मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
रवीशकुमार त्याच्या पत्रकारितेशी एकनिष्ठ आहे. सत्य, प्रामाणिकपणा आणि अभिव्यक्तिच्या सोबत तो स्वातंत्र्याने उभा आहे. त्यांच्याकडे व्यवस्थेला जाब विचारण्याचं साहस आहे, तितकीच त्याच्या जाब विचारण्यात विनम्रता आहे. त्याची पत्रकारिता उच्च दर्जाची तितकीच तत्ववादी आहे. जो सर्वसामान्यांचा आवाज बनतो, तो खरा पत्रकार, ही रवीशकुमारची धारणा आहे. तो मुक्यांचा आवाज आहे. रॅमन मॅगसेसे अॅवार्ड फाऊंडेशनने रवीशकुमारला पुरस्कार देण्यामागची जी भूमिका मांडलीय, तिचा हा भावानुवादीत सारांश.
भारतात सद्या सुरू असलेल्या हुकुमशाहीविरोधात रवीशकुमार सातत्याने बोलतोय. जणू हा आपल्याला वाटतंय, तेच बोलतोय, असं वाटत राहतं. त्यांचं बोलणं ऐकणाऱ्याला थेट भिडतं. मेंदूला झिणझिण्या आणतं. कार्यान्वित करतं. रवीशकुमार एक सम्यक विचारप्रक्रियेचा भाग व्हायला आपल्याला प्रवृत्त करतो. प्रेक्षकांना तो मूकदर्शक होण्यापेक्षा श्रोत्याच्या भूमिकेत आणून ठेवतो. प्रसंग, घटना, घडामोडी तो आहे तशाच लोकांसमोर मांडतो. त्याच्या मांडणीत स्पष्टता असते. पारदर्शीपणा असतो. त्याची बातमीदारी नितळ आहे.
भारतातील सद्याची चाटुकार भेसूर उन्मादी हिंसक पत्रकारिता रवीशकुमारच्या नैतिक अधिष्ठानासमोर पार उघडी नागडी पडली. स्वत:ला स्टार समजणाऱ्या पण हातातील माध्यमांचा वापर द्वेष, मत्सर, विखार पसरवण्यासाठी करणाऱ्या तथाकथित पत्रकारांवर रवीशकुमारने उघड हल्ला चढवला. तटस्थतेच्या आडून राजदरबारी गुलामी करण्याचा महामार्ग सोडून तो सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गल्लोगल्लीत फिरला.
रविशकुमारला मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. आपलाच सत्कार झाल्यासारखं वाटतंय.
– मुग्धा कर्णिक
भुयारी गटारात उतरून काम करणाऱ्यांपासून ते मानवी रिक्षा ओढणाऱ्यांपर्यंत प्रत्येक गोरगरीबाचा रवीश आवाज बनला. त्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. बेरोजगारांच्या संतापाला वाट करून दिली. सरकारी कर्मचाऱ्यांचं म्हणणं मांडलं. राज्यकर्त्यांच्या दडपशाही विरोधात भूमिका घेतली. ती जाहिरपणे मांडली. आपल्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांवर आरडाओरडा न करता, त्यांच्या अंगावर धावून न जाता, त्याने प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली आणि निर्भयपणे त्यांना प्रतिप्रश्न केले.
रवीशकुमारने निर्भीड पत्रकारितेची मोठी किंमत चुकवावी आहे. त्याला सतावण्याचा कोणताच मार्ग राज्यकर्त्यांनी सोडला नाही. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अर्वाच्य शिवीगाळ झाली. जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यांचा मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या समाजसमुहात समाविष्ट करून त्याला प्रचंड मनस्ताप देण्यात आला. त्याचा जिथे तिथे पाठलाग करून त्याला अस्वस्थ ठेवण्याचे सर्वतोपरी खटाटोप झाले.
या पुरस्काराने समाजमाध्यमात मोठं आनंदाचं वातावरण आहे. रविशला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 10- 12 लाख फेबु इम्प्रेशन्स आणि ट्विटरवर 1 तासात 12 हजार ट्विट्स..! यातून जरी रविशबद्दलच लोकांमध्ये असणार प्रेम दिसत असलं तरी अजून एक गोष्ट सिद्ध होतेय की,एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आहेत जी देशातल्या असहिष्णू वातावरणाविरोधात आवाज उठवणाऱ्या रविशच्या सोबत आहेत, म्हणजेच,असहिष्णुतेच्या विरोधात आहेत, अशी प्रतिक्रिया पुण्यातील मोहसीन शेख यांनी दिलीय. सत्तेची चाटूगिरी करणाऱ्या तमाम गोदीमिडियाची आज काय भावना असेल ?, असा खोचक सवाल ठाण्यातील पत्रकार रविंद्र पोखरकर यांनी केलाय. .अस्वस्थ करणार्या सर्व गदारोळात रवीशकुमारला मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त मन उल्हासीत करणारे ठरले आहे, असे पोखरकर यांनी म्हटले आहे. हि-याला पारखणारे भारताबाहेर आहेत, असं नमूद करून विक्रम राऊत म्हणतात की रविश कुमार यांना मिळालेला ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार हा अंधाधुंद भाजपाच्या कानफाटात भारताबाहेरच्या लोकांनी काढलेला सणसणीत जाळ आहे एवढं खरं. इथल्या भारतरत्नाचाच तो खरा मानकरी. पण हे ‘कांडवादी’ सरकार एवढं उदार होणार नाही. उलट या रत्नाला संपवायचा बराच प्रयत्न याआधी या सरकारकडून आणि त्यांच्या भूटार चेल्यांकडून झालाय. हे होणारच होतं. बाकी, इथून पुढेतरी माणसं रविश कुमार यांना व्यवस्थित ऐकतील, समजुन घेतील, पचवतील आणि मग काय करायचं ते ठरवतील अशी आशा करायला हरकत नाही. “जागल्या”कार सामाजिक कार्यकर्ते मिलिंद धुमाळे म्हणतात की आर्यवर्त ची सुरुवात कश्मीर मधून होत असताना एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांना मेगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला. भाजपच्या लोकशाहीविरोधी भूमिकांच्या विरोधातील एक आवाज म्हणून रविशकुमार यांच्याकडे पाहिलं जातं.मला यापेक्षा वेगळा मुद्दा मांडायचा आहे. रविशकुमार हे प्युअर हिंदी भाषिक पत्रकार आहेत.त्यांचं इंग्रजी फार चांगलं नाही, असं ते एकदा म्हणाले होते. त्यांचे कार्यक्रम कायम हिंदी भाषेतच असतात. हा मुद्दा यासाठी की भाषेचा न्यूनगंड न बाळगता आपल्या बोलीभाषेत आपण व्यक्त झालं पाहिजे. दुसरीकडे इंग्रजीतून कानठाळ्या बसवणारी पत्रकारिता असते अन अस्खलित इंग्रजी बोलणारे भारी समजले जातात. हा समज रविशकुमारने खोटा ठरवला.
रवीश काम करीत असलेल्या एनडीटीव्ही ची मुस्कटदाबी करण्याचा मार्गही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवलंबून पाहिला. पण जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात पत्रकारितेचं बाजारीकरण झालेलं असताना, धर्मांध शक्तींचा उन्माद माजलेला असताना, कट्टरतावाद, एकाधिकारशाही यांना लोकप्रियता प्राप्त होत असताना, त्याविरोधात उभा राहिलेला एक महत्त्वाचा आवाज म्हणजे रवीशकुमार या शब्दात वर्णन करून रॅमन मॅगसेसे अॅवार्ड फाऊंडेशनने मोदींच्या लोकशाहीविरोधी कारभाराला मोठी चपराक लगावली आहे.