आपल्या मनातून जातीधर्माचा राँग नंबर काढून टाकला पाहिजे !!

आपल्या मनातून जातीधर्माचा राँग नंबर काढून टाकला पाहिजे !!

आपल्या मनातून जातीधर्माचा राँग नंबर काढून टाकला पाहिजे !!

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ लिखीत “ब्राह्मण्यवाद्यांनी बॉम्बस्फोट केले, मुस्लिम लटकले” या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन १३ ऑगस्ट २०१९ रोजी झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी त्यांची परखड व स्पष्ट मते मांडली. त्यांचे भाषण विस्ताराने येथे देत आहोत.

मित्रांनो, या पुस्तकाचा विषय गंभीर आणि महत्वाचा आहे. हे पुस्तक लिहिणे धाडसी काम आहे आणि असे लिखाण प्रामाणिक माणूसच करू शकतो. या पुस्तकाची मांडणी स्पष्ट आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर, बॉम्बस्फोट वाढले. त्यामुळे मुस्लिम बॉम्बस्फोट करतात ही हवा निर्माण केली गेली. मी स्वतः हिंदू असल्याने जज् म्हणून काम करताना हिंदू बॉम्बस्फोट करू शकत नाही हे मला वाटत होते. हिंदू बॉम्बस्फोट करतील असा विचारही केला जात नव्हता. हेमंत करकरे यांनी मालेगाव प्रकरणातून हे लोकांच्या समोर आणले. यापुर्वी फक्त मुस्लिमांना त्रास देण्यासाठी त्यांना बॉम्बस्फोट प्रकरणात गोवले गेले. अशा अनेक प्रकरणांचा व्यवस्थित तपास केला असता तर यामध्ये वेगळेच काही तरी समोर आले असते. तसा तपास मुद्दाम केला गेला नाही, हे लेखकाने स्पष्टपणे मांडले आहे.

जज् म्हणून काम केल्याने मी कोणी काही सांगितले तर त्यावर लगेच विश्वास ठेवत नाही. पोलिस महासंचालक या जबाबदार पदावर काम केलेल्या मुश्रीफ यांनी बॉम्बस्फोटाच्या तपासाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत, याची चर्चा झाली पाहिजे. जर त्यांनी खोटे, भावना भडकवणारे लिखाण केले तर बंदी पुस्तकावर बंदी आली असती, गुन्हा दाखल झाला असता. पण तसेही काही झालेले नाही. तरीही आपल्या लोकांना झालेय काय हे कळत नाही. ना ते याचे खंडण करतात ना मान्य करतात. याबद्दल काही तरी भूमिका घेणे आवश्यक आहे. यावर चर्चा केली पाहिजे. तरीही मी मुश्रिफ यांच्या धाडसाचे कौतुक करतो.

“ब्राह्मण्यवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले” या पुस्तकांच्या शिर्षकाबद्दल आक्षेप घेतला जात आहे. मी या कार्यक्रमाला जाणार आहे, असे कळल्यावर मला माझ्या काही जवळच्या लोकांनी, हितचिंतकांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, तुम्हाला त्रास होईल असे सांगितले होते. पण मी त्यांचे एेकले नाही. या पुस्तकाचे हे शिर्षक मलाही भडक वाटत आहे. महर्षी कर्वे, आगरकर, रानडे असे अनेक चांगले सुधारक ब्राह्मण होते. हे पुस्तक ब्राह्मण विरोधक आहे असे वाटू नये म्हणून शिर्षक वेगळे असायला पाहिजे होते. शीर्षकावरून पुस्तक तसेच असेल असे ही नाही.

शीर्षकामुळे वादग्रस्त ठरलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला आल्यावर तपास यंत्रणा, त्यांच्याकडून सादर केले जाणारे पुरावे यामुळे यावर निवृत्त न्या. अभय ठिपसे यांनी ताशेरे ओढलेच; पण चिंताही व्यक्त केली. ‘आपण अजूनही जातीपातीत अडकले आहोत, आपल्यातील आकस संपला पाहिजे. चुकीला चुक म्हटलेच पाहिजे, आपण हिंदू बहुसंख्य म्हणजे चुक वागणार नाहीत हा अहंकार सोडला पाहिजे,’ असे त्यांनी आवर्जून सांगितले.

या पुस्तकातील प्रत्येक घटना, तपास, निकाल यावर मी बोलू शकत नाही, त्याचे डिटेल्स पाहिले पाहिजे. पोलिस अनेक केसेस मध्ये खोटा पुरावा देतात, याचा मलाही अनुभव आहे. जगभरातही पोलिस असेच वागतात. परंतु अशा प्रकरणात तुम्हाला विशिष्ट समाजाचा संशय येतो का, दुसरा समाज (अमुक गोष्ट) करू शकत नाही, असे वाटत असेल तर गंभीर गोष्टी आहे. यामागे मोठा कट आहे. यात गुप्तहेर संस्था यात सहभागी आहे, हे खरे असेल तर याचे खंडण केले पाहिजे. मुश्रीफ यांच्या गोष्टी खोट्या निघाल्या तर मला आनंद होईल. पण या संस्था अशा प्रकारे काम करत असतील तर हे भयानक आहे, याची शहानिशा झाली पाहिजे. यामागे कोणाचा डाव आहे का, याचे खंडण झाले पाहिजे किंवा मान्य केले पाहिजे.

काही लोकांना वाटत होते की हिंदू संघटना बॉम्बस्फोट करू शकत नाही. असं मला(ही) वाटत होते. पण आपण दांभिकपणा सोडला पाहिजे. हेमंत करकरे यांनी मालेगावचे प्रकरण समोर आणले. अजमेर प्रकरणात बॉम्बस्फोटात हिंदूंना शिक्षा झाली आहे. पण हे हिंदू का मान्य करत नाहीत? या विषयावर आपण का बोलत नाहीत? जर हा आपला देश असेल, आपल्या देशात हिंदुत्ववादी संघटना बॉम्बस्फोट करत असतील तर हे आपले ही शस्त्रू आहेत.

जर्मन बेकरीत निर्दोषी (व्यक्तीला) फाशीची शिक्षा सुनावली होती. (हिमायत बेग याला जर्मन बेकरी प्रकरणात आधी फाशीची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली होती. मात्र, त्याच्यावरील काही आरोप हायकोर्टात सिद्ध झाले नाहीत. त्याची फाशी जन्मठेपेमध्ये बदलण्यात आली.) पण हे चुकीचे आहे. हिंदूत्ववादी बॉम्ब तयार करताना सापडले. (अन्यथा) त्यांच्यावर कोणी संशय घेतला नसता. कायदेही विचित्र बनलेले आहेत. एमसीओसी, टाडा कायद्याचा दुरुपयोग केला गेला. टाडामध्ये दोन टक्के गुन्हे सिद्ध झालेत. गुजरातमध्ये याचा वापर जास्त केला गेला. मला राजकारणात जायचे नाही. पण पोलिसांनी आहे त्या कायद्यांचा योग्य वापर केला तर विशेष कायद्यांची गरज पडणार नाही.

बॉम्बस्फोट घडवून आणणाऱया हिंदू संघटना आमच्या प्रतिनिधी नाहीत हे ठणकावून सांगतानाच माजी न्यायमूर्ती ठिपसे यांनी आपल्या ५३ मिनीटांच्या भाषणात पुस्तकाच्या शीर्षकावरही टीप्पणी केली. ‘शिर्षक भडक झाले आहे, दुसरा शब्द वापरायला हवा होता,’ असे मत न्या. ठिपसे यांनी मांडले.

न्यायाधीश जामीन नाकारतात. ते मुद्दाम (असे) करत नाहीत. बहुसंख्य न्यायाधिश हे योग्य निर्णय देतात. ते कायदाचे तज्ज्ञ असतात. बाकीचे वातावरण काय आहे याचा काही प्रमाणात फरक पडतो. जो आपली भाषा बोलणारा, अन्न खाणारा, वागणारा असला की त्याचा प्रभाव पडतो. पण दुसरा असेल विश्वास बसत नाही. अशा प्रकरणात होते,  पण हे आपण मान्य करत नाहीत. न्याय व्यवस्थेवर पडणाऱया प्रभावाबाबत अमेरिकेत, युरोपात जाहीरपणे बोलले जाते व मान्य केले जाते. न्यायाधीश म्हणून तो माणूस म्हणून कसा आहे? त्याची जीवन म्हणून ते काय मूल्य आहेत? त्याचा परिणाम पडतो. आपल्याही लहानपणी शिकवले गेले असते.

पुर्वीच्या ‘एनडीए’ सरकारमधील एक मंत्री माझे मित्र आहेत, त्यांनी खासगीत बोलताना हे मान्य केले की त्यांना लहानपणी मुस्लिमांपासून दूर रहायला सांगितले आहे. हे त्यांना सहज सांगितले होते. पण ते मनात कुठे तरी बसलेले असते. अशाच प्रकारे न्यायाधिश कोणत्या वातावरण वाढतो? त्याची जडणघडण कशी होत? त्याचे विचार कर याचाही फरक केसवर होतो.

हा बायस आपल्या समाजात आहे. हा भेद मनातून काढायचा कसा? हा भेदभाव मान्य करायची तयारी नाही. या आकसाचे करायचे? जोपर्यंत हिंदूंना मुस्लिमांबद्दल आणि मुस्लिमांना हिंदूंबद्दल आकस आहे तोपर्यंत यावर चर्चा होऊ शकत नाही.

अनेक राजकीय पक्ष एकाची बाजू घेतली की दुसरा समाज नाराज होतो. त्यामुळे कोणीच खरे बोलत नाही. समाजात समानता येत नाही, तोपर्यंत राजकीय समानतेला अर्थ नाही. समाज वैफल्यग्रस्त आहे. त्याला भविष्याची चिंता असते. तो आपल्या वैफल्याला कोणाली तरी जबाबदार धरत असतो. याचे कारण म्हणजे भेदभाव आहे.

देशातील हिंदू बॉम्बस्फोट करण्यात इंट्रेस्टेड नाहीत, पण हिंदू बॉम्बस्फोट करतच नाहीत, असेही नाही. हिंदू करतच नाहीत असे खोटे बोलण योग्य नाही. हिंदूंनी बॉम्बस्फोट केलाय याचा निषेध हिंदूंनी केला पाहिजे.

दुसरे म्हणजे देशभक्ती. देशभक्ती म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येते? देशाचा फक्त नकाशा येतो का? देश कशाला म्हणतात?  यंत्रणा संवेदनशील असाव्यात. पण नॅशनल इंटरेस्टच्या नावाखाली पूर्वाग्रह दुषीत(पणा) असू नये. निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये. तो जर आपला शत्रू झाला तर त्याला तो नाही तर समाज जबाबदार आहे. निर्दोष असताना शिक्षा भोगणे किती भयानक असेल, किती संकटांना तोंड देत असेल तो याचा विचार करावा.

आपल्या देशाचा इतिहास जुना आहे. धर्म आहेत. त्यात भर म्हणून जाती आहेत. सगळे शिक्षण, पैसा, संपत्ती सर्व काही व्यवस्थित असून दुसऱ्या जातीत लग्न केले म्हणून धाय मोकलून रडत असतात. आपण वरवरची मलमपट्टी करतो. हा बायस नष्ट झाला पाहिजे. जातीच्या मनात खुळचट कल्पना आहेत. त्या बाहेर काढल्या पाहिजेत.

या पुस्तकाच्या शिर्षकातील ब्राह्मणवादाला पर्यायी शब्द असला पाहिजे होता. मला तर असा अनुभव आला आहे की ब्राह्मणांपेक्षा हिंदूतील इतर जातीतील लोक जास्त कडवे व मुस्लिम विरोधी वाटले आहेत. हा बायस गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे हे पुस्तक जागृत होण्यासाठी आहे.

दुसरा समाज वाईट आहे, हे जे आपल्या मनात आहे ते बाहेर काढले तर या गोष्टी सुधारतील. अमीर खानच्या ‘पीके’ पिक्चरमध्ये एक राँग नंबर फिक्स केलेला असतो. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा वाटत असतो. आपलेही तसेच झाले आहे. आपल्या मनातूनही जातींचा, धर्माचा राँग नंबर काढून टाकला पाहिजे. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय? एक उतरंडीवर राष्ट्र निर्माण करायचे आहे का? उतरंडीने समाज सुखी होणार आहे क?

एक गोष्ट कायम सांगितले जाते…रामाच्या राज्यात रामावरच टीका केली होती. पण रामाने काही केले नाही. आता कोणावर टीका करायची स्थिती नाही. खरे बोलता येत नाही. मग रामराज्य नावाच्याखाली दहशत निर्माण कशी करू शकता? मुश्रीफ यांना पुस्तक लिहिण्याचा अधिकार आहे. हा त्यांचा अधिकार कोणाही काढून घेऊ शकत नाही.

बॉम्बस्फोट प्रकरणांचा तपास करताना पोलिस, तपास यंत्रणेवर राजकीय दबाव येतो. न्याययंत्रणेवर दबाव येत नाही. तसा अनुभव मला नाही. पण आपल्या मनातील बायस आहे त्याचे काय करायचे? मुस्लिमांविरोधात एकत्र आलो म्हणून हिंदू एक होत नाही. हेही लक्षात घेतले पाहिजे. मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी बॉम्बस्फोट करणाऱया संघटना या हिंदूच्या प्रतिनिधी अजिबात नाहीत. हे आपण ठामपणे सांगितले पाहिजे. यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.

 

———–सकाळ-———मधून साभार

 

लेखाखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर नोंदवा.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!