१८४४ नंतर अजिंठा पुन्हा जगासमोर आणला तो जगविख्यात प्रतिभावंत कलावंत चित्रकार मेजर रॉबर्ट गिल ह्याने. त्याला साथ दिली लेणापूरची आदिवासी युवती पारोने ! त्या पारोच्या स्मारकाची खूप जपणूक करूनही कोणीतरी या पाच-सहा वर्षात खराब केलं. संगमरवरावर कोरलेल्या अक्षरांची मोडतोड केली. एवढा महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज सुद्धा आपले लोक जतन करू शकत नाही याचं खूप दुःख आहे, अशी प्रतिक्रिया नामवंत साहित्यिक ना. धों. महानोर यांनी आज पारोच्या स्मृतिदिनी व्यक्त केलीय.
महात्मा गौतम बुद्धांचा अजिंठा. जगाला शांतीचा व विचारांचा मार्ग दाखविणारा अजिंठा. निस्सीम सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं चित्र-शिल्प, त्याचं लावण्य, सुमारे दोन हजार वर्षे अंधारात बुडालेला अजिंठा. अत्यंत भयावह, हिंस्र प्राण्यांनी वेटाळलेलं घनदाट जंगल. तेथे अहोरात्र बारा वर्षे राहून हातातल्या कुंचल्यांनी रॉबर्ट गिल यांनी अजिंठातल्या सौंदर्याचं दर्शन जगाला दाखविलं.
प्रतिकात्मक चित्र : अजिंठा सिनेमातील दृश्य
अत्यंत कठीण डोंगरात व कठीण काळात संपूर्ण साथ देणारी व सावलीसारखी उभी असलेली, लेणीसमोरच्या लेणापुरची आदिवासी, बुद्धिमान, सुंदर तरुणी पारो होती. तिच्याशिवाय हे काम इतकं सुंदर बारा वर्षांच्या इतक्या कमी काळात साकार करणं शक्यच नव्हतं.
पारुच्या अपघाती (अथवा तिला मारून टाकलं ?) मृत्यूनंतर रॉबर्ट गीलने अजिंठा गावाच्या दक्षिणेकडील दिल्लीगेट जवळ तिचं लहान सुंदर असं स्मारक उभारलं. संगमरवरावर दोन ओळी लिहून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
२३ मे. आज तिचा स्मृतिदिन. आपणां सगळ्यांच्या वतीने ओंजळभर फुलं व पणतीची ज्योती तेथे ठेवू. यापेक्षा दुसरं काय ? या स्मारकाची पुन्हा नव्याने दुरुस्ती करून त्याच अक्षरांचा संगमरवर लावू. बाजूला दहा तरी झाडं व त्याचे जतन होईल असं छान करता येईल. आपल्या सद्भावना व आशीर्वाद फक्त हवेत. ‘कोरोना’ पांगळा झाल्यावर हे नक्की करूया, अशा भावना महानोर यांनी आपल्या फेसबुक खात्यावर व्यक्त केल्या आहेत.