एक भेसूर चेहरा प्रदीप जोशी प्रकरणाने समोर आलाय.

रामभक्त प्रदीप जोशीला भाजपाने उज्जैन विभागीय संघटन मंत्री पदावरून काढलंय. पण त्याच्या कृष्णकृत्यांचं काय ? ज्या युवकासोबत प्रदीप जोशींचा विडियो आणि छायाचित्रे पसरवण्यात आली, त्या युवकांचाही मृत्यू झालाय. अंकुर रघुवंशी त्याचं नाव. आता अंकुरचा मृत्यू त्याचे प्रदीप जोशीसोबतचे संबंध उघड झाल्यानंतर झालाय की आधीच झालाय, याची चर्चा सुरू झालीय. काॅंग्रेसने हे प्रकरण तापवायला घेतलंय. अंकुरची हत्या झाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी काॅंग्रेसने केलीय. पण अंकुरचा मृत्यू आजाराने झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. ३० एप्रिल रोजी त्याने रूग्णालयात उपचार घेत असतानाचं छायाचित्र फेसबुकवर टाकलंय. त्यावरील चर्चेत फुप्फुस आणि पोटात जंतुसंसर्ग झाल्याचं अंकुरने म्हटलंय. त्याच्या एका मित्राने ” दारू पिऊन तू स्वत:ची वाट लावलीस”, असंही म्हटलंय.

अंकुर प्रमाणाबाहेर दारू का पिऊ लागला होता, हा चौकशीचा विषय आहे. प्रथमदर्शनी तरी तो प्रदीप जोशींच्या विरहाने बेचैन होता, असं समोर येतंय. अशा प्रकारचे दोघांचे प्रेमसंबंध असतील, तरी त्यात इतर कोणी डोकं घालण्याचं काही कारण नव्हतं. पण अंकुर आणि प्रदीप जोशी यांच्यातलं चॅटींग जोशीकडून युवकांचं होत असलेल्या लैंगिक शोषणाचे अंगुलीनिर्देश करतं. ” आप को कभी दुसरे लडके मिले हैं”, असं तो चॅटींगमध्ये म्हणतो. हे “लडके” पुरवण्याचं काम भाजपाचाच कोणी मौसम नावाचा कार्यकर्ता करीत असल्याची माहिती काही वेबपोर्टलवर वाचायला मिळते. केवळ युवकच नाही तर महिलांचंही शोषण प्रदीप जोशी नेतागिरीचा जोर दाखवून करत होता, असंही या वेबपोर्टल सांगतात.

अंकुरचा मृत्यू ७ में रोजी झालाय. मृत्यूपूर्वी आठवडा आधी तो रूग्णालयात दाखल होता. त्याच्या छायाचित्रावरून तो खूप गंभीर अवस्थेत आहे, असं दिसत नाही. मध्यप्रदेश काॅंग्रेस सचिव राकेश सिंह यादव यांनी आरोप केलाय की अंकुर प्रदीप जोशीला ब्लॅकमेल करत होता, म्हणूनच त्यांची हत्या झालीय. अंकुरचं पोस्टमार्टम न करता, त्याच्यावर घाईने करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावरसुध्दा काॅंग्रेसने संशय व्यक्त केला आहे.

आश्चर्य म्हणजे, अंकुरच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी ८ में रोजी त्याच्याच फेसबुक अकाऊंटवरून त्याच्या मृत्यूची बातमी पोस्ट करण्यात आली. विशेष म्हणजे, अंकुरच्या मृत्यूचा धक्का बसला, अशा आशयाची किंवा पोस्ट कोणी केलीय, अशी विचारणा करणारी कोणतीही प्रतिक्रिया पोस्टखाली नाही. अंकुश हा भाजपाचा अगदीच सर्वसाधारण कार्यकर्ता नव्हता, हे त्याचं फेसबुक अकाऊंट चाळल्यावर लक्षात येतं. पण त्याच्या मृत्यूवर एक स्मशानशांतता पोस्टवरच्या प्रतिक्रियांतून जाणवत राहते. असं वाटतं राहतं की श्रध्दांजली देण्याची औपचारिकता मित्रमंडळींनी केलीय. ज्याने कोणी अंकुरचा मोबाईल हाताळलाय त्यानेच भाजपांतर्गत वादात प्रदीप जोशीची छायाचित्रे पसरवली असावीत, असं बोललं जातंय.

समलैंगिकतेच्या मुद्द्यावरून काही लोकांना एकूणच मानवतावादाचा मोठा उमाळा आलाय. प्रदीप जोशी विरोधात समाजमाध्यमात रान उठवणाऱ्यांच्याच विचारधारेबद्दल प्रश्न उपस्थित करून नेहमीप्रमाणेच भाजपा विरोधातील वातावरण भलतीकडे वळवण्याचाही प्रयत्न काही लोकांनी केला, पण प्रदीप जोशींचं प्रकरण वैयक्तिक किंवा खाजगी संबंधांपुरतं मर्यादित नाही. युवकांना दिशाभूल करून भावनिक राजकारणात ओढायचं, त्यांना आपल्या राजकीय स्वार्थामागे फरफटवायचं आणि वर संधी साधून त्यांचं शोषणही करायचं, असा हा सगळा मामला आहे.

” दरवाजे की बेल खराब है, जोर जोर से मोदी मोदी चिल्लाये”, अशी राजकीय घमेंडीची पोस्ट करणाऱ्या अंकुरच्या मृत्यूवर भाजपातून आता कोणी चकार शब्द काढायला तयार नाही, काढणारही नाहीत. हरेन पंड्यासारखा माणूस जिथे राजकीय अडचण नको, म्हणून संपवला जातो, तिथे अंकुरसारखे हवशेनवशेगवशे कार्यकर्ते राजकीय पक्षांच्या खिजगणतीतही नसतात. कुलदीप सिंग सेंगर सारख्या बलात्काराच्या आरोपीला ज्या भाजपाचा खासदार धन्यवाद द्यायला तुरूंगात भेटायला जातो, त्या पक्षाला कार्यकर्त्यांच्या लैंगिक शोषणाचं काही सोयरसुतक असेल, यांची शक्यता नाही. यातून उन्मादी राजकारणाच्या कैफात वावरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी काही धडा घ्यायला हरकत नाही.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!