रो अर्थात रिस्पेक्ट ऑफ वुमेन हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चालणारे आंदोलन आहे. स्त्रीपुरुष समानता, शिव्यांना, छेडछाडीला, शेरेबाजीला विरोध, स्त्रियांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुरुषांचा सहभाग, स्त्रियांना कमी लेखणाऱ्या कौमार्य चाचणी व तत्सम कुप्रथांना विरोध, आरोग्यविषयक जागृती, संकोच मोडीत काढणे इत्यादी विषयांवर जनजागृती करणारं आंदोलन.
ज्योतिबा फुले त्यांच कार्य का करु शकले, तर जे मनाला खटकलं, ते त्यांनी तेव्हाच्या वर्तमानातच बोलून दाखवलं. त्याला कडाडून विरोध केला. टीकाटिप्पणी, शिवीगाळ झेलली. सुधारणा भाषणांपुरती मर्यादित न ठेवता, ती प्रत्यक्षात अवतरवली. चांगल्या भविष्यासाठी वर्तमानाशी विसंगत भुमिका घेऊन जगायला मोठं धाडस लागतं. आपण बघतो की क्रांतीच्या खूप मोठ्या बाता मारणारे लोक त्यांच्या घराशेजारची गुंडगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, गैरप्रकार, कायद्याचं उल्लंघन, प्रशासकीय मनमानी याविरोधात तोंडही उघडत नाही.
प्रत्येक झोपडपट्टीत फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणारे शेकडो कार्यकर्ते असतात, पण स्थानिक दारुचे गुत्ते, मटक्याचे अड्डे याबाबत मूग गिळून असतात. तीच गत फ्लैटमध्ये राहणाऱ्या तथाकथित विचारवंतांची असते. अवघ्या ५०-१०० लोकसंख्येच्या सोसायटीतही कधीही आवाज न उठवणारे हे लोक भाषणांतून मात्र क्रांतीच्या तुताऱ्या फुंकत असतात.
घराशेजारच्या मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा तरी आहेत का, याची साधी चौकशीही न करणाऱ्या लोकांना वर्षातून एकदा शिक्षकदिनाची मागणी करायला जोर येतो.
प्रश्न शिक्षणाचा असो, स्त्रियांच्या अधिकारांचा असो विधवा पुनर्वसनाचा की अंधश्रध्देविरोधात कठोर प्रहार असोत, ज्योतिबा फुलें नेहमीच काळाच्या दोन पावले पुढे चाललेले आहेत.
फुले-आंबेडकरी विचार हा स्त्रीसक्षमीकरणाचा, स्त्रीसन्मानाचा विचार आहे. या महामानवांकडे एक निरोगी पुरुषभान होतं, म्हणूनच या विचारांत स्त्रीचळवळीची बीजं रुजलेली आपल्याला दिसतात. आपण जर या महामानवांचे स्वत:ला पाईक म्हणवत असू, तर त्यांच्या विचारांची कास प्रत्यक्षात धरणं आवश्यक आहे.
मर्दुमकी, हिजडे, बायल्या, बांगड्या भरा असे व तत्सम शब्दप्रयोग पुरुषवर्चस्वाचा पुरस्कार करणारे आहेत. ते हेतूत: टाळले पाहिजेत.
आणि सर्वात महत्वाचं समाजात खुलेपणाने दिल्या जाणाऱ्या शिव्या. या शिव्या आयाबहिणींवरुन दिल्या जातात. याचाच अर्थ त्या स्त्रीवाचक म्हणजेच स्त्रीयांना अवमानित करणाऱ्या आहेत. फुले-आंबेडकरी विचारांत शिव्यांना स्थान असता कामा नये, किंबहुना शिव्यांना प्रखर विरोध व्हायला हवा. शिव्या द्यायच्या नाहीतच, सहनही करायच्या नाहीत !!!