काय घडलं दिवसभरात : bulletin 265

काय घडलं दिवसभरात : bulletin 265

काय घडलं दिवसभरात : bulletin 265

विमानाच्या इंजिनानं पेट घेतला

युनाइटेड एअरलाइन्सच्या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर पेट घेतल्याची घटना घडलीय. अमेरिकेच्या विमान वाहतूक संचालन प्रशासनानं या घटनेला दुजोरा दिला आहे. विमान कंपनीनं दिलेल्या माहिती नुसार बोईंग ७७७-२०० हे प्रवासी विमान १० क्रू मेम्बर्स आणि २३१ प्रवाशी घेऊन होनोलूलूकडे निघालं होतं. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनानं पेट घेतला. प्रसंगावधान राखत वेळीच विमान उतरवण्यात आल्यानं या थरारक घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माणसांमध्येही बर्ड फ्ल्यू !

आतापर्यंत पक्ष्यांमध्येच लागण असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या घातक H5N8 विषाणूने माणसांमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रशियात या विषाणूने बाधित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणांनी याबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून H5N8 ने पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवलं आहे. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु केला आहे. यापूर्वी कधीच बर्ड फ्ल्यूची लागण माणसाला झालेली नव्हती.

सौरवातामुळे मंगळाने वातावरण गमावलं !

मंगळ ग्रहाने सौरवातामुळेच आपलं वातावरण गमावलं असावं, या निष्कर्षावर खगोल शास्त्रज्ञांनी संगणकीय अभ्यासांती शिक्कामोर्तब केलं आहे. हा निष्कर्ष रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिक नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोणत्याही ग्रहाला सौरवातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी संरक्षक अशा चुंबकीय वातावरणाची गरज असते. मात्र मंगळावरचे वातावरण नष्ट झालं आहे, असा दावा खगोल शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोना लसीसाठी भारताची स्तुती !

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी कोरोना विषाणूच्या विरोधात जागतिक लढाईसाठी आणि जागतिक बाजारात कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांबाबत भारताची स्तुती केली आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी़ एस़ तिरुमूर्ति यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे . गुटारेस यांनी 17 फेब्रुवारीला भारताला आभार प्रदर्शन करणारं पत्रही पाठवलं आहे.

नागालँड विधानसभेत पहिल्यांदा वाजलं राष्ट्रगीत

नागालँड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आलीय. नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रगीताची धून वाजणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं बोललं जात आहे. ०१ डिसेंबर १९६३ रोजी नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर नागालँडच्या विधानसभेत कधीही राष्ट्रगीत गायलं अथवा वाजवण्यात आलं नव्हतं.

रामसेतूच्या अभ्यासाला मंजूरी

भारत व श्रीलंकेदरम्यानच्या समुद्रातील रामसेतूचा अभ्यास करण्याची संधी गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला मिळाली आहे. भारतीय पुरातत्त्व खात्यानं याविषयीचा प्रस्ताव मंजुर केला आहे. एनआयओच्या वाट्याला राष्ट्रीय स्तरावरील एवढी मोठी कामगिरी प्रथमच आली आहे. सेतूशीनिगडीत दगडांच्या माळेचा अभ्यास करण्याविषयीचा प्रकल्प हा १ कोटी ३५ लाख रुपयांचा आहे. तीन वर्षांसाठी हा प्रकल्प आहे. हा सेतू मानव निर्मित असू शकतो, असं नासाने यापूर्वीच म्हटलेलं आहे.

बिहारमध्ये कोरोना चाचणी घोटाळा 

बिहारमध्ये कोरोना तपासणीमध्येच मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. रॅपिड अँटिजन टेस्ट किटमध्ये कोट्यवधीची अफरातफर झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार ज्यांची कोविड-१९ चाचणी झाली आहे, अशांच्या तपासामध्ये केवळ तीन विभागातील आरोग्य केंद्रात तब्बल ३० हजार जणांचे मोबाइल क्रमांक खोटे असल्याचे उघड झाले आहे. हा कोरोना चाचणी किट घोटाळा बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याची शक्यता आहे.

श्रीधरन बरळू लागले !

ई. श्रीधरन यांनी राजकारणामध्ये प्रवेश करण्या आधीच बेताल राजकीय वक्तव्य करण्यास सुरुवात केलीय. श्रीधरन यांनी केरळमधील लव जिहाद संदर्भात तथ्यहीन भाष्य केलंय. केरळमध्ये लव्ह जिहादची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं सांगत हे प्रकार थांबवण्याची गरज असल्याचे श्रीधरन यांनी म्हटलं आहे. श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागले आहेत. धार्मिक धुव्रीकरण होईल अशी वक्तव्य केल्याने आपण सतत चर्चेत राहून लोक आपल्याला पसंती देतील, असा गैरसमज श्रीधरण यांना झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

कामधंदा नसला तरी पतीची जबाबदारी !

कुटुंबातील कर्ता पुरूष त्याला कामधंदा नाही म्हणून तो पत्नी-मुलांची जबाबदारी झटकू शकत नाही, असा निर्वाळा मुंबई सत्र न्यायालयानं दिला आहे. पत्नी व मुलांना त्यांचं आयुष्य सुखात जगता यावं, ही कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाचीच जबाबदारी आहे. केवळ नोकरी नाही, म्हणून पुरुषाला आपल्या पत्नी-मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी झटकता येणार नाही, असंही सत्र न्यायाधीश यू. एम. पडवड यांनी या आदेशात स्पष्ट केलं आहे.

कोरोनीलला WHO ची मान्यता नाही !

भारताच्या औषध महानियंत्रकांनी पतंजलीच्या कोरोनील या औषधाला प्रतिबंधक म्हणून मान्यता दिलेली असताना, भारतातील माध्यमांनी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनीलला मान्यता दिल्याचं वृत्त बेधडकपणे प्रसारित केलं. यावर जागतिक आरोग्य संघटनेनेच आपण कुठल्याही पारंपारिक औषधाची समीक्षा केली नसल्याचं तसंच मान्यता दिली नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. यानंतर पतंजलीवरही खुलासा करण्याची नामुष्की आली असून, खुद्द आचार्य बाळकृष्ण यांनीच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनीलला मान्यता दिल्याच्या वृत्ताचं खंडन केलंय.

 

बुलेटीन ऐकण्यासाठी टिचकी मारा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!