कमलताई विचारेंच्या हस्ते झालं संकेतस्थळाचं उदघाटन

कमलताई विचारेंच्या हस्ते झालं संकेतस्थळाचं उदघाटन

कमलताई विचारेंच्या हस्ते झालं संकेतस्थळाचं उदघाटन

११ मार्च २००८ रोजी कायद्याने वागा लोकचळवळ नावाच्या संकल्पनेचा जन्म झाला व आज दहा वर्षांतच ती पाय रोवून यशस्वीरीतीने उभी आहे. प्रणेते राज असरोंडकर यांच्या मार्गदर्शनानुसार तिने महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ११ मार्च राज असरोंडकर यांचा जन्मदिवस. त्याचंच निमित्त घेत राज यांनी ह्या संकल्पनेला सुरूवात केली होती.

सामाजिक क्षेत्रातले वेगवेगळे विषय या लोकचळवळीने यशस्वीरीत्या हाताळले आहेत.
विषयाची तळमळ, विषयाचा अभ्यास व विषयाची मांडणी या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्रिसूत्रीवर कायद्याने वागा लोकचळवळ आपले कार्य संविधानिक मार्गाने करते आहे.

यंदाचं दहावं वर्ष. दशकपूर्तीच्या निमित्ताने कायद्याने वागा लोकचळवळीने आपलं संकेतस्थळ सुरू केलं आहे. या संकेतस्थळाचं उद्घाटन कमलताई विचारे यांच्या हस्ते त्यांच्या राहत्या घरी करण्यात आलं.

आजच्या परिवर्तन प्रवाहातील नव्या पिढीला कदाचित कमलताई विचारे हे नाव माहित नसेल अथवा दृष्टीपथात नसल्याने विसरही पडला असेल. कमलताई विचारे ह्या समाजवादी विचारधारेतल्या विचारवंत! महिला आर्थिक विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य याच्या कमलताई अध्यक्ष होत्या. सासरे केशवराव विचारे यांचा सत्यशोधक वसा त्यांनी पुढे अखंड चालवला. स्त्री सबलीकरणात त्यांचं योगदान आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कमलताईंचं कार्य महत्त्वाचं आहे.

आज वयाच्या नव्वदीला पोहोचलेल्या कमलताई विचारे यांच्या हस्ते कायद्याने वागा लोकचळवळीच्या संकेतस्थळाचं ( वेबसाईट ) उद्घाटन ही बाब अतिशय अभिमानाची!!!

खरं तर राज असरोंडकर यांची कायद्याने वागा लोकचळवळ नेमकं करते तरी काय? हे कमलताईंना जाणून घ्यायचं होतं. यासंदर्भात राज यांना ब-याच दिवसांपासून भेटण्याची त्यांची इच्छा होती. भेटी दरम्यान त्यांनी हे आवर्जून सांगितलं.

कमलताईंनी तास – दीड तास राज असरोंडकर यांच्याशी संवाद करत कायद्याने वागा लोकचळवळीची पार्श्वभूमी, भूमिका, कार्यप्रणाली, हाताळलेले विषय, पद्धती, परिणाम, लोकप्रतिसाद, लोकसहभाग असे बरेच पैलू जाणून घेतले. जनमानसात कायदा सांगणारी ही लोकचळवळ वेगळं पण दखल घेणारं काम करतेय याचा आनंद त्यांच्या बोलण्यात जाणवत होता.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी ठार निरक्षर आहे; असं प्रामाणिकपणे सांगत असताना आज एवढ्या वयातही संकेतस्थळाची माहिती त्या उत्सुकतेने ऐकत होत्या. शंकानिरसन करत होत्या. ही चळवळ या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी अशी आशा कमलताईंच्या चेह-यावर तरळत होती. मला आपल्या चळवळीसाठी काही करता येईल? असंही त्यांनी आवर्जून विचारलं. कमलताईंच्या उत्साहाने आम्ही भारावून गेलो.

कमलताईंनी भरभरून कायद्याने वागा लोकचळवळ व राज असरोंडकर यांचं कौतुक केलं. पुढिल वाटचालीस सदिच्छा दिल्या. तसेच सद्य घडामोडींवर मनमोकळ्या गप्पा केल्या.

कायद्याने वागा लोकचळवळ आज महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात पोहोचली आहे. लोकसमुदाय तिच्यासोबत आहे. पण संकेतस्थळाचं उद्घाटन करताना मात्र कमलताई विचारे, राज असरोंडकर, वृषाली विनायक, जनार्दन म्हात्रे व नयना म्हात्रे असे पाचच लोक का??? माझ्या या प्रश्नाचं उत्तर राज यांनी दिलं ते अधिक भावलं!!!

राज असरोंडकर यांना ह्या उद्घाटनाचा सोहळा करायचा नव्हता; तर आठवणीतला एक वेगळा दिवस अशी याची नोंद आपल्या सर्वसाधारण दिवसात करायची होती म्हणूनच अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी हे उद्घाटन केलं…त्यामागचा विचार आणखी अंतर्मुख करणारा वाटला; आपण ज्या मार्गावर काम करतो आहोत त्या मार्गावर आपली पदचिन्हे उमटवलेली ही ज्येष्ठ मंडळी! त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत हवा. या ज्येष्ठांचा विसर राज असरोंडकर व कायद्याने वागा लोकचळवळीला नाही. ह्याचं कौतुक वाटलं! आपल्या कार्याशी, विचारांशी पर्यायाने समाजाशी असणारी बांधिलकी या कृतीतून ठळकपणे समोर आली.

वाढदिवसाची सकाळ सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप यांच्या कल्याणात देवरूंगमधील मैत्रकुल मधील मुलांसोबत नाश्ता-गप्पा अशी झाली, तर कायद्याने वागा लोकचळवळीचा प्रवास जाणून घेऊ इच्छिणार्‍या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना फेसबुक लाईव्हच्या मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट केलेली भूमिका चळवळीची दिशा स्पष्ट करणारी होती.

ह्या सगळ्यांत सोबत वावरत असताना राज असरोंडकर यांचा साधेपणा, विनम्रता तसेच सर्वांना सामावून व समजून घेणा-या एका उत्तम नेतृत्वाचं दर्शन घडत होतं एवढं नक्की!

कायद्याने वागा लोकचळवळ

दहा वर्ष जिद्दीची
दहा वर्ष तळमळीची
दहा वर्षे सातत्याची
दहा वर्ष – स्वाभिमानाची!!!

संकेतस्थळ :
kaydyanewaga.com

– वृषाली विनायक
संचालक, झिम्माड वाॅटस्एप समूह
कायद्याने वागा लोकचळवळ

admin

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!