संविधानातील विज्ञानवादी दृष्टिकोन केंद्रस्थानी असलेली डाॅक्टरेट !

संविधानातील विज्ञानवादी दृष्टिकोन केंद्रस्थानी असलेली डाॅक्टरेट !

संविधानातील विज्ञानवादी दृष्टिकोन केंद्रस्थानी असलेली डाॅक्टरेट !

विज्ञाननिष्ठ व मानवतावादी दृष्टिकोन तसंच शोधक बुध्दी व सुधारणावाद यांचा प्रसार करणं हे भारतीय नागरिकांच्या मूलभूत संविधानिक कर्तव्यांपैकी एक आहे. साताऱ्याच्या विलास खंडाईत यांनी हाच केंद्रबिंदू घेऊन संशोधनात्मक प्रबंध लिहिला आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून डाॅक्टरेट मिळवली.

पुरोगामी वैचारिक चळवळीला दिशादिग्दर्शन करणारे प्रा. विलास खंडाईत यांनी ‘जादूटोणा विरोधी कायदा विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसन’ या विषयात विशेष संशोधन केलंय. अंधश्रध्दा निर्मूलनाशी संबंधित विषयात डॉक्टरेट मिळवणारे खंडाईत महाराष्ट्रातील पहिलेच प्राध्यापक ठरलेत.

जनता शिक्षण संस्था संचलित वाई येथील किसनवीर महाविद्यालयात प्रा. विलास खंडाईत गेली २४ वर्ष अध्यापनाचं काम करताहेत. तिथे ते झूलाॅजी शिकवतात. मात्र, परिवर्तनाच्या चळवळीत ते आधीपासूनच सक्रीय आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. महाविद्यालय स्तरावरील विविध राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्याबरोबरच त्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यामुळेच संशोधनासाठी सामाजिक विषय निवडल्याचं व त्यासाठी एमएडही केल्याचं डॉ. विलास खंडाईत यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं.

जादुटोणाविरोधी कायदा विषयक जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसन हा खंडाईत यांच्या संशोधनाचा विषय होता. जादुटोणाविरोधी कायद्यात अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीतींना आळा घालण्यासाठी बारा अनुसूची आहेत. त्या अनुषंगाने डॉ. खंडाईत यांनी आपल्या प्रबंधातून प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केलाय.

कायद्याबाबतची जनजागृती आणि प्रशिक्षणातून अंधश्रद्धा निर्मूलन हा उद्देश आहेच, परंतु, चमत्कारांच्या सादरीकरणापुरतं मर्यादित न राहता आपण माहितीपट आणि चित्रंही तयार केली असल्याचं खंडाईत यांनी सांगितलं.

कोणत्या कृती कायद्यानुसार गुन्हा ठरतात आणि कोणत्या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, हे स्पष्ट करतानाच हा कायदा कोणत्याही जातीधर्मदेवांविरोधात नाही, हे लोकांपर्यंत पोहचवणं हाही प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे, असं डॉ. खंडाईत सांगतात.

केवळ अंधश्रद्धा किंवा कायद्यापुरता प्रबंध मर्यादित नसून प्रत्येक घटक, संज्ञेची चिकित्सक मांडणी प्रबंधात आहे. आपल्या प्रबंधाचं अस्तित्व विद्यापीठापुरतं असू नये व तो जनमानसापर्यंत जावा, यासाठी हा प्रबंध एप्रिलमध्ये पुस्तकरुपानेही प्रकाशित होईल, अशी माहिती डॉ. खंडाईत यांनी मिडिया भारत न्यूज ला दिली.

प्रा. विलास खंडाईत यांनी अंधश्रध्दामुक्त समाज निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगलं असून त्यासाठीच त्यांनी अंधश्रध्दा निर्मूलानाच्या विषयात महत्वपूर्ण अभ्यास केला आहे.

यासाठी त्यांना सातारा येथील आझाद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वंदना नलावडे मार्गदर्शन लाभलं.. डॉ. नरेद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर प्रा. विलास खंडाईत यांच्या या पीएचडीला विशेष महत्व आहे.

परिवर्तनाची चळवळ गतिमान होण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. श्याम मानव या आणि अशा विचारवंतांचे असंख्य कार्यक्रम प्रा. विलास खंडाईत यांनी आयोजित केलेत. मूळात त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत खंडाईत यांचं पुरोगामी चळवळीत योगदान आहे. तो वारसा डॉ. विलास खंडाईत यांना घरातून लाभलाय. अॅड. प्रकाश आंबेडकर, श्याम मानव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. आ. ह. साळुंखे, भारत पाटणकर, श्रीमंत कोकाटे यांच्या सहवासालाही डॉ. खंडाईत स्वत:तील वैज्ञानिक दृष्टीकोन विकासाचं श्रेय देतात.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!