वसंत भोईर : लोकवैज्ञानिक

वसंत भोईर : लोकवैज्ञानिक

वसंत भोईर : लोकवैज्ञानिक

प्रदूषणविरोधी उपकरण बनवणाऱ्या वसंत भोईरांना
कायद्याने वागा चा लोकवैज्ञानिक पुरस्कार

कारखाने आणि वाहनांतून बाहेर पडणारे वायुपदुषण रोखण्यासाठी डोबिवलीतील सोनारपाडा येथील वसंत भोईर यांनी एक यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या माध्यमातून हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेवून तयार झालेली शुध्द हवा पुन्हा वातावरणात सोडणे शक्य होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वसंत भोईर वेगवेगळ्या संकल्पना राबवून पर्यावरणावर काम करु इच्छित आहेत. पण शासनदरबारी त्यांच्या संशोधनाची, प्रयत्नांची, धडपडीची दखल घेत नसल्याची खंत भोईर यांना होती. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी आपला ११ मार्च रोजीचा वाढदिवस वसंत भोईर यांच्या धडपडीला अर्पण करून त्यांना लोकवैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित केले व उपस्थितांना सामाजमाध्यमातून त्यांचे संशोधन सरकारपर्यंत पोचविण्याचे आवाहन केले.

वसंत भोईर मेकमको कंपनीत कामाला आहेत. काम करताना अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात आणि मग त्या सत्यात उतरविण्यासाठी सुरू होते, वसंत भोईरांची धडपड. नवनवीन शोधात त्यांच्या डोक्यात विचारांची चक्रे अखंड सुरू असतात. घराच्या छपरावर प्रदुषणामुळे जमा होणाऱ्या कार्बनच्या थराने वसंत भोईरांना अस्वस्थ केले आणि त्यातूनच जन्माला आले, वसंतयंत्र…जणू प्रदुषणमुक्त वातावरणात आपल्या जीवनात वसंत फुलवू पाहणारा एक विज्ञानमंत्रच….

वसंत भोईर यांनी केवळ हवेतील कार्बन शोषून घेणारा आराखडा तयार केलेला नसून, रेल्वे गाड्यांतील मलविसर्जनापासून गॅस व वीज निर्मितीचीही संकल्पना त्यांच्याकडे तयार आहे. वसंत भोईर यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून तयार केलेल्या पर्यावरणविषयक उपाययोजनांकडे समाजाचं लक्ष द्यावं व त्यांच्या धडपडीला सामाजिक पाठबळ मिळावं, यासाठी राज असरोंडकर यांनी त्यांचा यंदाचा 11 मार्च रोजीचा वाढदिवस वसंत भोईर यांच्या प्रयत्नांना अर्पण केला. कमलादेवी महाविद्यालयाचे संचालक सदानंद तिवारी, विविधा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कायद्याने वागा चे केंद्रीय कार्याध्यक्ष विनायक जाधव, कायद्याने वागा हौसिंग कन्झुमर फोरमचे अध्यक्ष व उद्योजक भोजराज वाधवा, राजेश छाब्रिया, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे उत्तम जोगदंड व श्रीप्रसाद खुळे, टिएचआर बचत गट महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षा जयश्री देशमुख, स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील, सोनारपाडाचे माजी सरपंच मुकेश पाटील, कायद्याने वागाचे कडोंमपा समन्वयक बापू राऊत, पत्रकार किशोर पगारे, प्रफुल केदारे, साहित्यिका वृषाली विनायक, कल्याण शहर समन्वयक राकेश पद्माकर मीना, सागर संजीवनी, स्वप्नील पाटील, एड. भुजंग मोरे, एड. निलेश मोहिते, विजय गौंड, शीतल बावधनकर, संगीता मोहोड, ललिता पेठकर, आन्सर कॉम्पुटर चे नितीन शेठ, उद्योजिका शिल्पा वाडकर, अपना बँकेचे शाखा अधिकारी मंगेश असरोंडकर, उल्हासनगर मनसे अध्यक्ष प्रदीप गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंत भोईर यांच्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

ट्रकमधून बाहेर पडणारा काळा धूर उपकरणातून बाहेर पडल्यावर त्याला वास येत नाही, तापमान कमी होते, व आवाजही कमी होतो, हे यावेळी भोईर यांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे, कामा चे अध्यक्ष देवेंद्र सोनी, मेट्रो कंपनीचे उदय वालावलकर, झेन केमिकलचे सी. एन. कदम, आणि जनक रावल अशा उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही प्रात्यक्षिक पाहून वसंत भोईर यांचे कौतुक केले.

हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आहे. हाच कार्बन डायऑक्साईड अवकाशात वर जातो आणि ढगांतून जमीनीवर पाऊस कोसळण्यात अडथळा निर्माण करतो. हवेच्या वाढत्या प्रदुषणामुळे वातावरणातला उष्माही वाढला असून तो भविष्यात एकूणच मानवजातीसाठी जीवघेणा ठरण्याची भीती जगभर व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संरक्षण हा आता जगभरातला प्राधान्याचा विषय असून, आपल्याकडेही सरकार पातळीवर तसा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात निम्न स्तरावर तसे गांभिर्य आढळून येत नाही. त्यामुळेच वसंत भोईर यांच्यासारखे सर्वसामान्य अल्पशिक्षित पण कल्पक लोक अभिजन व्यवस्थेकडून दुर्लक्षित राहतात. राज्य सरकारने समाजातील अशा व्यक्तिंचा शोध घेवून त्यांच्या विविध संशोधन, विकास प्रस्तावांसाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याची आवश्यकता असताना, उलट त्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला साधी पोचही देण्याचे सौजन्य सरकारी यंत्रणा दाखवत नाही, हे खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया राज असरोंडकर यांनी याप्रसंगी दिली.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!