गेले आठवडाभर हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन कंपनीच्या एका अहवालामुळे खळबळ माजली आहे.
त्यांच्या आरोपानुसार अदानी समूहाने अनैतिकरित्या आपल्या शेयर्सची किंमत वाढवली आणि नंतर तेच शेयर बँकांमध्ये गहाण ठेवून पैसे उभारले. याविषयी अनेक बातम्या, youtube व्हिडिओने समाज माध्यमं, वर्तमानपत्रं भरलेली आहेत.

अदानी समूह सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. शेयर विक्रीमधून २०,००० करोड उभारण्याचा संकल्प कंपनीने केला होता, नेमकं त्याचदरम्यान हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यामुळे सगळी गडबड झाली. कर्मचाऱ्यांसाठी राखीव आणि वैयक्तिक गुतंवणूकदार यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही , मात्र अनेक म्युच्युअल फंड , LIC सारख्या संस्थांनी बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन ते शेयर घेतले (कारण जाणकार समजू शकतील) आणि कसाबसा अदानी समूहाचा FPO पार पडला. मात्र यावर टीका होऊ शकते ; त्यामुळे अदानी समुहाने FPO मागे घेऊन सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत करत असल्याचे सांगितले.
उलट सुलट बातम्याचं पेव फुटलं आहे. मात्र एक सामान्य गुतंवणूकदार म्हणून शेयरच्या किंमतीमागचं नक्की काय गणित असतं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची एकूणच भारतातील नक्की काय स्थिती आहे हे समजून घेण्यासाठी थोडा धांडोळा घेतला.
भारतातल्या सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या २५ कंपन्या, अदानी समूहाच्या कंपन्या याचा तुलनात्मक धांडोळा घेतला. त्यांचं वार्षिक उत्पन्न, त्यावर त्यानी सरकारला जमा केलेला टॅक्स , त्या शेयरची आजची किंमत, कंपनीच्या पुस्तकातील त्या शेयरची किंमत बघितली. शेयरची किंमत साहजिकच मागणी आणि पुरवठा यावर ठरते, पण तरीही शेयर स्वस्त आहेत कि महाग यासाठी काही तरी ठोकताळे आहेत का हे तपासले.

सर्वसाधारणपणे शेयर किमतीचा PE किंमत-ते-कमाई गुणोत्तर हे एखाद्या कंपनीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरले जाते, शेयरची आताची किंमत ते प्रति शेअर कमाई (EPS). TTM PE हा मागील १२ महिन्याची सरासरी PE असतो. PE जितकी कमी असेल तितकी शेअर्सची किंमत स्वस्त मानली जाते आणि PE जास्त असेल तर शेअरची किंमत महाग समजला जाते.
कधी अतिशय आक्रमक कंपन्या ज्याची वाढ खूप जोमाने होईल असे गुंतवणूकदारांना वाटते अश्या कंपन्यांचा PE जास्त असतो.
याचा अर्थ असा नाही की PE कमी असेल तेच शेयर विकत घ्यावे. कदाचित या कंपनीचे भविष्य आश्वासक नाही असे गुंतवणूकदारांना वाटत असते , त्यामुळे देखील त्यांचा PE कमी असू शकतो.
भारतीय नवउद्यमी कंपन्या खूप जोमाने वाढतील अशी गुंतवणूकदारांना आशा असेल तर अश्या कंपन्याचा देखील PE खूप जास्त असू शकतो. पण त्या कंपन्यांनी अपेक्षित व्यावसायिक result नाही दाखवले तर त्यांची कशी वाताहत होते हे पण आपण गेल्या काही दिवसात PayTM , Zomato, Delhivery अश्या अनेक कंपन्यांमध्ये पाहिलं आहे.
२०२२ मधला राष्ट्रीय शेयर बाजातील निर्देशांकामधील कंपन्यांचा सरासरी वार्षिक PE २१.४७ आहे
भारतातील आघाडीच्या २५ कंपन्या आणि अदानी समूहाच्या सहा कंपन्या यांची तुलनात्मक माहिती खाली दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्वसाधारण शेयर किमतीच्या ५०% पर्यंत कर्ज देता येते (circular DNBS (PD).CC.No.408/03.10.001/2014-15 dated August 21, 2014)
हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाचे अनेक कंपन्यांचे शेयर फक्त आठवडाभरात निम्यापेक्षा किंमत खाली आले आहेत
यावर रिझर्व्ह बँक आणि समूहाला कर्ज देणाऱ्या बँका काय करतात ते पाहणे औत्सुक्याचे असेल.
नितीन शेठ
टीप:- लेखकाची अदानी ग्रुप मध्ये कोणतीही वैयक्तिक गुंतवणूक नाहीये. मात्र शेयर मार्केट आणि म्युच्युअल फंड यात वैयक्तिक गुंतवणूक आहे,