उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या संकल्पनेतून "शून्य कचरा प्रभाग अठरा "ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षात एक जानेवारी २०२५ पासून ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
शून्य कचरा मोहिमेची पूर्वतयारी म्हणून उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प येथील कालीमाता मंदिर प्रांगणात स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आशा वर्कर, अंगणवाडी सेविका , नागरिक व उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांचं संयुक्त चर्चासत्र नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं.
मोहीम कशाप्रकारे राबविण्यात येणार आहे, नागरिकांनी कशा प्रकारे ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून द्यावा, याचं मार्गदर्शन या चर्चासत्रात करण्यात आलं.
शून्य कचरा मिशन यशस्वीपणे सर्व भारतभर राबवणाऱ्या अर्चना मोरे यांच मोलाचे मार्गदर्शन या बैठकीला लाभलं , त्यांनी अत्यंत प्रभावी पणे power point presentation च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कचऱ्याचं वर्गीकरण करून तो आपल्याला घरातच कसा संपवता येईल याबाबत अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं.
मिशन शून्य कचरा प्रकल्पा अंतर्गत महानगरपालिका व कंत्राटदार कोनार्क यांचे कर्मचारी कचऱ्याचं व्यवस्थित नियोजन करून संपूर्ण ओलाकचरा प्रभाग अठरामधील पीट्स मध्ये व कैलास काॅलनीच्या पीट्समध्ये टाकून त्याचं खत तयार केलं जाईल व सुका कचरा वेगळा दिला जाईल. अशाप्रकारे ८० ते ९० % कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल.
शाळांमध्येसुद्धा शून्य कचरा मिशन राबविण्याबद्ल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे हे मिशन यशस्वी झाल्यानंतर सर्व प्रभागात राबवले जाणार आहे. अशाप्रकारे उल्हासनगर थोड्याफार प्रमाणात का होईना कचरा मुक्त होण्यास सुरुवात होऊ शकते व डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा कमी होऊ शकतो.
सद्य परिस्थितीत उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने तिथे कचरा टाकण्यास जागाच नाही, तरीही तिथे कचरा टाकला जातो, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास हे डम्पिंग ग्राउंड हटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
या चर्चासत्रात उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्त मयुरी कदम, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, आरोग्य विभागाचे अधिकारी मनीष हिवरे, सर्व स्वच्छता निरीक्षक, तसंच प्रभाग अठरामधील सिटीझन फाउंडेशनचे प्रदीप कपूर, अनिल शर्मा, विशाल सोनवणे, संतोष मिंडे, अमोल राऊत, शिरीष पगारे, मालती गवई, प्रा.सिंधूताई रामटेके, मंगला मुजुमदार, महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी स्वयंसेविका व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.