राष्ट्रवादीच्या गळतीला वैचारिक बांधिलकीचा अभाव कारणीभूत

राष्ट्रवादीच्या गळतीला वैचारिक बांधिलकीचा अभाव कारणीभूत

राष्ट्रवादीच्या गळतीला वैचारिक बांधिलकीचा अभाव कारणीभूत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मॉडेल हे सर्वस्वी सत्तेच्या आधारे चालणारे मॉडेल आहे. या पक्षातला आमदार, खासदार केवळ निवडून येण्यापूरता शरद पवारांशी एकनिष्ठ असतो आणि शरद पवारांना सुद्धा केवळ निवडून येण्याची क्षमता या पलीकडे कोणतही मेरिट महत्वाचे वाटत नाही. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे मॉडेल तयार झालं. या मॉडेल मधला आमदार, खासदार हा अधुनिक संस्थानिक असतो. त्याच्या प्रभावाखालील भूभागावरील जिल्हापरिषदा, नगरपालिका, साखर कारखाने, दुधसंघ, सहकारी बँका, क्रेडिट सोसायटया यांच काय करायचं यात शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काहीही हस्तक्षेप करत नाही. त्याबाबतीत हे आमदार, खासदार स्वतंत्र असतात. या बदल्यात आमदारांनी-खासदारांनी फक्त पक्षाशी बांधील राहावे एवढीच अपेक्षा असते. एवढे वर्ष सत्तेत असताना पवारांनी या नेत्यांचे हितसंबंध सांभाळले पण सत्ता हातातून गेल्यावर मात्र त्यांना ते करणे अशक्य होऊन बसले.

मागचे ५ वर्ष यातील अनेकांनी सत्तेविना कळ सोसून पाहिली. पण लोकसभेच्या निकालांनी अनेकांचा भ्रमनिरस झाला. मराठा आरक्षणामुळे बेस वोटर्स असलेला मराठा समाज भाजपकडे सरकला आणि वंचित बहुजन आघाडीमुळे दलित, बौद्ध, मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात दुरावला गेला. अश्या परिस्थितीत पुन्हा निवडून येणे यातील अनेक नेत्यांना अशक्य होऊन बसले आहे. पण सत्तेच्या टेकूशिवाय आपलं संस्थान टिकवणं यातील अवघड होऊ लागल्यामुळे यातील अनेकांनी आता भाजप-सेनेची वाट धरली आहे.

या नेत्यांकडे जर थोडी जरी विचारधारेची बांधिलकी असती तर आज ही गळती लागली नसती. पण सध्याच्या काळात राजकारण हे विचारधारा जोपासण्याऐवजी आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिक वापरलं जातं असल्यामुळे सत्तेसाठी हपापलेले नेते व त्यांचे नातेवाईक भाजप-सेना प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत. यालाच जर शरद पवारांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीच आणि मुत्सद्देगिरीच संचित म्हणावं तर तो पवारांवर अन्याय ठरेल आणि दोष केवळ पक्षांतर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या माथी मारावा तर ते पवारांना अंडर एस्टीमेट करणे होईल, कारण हे नेते कधी काळी पवारांनी hand pick केलेले नेते आहेत. सत्तेशिवाय पवारांच राजकारणाच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. ही मर्यादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावी.

स्वतः विरुद्ध विभागलेले घर फार काळ टिकू शकत नाही असे अब्राहम लिंकनचे वाक्य फार प्रसिद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतः विरोधात उभं राहिलेलं घर आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा जप करणाऱ्या राष्ट्रवादीत संभाजी भिडेला पाठीशी घालणारे लोक आहेत, अॅट्रोसिटी विरोधी मोर्च्याना बळ देणारे लोकसुद्धा आहेत, जातीयवादी लोकांना पाठीशी घालणारे लोकसुद्धा आहेत. विसंगतीने युक्त असलेल्या राष्ट्रवादीच्या घराला जोडणारा सत्तेचा फेविकॉल आता पवारांकडे उरलेला नाही, त्यामुळे या घराला भगदाड पडू लागले आहे. ही गळती थांबवणे सत्तेशिवाय शक्य नाही. त्यात विरोध पक्षातील नेत्यांना साम, दंड, भेद वापरून गळाला लावण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. उदा. हसन मुश्रीफ यांच्या घरावरील धाडी.

ही गळती थांबवायची असेल तर आता शरद पवारांपुढे दोन पर्याय आहेत. एकतर भाजप-सेनेशी युती करावी किंवा वंचित बहुजन आघाडीशी सन्मानपूर्वक बोलणी करून निवडणूक पूर्व काँग्रेस-एनसीपी-व्हीबीए अशी आघाडी लवकरात लवकर स्थापन करावी. शरद पवारांच्या राजकीय चाली दिशा भल्या भल्या राजकीय पंडितांना चकवा देणाऱ्या असल्यामुळे आपण पामर त्याबाबत काय भविष्यवाणी करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याना सदिच्छा

 

नितीन दिवेकर

(लेखक आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!