शिरोडा सत्याग्रहाचं स्मारक उभं राहणार कधी? सरकार मीठाला जागणार कधी !

शिरोडा सत्याग्रहाचं स्मारक उभं राहणार कधी? सरकार मीठाला जागणार कधी !

शिरोडा सत्याग्रहाचं स्मारक उभं राहणार कधी? सरकार मीठाला जागणार कधी !

गांधीजींनी 12 मार्च 1930 ला मीठाच्या सत्याग्रहाची हाक दिली आणि भारतात फक्त दोन ठिकाणी त्यावेळी मीठाचा सत्याग्रह झाला . एक दांडीला आणि दुसरा या इथे शिरोड्याला !

कांजूरमार्गची मिठागराची जागा मेट्रो कार शेडसाठी केंद्राकडून राज्य सरकारकडे घेण्यासाठी ठाकरे सरकार जर आटोकाट प्रयत्न करीत असेल तर त्यासोबत ही शिरोड्याची जागाही त्यानी राज्य सरकारकडे घ्यावी आणि इथे मीठाच्या सत्याग्रहाच्या आठवणी सांगणारं एक स्मारक , ‘किंबहुना’ पर्यटकांना माहिती देणारं एखादं सुसज्ज दालन तरी लवकरात लवकर उभारावं. यातून मिठाला जागल्याचं भाग्यही मिळेल.

कोविड असला तरीही सर्व तयारी झालीय . मार्च महिन्याच्या अखेरीस मीठ तयार होण्यास सुरुवात होईल. तसं ते दरवर्षीच या दरम्यान तयार होतं . सध्या इथे शिरोड्यात फक्त पाच ते सात आगरं उरलीयेत मीठाची . यातली काही मिठागरे केंद्र सरकारच्या मालकीची तर काही खाजगी आहेत .

साधारण चाळीसेक स्थानिक लोक इथल्या मिठागरात करतात .समुद्राच्या पाण्यापासून खाजणात तयार केलं जाणारं हे पारंपरिक मीठ दोन प्रकारचं असतं. पांढरं आणि काळं. काळं मीठ खत म्हणून आंबा काजू बागायतदारवाले घेऊन जातात. तर पांढरं मीठ बर्फ फॅक्टऱ्या आणि मासे खारवायला घेउन जातात .गोव्यात या मीठाला अद्यापही मोठी मागणी आहे. शंभर ते दीडशे रुपयाला एक टोपलीभर मीठ जातं. एका टोपलीत आठ दहा किलो असेल .

तर सांगायचा मुद्दा हा की , ही जी पाच – सात आगरं आहेत मीठाची त्यातली काही केंद्रीय मिठागर आयुक्तांच्या अखत्यारीत येतात . ठरावीक मुदतीकरीता या जागेचं लीज देण्यात येतं. राज्य सरकारने आरे कार शेड ज्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला त्या कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडच्या प्रस्तावीत जागेवरही केंद्र सरकारच्या मिठागर आयुक्तांनी मालकीचा दावा केल्यानंतर या कार शेडच्या प्रस्तावाला स्थगिती मिळाली . आणि त्यावरून अद्यापही याबाबत शिवसेना भाजपात किती राजकीय घमासान सुरु आहे हे तुम्हाला माहीत असेलच .

आता तुम्ही म्हणाल की, मेट्रो कार शेडच्या कांजूरमार्गच्या जागेच्या वादाचा आणि शिरोड्याच्या या मिठागरांचा काय सबंध ? तसं पाहता या दोन्हीचा सुतराम सुध्दा सबंध नाही. पण हा सबंध जोडला जावा असं वाटण्याचं कारण म्हणजे मिठागरे आणि मिठागरांच्या जागेची ब्रिटिशकालापासूमची केंद्र सरकारची मालकी आणि ती राज्याकडे हस्तांतरीत करुन घेण्याबाबत असलेली प्रत्येक राज्य सरकारची अनास्था.

आता हे तुम्हाला माहीत असेलच की , गांधीजींनी 12 मार्च 1930 ला मीठाच्या सत्याग्रहाची हाक दिली आणि भारतात फक्त दोन ठिकाणी त्यावेळी मीठाचा सत्याग्रह झाला . एक दांडीला आणि दुसरा या इथे शिरोड्याला.

या परिसरात या सत्याग्रहाची साक्ष देणारी त्यावेळची दोन झाडं अद्यापही जिवंत आहेत. एक पिंपळाचं आणि एक वडाचं. प्रत्यक्ष गांधीजी इथे आले नाहीत . पण मिळालेल्या माहितीनुसार , ब्रिटिशांनी लादलेला मिठावरचा अन्यायकारी कर नाकारण्यासाठी त्यांनी जी सत्याग्रहाची हाक दिली त्या हाकेला ओ देउन 12मार्च च्या सात दिवस आधीच या शिरोड्यात या सत्याग्रहाची तयारी चालली होती .

सत्याग्रहाच्या वेळी सामुहिकरित्या मीठ लुटायचं असेल तर ते आधी सबंधीत लीज धारकाकंडून विकत घ्यायला लागेल हे ओळखुन त्यावेळचे शिरोड्यातले मोठे व्यापारी तात्यासाहेब खटखटे यांनी सत्याग्रहाच्या आधी सात दिवस शेकडो मण मीठ विकत घेतलं असं या सत्याग्रहाबाबत सांगितलं जातं. पण त्याहीपेक्षा महत्वाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा हा आहे की , गेल्या पंधरा वीस वर्षांपासून गांधीजींच्या मीठाच्या सत्याग्रहाच्या आठवणी जपणाऱ्या महाराष्ट्रातील या एकमेव जागेवर एक भव्य स्मारक व्हावं यासाठी प्रत्येक सरकारकडून आश्वासनं दिली जातायत . पण त्यासाठी लागणारी इथली दोन एकर जागा , जी केंद्र सरकारच्या मिठागर आयुक्तांच्या अखत्यारीत येते .ती अजूनही राज्य सरकारकडे हस्तांतरीत झालेली नाही.

दुर्दैवाने गांधीजींचं नाव घेण्याऱ्या एकाही राजकीय पक्षाला याबाबत आस्था नाही. सर्व राजकीय पक्षांच्या सर्व दिग्गज नेत्यानी या परिसराला आत्तापर्यंत भेट दिली आहे .

केंद्र सरकारकडून ही जागा अद्यापही राज्य सरकारच्या अखत्यारीत आलेली नाही . त्यामुळे या ऐतिहासिक स्थळावर स्मारक सोडाच पण या सत्याग्रहाचा उल्लेख करणारा साधा छोटा फलकही इतक्या वर्षात इथे लागलेला नाही. भारतातला एकमेव पर्यट्न जिल्हा म्हणून घोषीत झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने ही शरमेचीच गोष्ट आहे .

त्यामुळे कांजूरमार्गची मिठागराची जागा मेट्रो कार शेडसाठी केंद्राकडून राज्य सरकारकडे घेण्यासाठी ठाकरे सरकार जर आटोकाट प्रयत्न करीत असेल तर त्यासोबत ही शिरोड्याची जागाही त्यानी राज्य सरकारकडे घ्यावी आणि इथे मीठाच्या सत्याग्रहाच्या आठवणी सांगणारं एक स्मारक , ‘किंबहुना’ पर्यटकांना माहिती देणारं एखादं सुसज्ज दालन तरी लवकरात लवकर उभारावं. यातून मिठाला जागल्याचं भाग्यही मिळेल.

बाय द वे , मीठ काढून झाल्यावर पावसाळ्यात इथल्या काही आगरांमध्ये खाडीचं पाणी भरतं आणि त्यातुन भरपूर मासे प्रजननासाठी इथल्या काही आगरांमध्ये येतात . मग आपोआपच इथे मासळीची पैदास होते . पावसाळ्यात समुद्रातली मासेमारी बंद असल्यामुळे इथले मासे विकून चार पैसे आगर मालकांच्या गाठीला जमतात. एकदा या आणि बघा इथे मीठ कसं तयार केलं जातं ते !

 

 

 

 

दिनेश केळुसकर

नामवंत पत्रकार, साहित्यिक, राजकीय भाष्यकार

dineshkon@gmail.com

MediaBharatNews

Related Posts
comments
  • सिद्धार्थ गोपाळ तांबे

    March 7, 2021 at 10:31 am

    दिनेशजी, धन्यवाद… या माध्यमातून आपण राज्य सरकारचं लक्ष या ऐतिहासिक जागेवर वेधलात. शिरोडा ही त्या नंतरचा समाजवादी विचारांच्या चळवळीचं महत्त्वाचं ठिकाण राहिलंय. गांधीजींच्या मूठ सत्याग्रह आंदोलन स्थळी उचित स्मारक होऊन ते परियटनअनुकूल होऊन अधिक फलदायी ठरो!
    सिद्धार्थ गोपाळ तांबे.कणकवली
    मुख्याध्यापक, आरोंदा हायस्कूल आरोंदा

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!