अफवा निराकरण करणारी यंत्रणा कृषी मंत्रालयाकडे हवी !

अफवा निराकरण करणारी यंत्रणा कृषी मंत्रालयाकडे हवी !

अफवा निराकरण करणारी यंत्रणा कृषी मंत्रालयाकडे हवी !

एका प्रसिद्ध टिव्ही चॕनलने बातमी चालवली की टोमॅटोमुळे करोना पसरतो. कुठलीच ठोस माहिती नसताना एका चॕनलने ही बातमी पसरवण्यामागे त्यांचा काय हेतू असावा त्यांनाच माहित. पण आपल्या एका बातमीमुळे बळीराजाचं काय नुकसान होऊ शकतं, हा साधा नैतिक विचारही त्यांनी केला नाही.

भाग चौथा

साधारणपणे फेब्रुवारी-एप्रिल ह्या महिन्यात टोमॅटोची मागणी अचानक घसरली.टोमॅटो ह्या पीकाला दोन दिवसात बाजार मिळाला नाही तर ते नाश पावतात. पण इथे चक्क ३ महिने बाजारातून मागणी घटली आणि टोमॅटो शेतात सडले. टोमॅटोच उभं रोप उपटवून काढण्याची वेळ शेतक-यावर आली.

हॉटेल, टोमॅटो प्रक्रिया उद्योग ठप्प असल्याकारणाने किमान भाजीसाठी टोमॅटोची होणारी मागणीही एका अफवेने थांबवली. हे नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणावर होतं की राज्यातील जेष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना टोमॅटो उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे करावी लागली.

देशातील तथाकथित स्वदेशीचा प्रसार करणा-या लोकांनी सोशल मिडियावर बॕन चायना ही मोहिम राबवली. चायनिज मालाचा बहिष्कार करा हे वेळोवेळी लोकांवर बिंबवण्यात आलं. त्या सोबतच एक अफवा जोडली. बाजारातील १०० कीटकनाशकांपैकी ४०-५० कीटकनाशके हे चायना मधून येतात आणि कोरोनाचा उगम चीन मध्ये झाल्याकारणाने त्यातून कोरोणाचा विषाणू पसरु शकतो ! बस एवढी माहिती मिळाली आणि ब-याच शेतक-यांनी कीटकनाशकांची फवारणी थांबवली. ह्याचा थेट परिणाम उत्पनावर झाला.

स्वदेशीच्या भंपक आंदोलनात गायीचं महत्व कशाप्रकारे पटवून दिलं जातं, हे तुमच्यापर्यंत आलेल्या मेसेजेस मधून पोहचल असेल. गायीच्या दुधाचं इतकं प्रमोशन झालं की म्हशीच्या दुधाची मागणी घटली. ग्रामीण भागातील शेतक-यांकडे गायींपेक्षा म्हशीच्या दुधाचं प्रमाण जास्त आहे. हॉटेलही बंद, चहाटप-याही बंद, बेकरी उद्योगही ठप्प अशा काळात स्वदेशीच्या आंदोलनात म्हशीच्या दुधाचा वैयक्तिक ग्राहकांकडून होणारी मागणीही घटली. ह्यामुळे दुग्ध व्यवसायावर प्रचंड मोठा परिणाम झाला.

आपल्या देशातला मुस्लिम समाज हा उद्यमी समाज म्हणून ओळखला जातो. बरेचशे मुस्लिम बांधव शेतीसबंधी व्यवसाय करतात. मालाच्या वाहतूकीपासून ते शेतमालांच्या विक्रीपर्यंत अशी पुरवठा साखळी तयार करण्यात ह्या समाजाचा मोठा हात आहे. पण मरकजमधल्या मुसलमांनानीच भारतात कोरोना पसरवला ही बातमी अगदी तळागाळापर्यंत पसरली आणि शेतक-यांच्या मनात तर ती इतकी घर करुन बसली की मुस्लिम व्यापा-यांना त्यांनी मालाचा होणारा पुरवठाच बंद केला.

मुस्लिम समाज संशयाच्या भोवर्यात असा उभा केला गेला की त्यांच्याकडून लोकांनी भाजीपालाही घेणं बंद केल. बऱ्याच शेती प्रक्रिया उद्योगात हा समाज समाविष्ट असतो. एका नियोजित बातमीने शेतीशी जोडला गेलेला मुस्लिम समाज झटक्यात बाहेर फेकला गेला आणि त्यातून झालेलं नुकसान हे आर्थिक आहेच, पण माणुसकीची झालेली अवेहलना आपण कोणत्या परिमाणात मोजणार आहोत?

मुंबई महानगर पालिकेने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती ‘प्राण्यांच्या जवळ जाऊ नका, त्यांना स्पर्श करु नका’ ! ह्या जाहिरातीत प्रतिकात्मक प्राणी म्हणून कुत्रा वापरला. हा मेसेज पसरायला फार वेळ लागला नाही. प्राणी आणि कृषी हे नातं नव्याने सांगण्याची गरज नाही, जोपर्यंत ही जाहिरात मागे घेण्यात आली तो पर्यंत होणारं नुकसान व्हायचं ते झालेलंच होतं.

शहरी लोकांकडे अफवा पडताळून पाहण्याची बरीच माध्यमं आहेत; पण ग्रामीण भागात अफवा पडताळून पहाण्यासाठी जी माध्यमं आहेत, ती पोहचलेली नाहीत. ब-याचदा फॕक्ट चेक हे इंग्रजी किंवा हिंदी माध्यमांतून असतं ते प्रत्येकाला समजेलच असं नाही. त्याचा आवाका हा मर्यादित वर्गापुरता आहे.

,

टरबूज आंब्यामध्ये कोरोनाच इंजेक्शन मारलेलं असतं, टोमॅटो मधून करोना होतो, अमूक उत्पादन चायनिज आहे अशा एक ना अनेक अफवांमधून झालेल शेतक-यांच नुकसान हे अफाट आहे. ते किती झालं हे मोजण्यासाठी सध्या तरी कुठलीही योजना शासनाकडे नाही. पण अफवा ह्या कोणत्याही शेतीवर पडणाऱ्या रोगांइतक्याच भयानक असतात. कृषीमंत्रालयांला पुढाकार घेऊन अफवा पडताळून पाहणारी व त्यांचं निराकरण करणारी नवी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, जेणेकरून येणा-या काळात शेतीचं होणारं मोठं नुकसान टाळता येईल.

अंकुश हंबर्डे पाटील

समाजसेवा पदवीधर युवा लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक व मिडिया भारत न्यूजचे कार्यकारी संपादक  आहेत.


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!