कस्तुरबा : गांधींच्या सत्याग्रहाची प्रेरणा

कस्तुरबा : गांधींच्या सत्याग्रहाची प्रेरणा

कस्तुरबा : गांधींच्या सत्याग्रहाची प्रेरणा

१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या.

गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती.

१८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल (जन्म :इ.स. १८९२ ), रामदास (जन्म : इ.स. १८९७) आणि देवदास (जन्म : इ.स. १९००).

कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या.

१९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले.

१९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.

कस्तुरबा गांधी लहानपणापासून साहसी होत्या, त्यांनी मोहनदास गांधी यांना वेळोवेळी सांभाळले, त्यांच्या शिक्षणासाठी बांनी आपले सर्व दागिने विकले. सुरुवातीला गांधीजी शिक्षणासाठी विलायतेला गेले, नंतर नोकरीसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेले, अनेकदा ते तुरूंगात गेले त्यावेळी त्यांच्यामागे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कस्तुरबा यांनी सांभाळली. कस्तुरबा स्वातंत्र्याच्या लढ्यातही महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढल्या !

चंपारण नंतर खेडा सत्याग्रहात त्यांनी स्त्रियांना आवाहन केलं, ‘हमारे मर्दो ने सत्य के लिए सरकार के साथ जो लडाई ठानी है उस में हमे उनका उत्साह बढाना चाहिए, सरकार के नौकरों से मत डरिये बल्कि हिंमत रखिए और अपने भाईयों, पतियों ओर बेटें को हिंमत दिजिए।’ कस्तुरबांच्या येण्याने तिथल्या स्त्रियांना खूप आधार मिळाला.

कस्तुरबांशी विवाह केल्यानंतर मोहनदास गांधी यांनी 'पती बननेका मॅन्युअल' नावाचे पुस्तक खरेदी केले होते. दररोज एक पान वाचून त्याचा प्रयोग ते कस्तुरबांवर करायचे. पुस्तकात वाचल्यानुसार एकदा गांधीजींनी कस्तुरबांवर हात उगारला. बांना ते सहन झाले नाही. त्यांनी सत्याग्रहाचे अस्त्र काढले. 'बा' या देशातल्या पहिल्या सत्याग्रही होत्या. महात्मा गांधी यांनी त्यांना सत्याग्रहाचा गुरू मानले होते !

74 वर्षांच्या असताना इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुण्याच्या कारागृहात त्यांचा मृत्यू झाला.

कस्तुरबा म्हणजे संपूर्ण देशाला आईसारख्या होत्या, अशी प्रतिक्रिया नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कस्तुरबांच्या निधनानंतर दिली होती. कस्तुरबा स्त्रीत्वाचा आदर्श होत्या. त्या शक्तिशाली, धैर्यवान, शांत आणि स्वावलंबी होत्या. स्वातंत्र्य संग्रामाच्या दौऱ्यादरम्यान ज्या मुलींना त्या भेटल्या त्या मुलींसाठी कस्तुरबा आदर्श होत्या, असं नेताजी म्हणाले होते.

कस्तुरबा गांधी कायम महात्मा गांधींच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी साथ दिली नसती तर मोहनदास गांधी ‘महात्मा गांधी’ बनले नसते. सत्याग्रह ही महात्मा गांधी यांची ओळख होती आणि ही ओळख कस्तुरबांमुळेच त्यांना मिळाली. हे महात्मा गांधी यांनीदेखील मान्य केले. म्हणूनच ते सत्याग्रहासाठी कस्तुरबांना आपला गुरू मानत, असं मोहनदास गांधींचे पणतू तुषार गांधी यांचं म्हणणं आहे.

दुर्लक्षित कस्तुरबांवर लिखाण करण्यात आले. मात्र, कस्तुरबा एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून नाही, तर गाधींजींची पत्नी म्हणून लिहिले. विदेश प्रवासासाठी कस्तुरबा गांधी यांनी त्यांचे स्त्रीधन विकले. दक्षिण अफ्रिकेतील कारागृहात असताना तिथल्या अव्यवस्थेच्या विरोधात कस्तुरबांनी सत्याग्रह केला. हा लढा मोहनदासांची पत्नी म्हणून नाही तर कस्तुरबा म्हणूनच त्या लढल्या. गांधीजी कारागृहात असताना मुंबईतील शिवाजी उद्यानातून ‘क्विट इंडिया’चा संदेश देणाऱ्या कस्तुरबाच होत्या. आम्ही सर्वानी स्वत:ला मोहनदास ऊर्फ महात्मा करमचंद गांधी यांचे वंशज मानले आणि कस्तुरबांना कायम दुर्लक्षित ठेवले. कस्तुरबांचे योगदान आम्ही विसरलो, अशी खंत तुषार गांधी यांनी व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर कोचरब आश्रम ते आगाखान पॅलेसमधला शेवटचा तुरुंगवास सोसताना झालेल्या मृत्यूपर्यंतच्या काळातील कस्तुरबा गाधींचे योगदान नतमस्तक करणारे आणि प्रत्येक भारतीयाचे मन भरून यावे असे आहे. सुरुवातीच्या काळात पतीशी सामना करणारी ही पत्नी हळूहळू सार्वजनिक सत्याग्रही बनत गेली. महात्मा गांधींच्या सत्याग्रही लढय़ात भारतातील स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर उतरल्या हे खरे आहे, पण कस्तुरबांचा वाटा त्यात मोठा आहे, असे सत्याग्रहाचा इतिहास बघता दिसून येतं, असं रझिया पटेल यांनी म्हटलं आहे.

गांधीजी आणि कस्तुरबांच्या आगाखान पॅलेसमधील तुरुंगवासात कस्तुरबा गांधीजींना म्हणाल्या होत्या, ‘‘सरकार की ताकत का पार नहीं हैं, वह लोगों को कुचल रही है, लोग बेचारे कहाँ तक सहेंगे? इसका परिणाम क्या होगा? गांधीजी त्यांना जोखण्यासाठीच जणू म्हणाले, ‘‘तू कहे तो मैं वाईसरॉय को माफी के लिए पत्र लिखू?’’ बा गुस्से में आकर बोली, ‘‘सुकुमार लडकियां जेल में पडी है, वे माफी नहीं मांगती और आप मांगेंगे?’’

या तुरुंगवासात त्यांच्या आजारावर उपचार करण्याबाबत सरकारने अक्षम्य हेळसांड केली. आगाखान पॅलेसच्या तुरुंगवासात शेवटी त्यांना मृत्यू आला. ‘गांधीजींनी लिहिलंय ‘कष्ट सहते सहते कस्तुरबाने अपनी देह छोडी।’

 

( संकलित )


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!