व्यवस्थेला जाब विचारणारा शायर …!!

व्यवस्थेला जाब विचारणारा शायर …!!

व्यवस्थेला जाब विचारणारा शायर …!!

दिलों में आग लबों पर गुलाब रखते हैं ..
सब अपने चेहरों पे दोहरी नक़ाब रखते हैं !

प्रत्येक जण इथे मुखवटा लावून फिरतो. माणसांना ओळखणं कठीण होऊन बसलं असताना राहत यांची अशी सत्याच्या जवळ जाणारी शायरी मनाला भिडते. आयुष्यातील अशा कित्येक न उलगडणाऱ्या प्रश्नांना अगदी सरळ सोप्या भाषेत शायरीच्या, कवितेच्या माध्यमातून पेश करणारा अवलिया म्हणजे राहत इंदोरी ! खरं तर मूळचे कुरेशी पण इंदोरमधला जन्म आणि कार्यकाळ, म्हणून इंदोरी हे बिरुद मिरवणारा एक खमका शायर …!

‘खमका’ यासाठी की निर्भीडपणे ते आपल्या काव्यातून, शायरीतून न घाबरता “सियासत की धज्जिया” म्हणजे सत्तेतील लोकांचे कपडे उतरवत असत. अन्याय,अत्याचार करणाऱ्यांवर शब्दांच्या जुगलबंदीतून असे काही ताशेरे ओढत कि त्यांच्या मुशायऱ्यांमधून “वाहवा” चा नाद दुमदुमत राहायचा.

आयुष्याचा फलसफा (तत्वज्ञान), आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा निकोप असावा, इन्सानियत काय असते, याचे दाखले देताना राहत यांची शायरी प्रेक्षकांच्या मनाचा तळ गाठते.

खरं पाहता शायर, कवीच सोप्या भाषेत आयुष्याचं प्रमेय सोडवून सोप्या पद्धतीने मांडू शकतात.

एका ठिकाणी ते म्हणतात,

आँख में पानी रखो होंठों पे चिंगारी रखो,
ज़िंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो.

जन्माला आलोय तर आयुष्य जगायला, नव्हे आनंदात, स्वाभिमानाने जगता यायला हवं, मग ते जगत असताना खूप अडथळे येतील त्यासाठी मनाची तयारी करावी लागेल.

सुमार प्रसिद्धीसाठी जिथे आजकालचे टुकार शायर, कवी कुठल्याही पातळीला जातात. अशा कुठल्याही फुटकळ मार्गाने न जाता आपल्या शायरीचा लॊकिक, पातळी राहत कायम ठेवतात किंवा प्रत्येक शायरीत ती उंचावलेली तरी असते. प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते. एखाद्या दीर्घ कवितेचा संपूर्ण सारांश दोन ओळींच्या शेरात सामावण्याचं कसब राहत इंदौरी यांना अवगत होतं आणि हीच कला त्यांना एक महान शायर आणि एक उमदा मनुष्य म्हणून समोर आणते.

एखादा शायर प्रसिद्ध तेव्हा होतो, जेव्हा त्याचे शेर लोक लक्षात ठेवतात, पारायणे करतात. राहत यांच्या लिखाणाबद्दल असंच काहीसं चित्र दिसून येतं, ” बुलाती है मगर जाने का नहीं … ” त्यांच्या या शायरीला तर टिकटॉकपासून वॉट्सअपपर्यंत आणि फेसबुकपासून इंस्टाग्राम पर्यंत सर्वांनी डोक्यावर घेतलं, व्हायरल केलं यावरून हे लक्षात येईल.

उर्दू साहित्यात एम ए, पी एच डी घेतलेला हा सर्वसाधारण दिसणारा व्यक्ती जेव्हा जेव्हा मुशायऱ्यांच्या मंचावर असतो, तेव्हा प्रेक्षक कानात आणि डोळ्यांत जीव आणून त्यांना पाहत आणि ऐकत असतात. स्टेज कसा ताब्यात घ्यायचा, आपल्या आवाजाच्या, देहबोलीच्या आणि शब्दफेकीच्या अफाट शैलीने प्रेक्षकांच्या मनावर कसं गारुड करायचं, हे राहत यांच्या मुशायरांमधून शिकायला मिळतं. शायरी किंवा कविता वाचण्याची एक वेगळी शैली असते, शब्द जड असले तरी भाव लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे

राजकारणात जिथे सत्ता आणि पैसे मोठा होत जातो आणि जनतेला ‘जर्रे की किमत’ उरत नाही तिथे शायर कवी गप्प राहतील तर नवलच, नाही का ?

राहत एके ठिकाणी म्हणतात,

मिलाना चाहा है इंसा को जब भी इंसा से,
तो सारे काम सियासत बिगाड देती हैै

राजकारण, धर्मकारणच्या नावाखाली जिथे निष्पाप, बेगुनाह लोगोका खामखा’ जीव जातो तेव्हा राहत यांची कलम बोलते

जहाँ से गुजरो धुंवा बिछा दो
जहाँ भी पहुचो धमाल कर दो
तुम्हे सियासत ने हक दिया है,
हरी जमीन को लाल कर दो”

एका ठिकाणी अगदी मिश्कीलपणे राहत म्हणतात,

चोर उचक्को की करो कद्र, की मालूम नहीं
कौन कब कौनसी सरकार में आ जायेगा

आपलं या देशावर किती प्रेम आहे हेसुद्धा आपल्या शायरीमध्ये राहत इतक्या सुंदर पद्धतीने मांडतात कि वाचणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनाचा तळ ढवळून निघावा

सभी का खून शामिल यहाँ की मिट्टी में,
किसी के बाप का हिंदुस्तान थोडी हैं ..”

किंवा ..

मै जब मर जाऊ तो
मेरी अलग पेहेचान लिख देना,
लहू से मेरी पेशानी पे
हिंदुस्तान लिख देना ..

शायर कवी तुमची आमची ख़ुशी, गम, प्यार, विरह, जलन, राग सर्व भावना आपल्या ओळींमध्ये पेरत असतो, लिहिलेल्या ओळींची मशागत करत असतो

असा कुठला प्रांत नाही, असा कुठला विषय नाही ज्यावर राहत यांनी शायरी केली नाही, अशा त्यांच्या कित्येक शायरी कविता आहेत, ज्या त्यांचं फक्त नाव गुगलवर टाकलं तरी लगेच तुम्हाला वाचायला मिळतात. त्यांची कित्येक गाणी हिंदी सिनेमांमध्ये आली आहेत.

राहत यांना एका लेखात काय एका पुस्तकात देखील बंद करता येणार नाही इतके अखंड आणि प्रदीर्घ आहेत ते ! त्यांच्या जाण्याने मुशायऱ्यांच्या अवकाशात एक पोकळी निर्माण होईल खरी, पण याच शायरीतून ते आपल्यात जिवंत राहणार आहेत. आपण त्यांना जिवंत ठेवणार आहोत. कारण ते म्हणतात ..

अब ना मैं हूं , ना बाकी हैं जमाने मेरे,
फिर भी मशहूर हैं शहरो में फसाने मेरे …

शेरो शायरींचा बादशहा राहत इंदौरी यांना अखेरचा सलाम ….

 

 

अमोल गायकवाड

सिनेनाट्यकला समीक्षक / सामाजिक कार्यकर्ते / कायद्याने वागा लोकचळवळीचे मुंबई समन्वयक

MediaBharatNews

Related Posts
comments
  • योग्य शब्दात राहतजी ना ….सादर केलं

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!