मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
अलिबाग येथील मोठे शहापुर व धाकटे शहापुरमध्ये औद्योगिक महामंडळामार्फत पेझारी येथून पाईप लाईनने पाणी पुरवठा होतो. परंतु, सुरुवातीला असलेल्या ढोलपाडा गावातच बहुतेक कनेक्शन्स मुख्य लाईनवरूनच असल्याने पन्नास टक्के पाणी तिथेच संपते. उरलेलं पाणी पुढे 5 किमी अंतरावर पाईपलाईनद्वारे पोहचेपर्यंत अतिशय कमी दाबाने जाते.
भर उन्हात दोन्ही गावातील महिलांना पाणी घरात येत नसल्याने रस्त्यालगत पाईपलाईनवर टब मांडून हंड्यात पाणी भरावे लागत आहे, यालाच पाणी आले असे म्हणतात. पण त्याच वेळेस त्याच लाईनवरील ढोलपाडा गावात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढते. असा दुजाभाव पाणीवितरणात केला जात आहे. केवळ योग्य नियोजन नसल्याने ही पाणी समस्या भेडसावत आहे.
2 इंचाच्या पाईपलाईनवर 10 ते 24 कनेक्शन असल्याने कुणालाच पाणी येत नाही. मग पाण्याचे मशीन लावली जाते. तरी देखील पाणी येत नाही.
आश्चर्यकारक अनुभव असा आहे, इलेक्शन च्या वेळेस याच पाईपलाईनमधून फुल प्रेशरने पाणी येते व इलेक्शन झाल्यावर पुन्हा प्रेशर कमी होते, असं श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत सांगतात.
तीन गावात सार्वजनिक तलावात पाण्याचे विहीर बांधून त्यावर एक टाकी बांधून सोलर पंपाने पाणी चढवल्यास सर्वाना पाणी मिळू शकते. वीज बिल शुन्य पाणी सोडणारे कामगार खर्च शुन्य पण या सूचनेकडे गेली कित्येक वर्षे दुर्लक्ष केले जात आहे.
ढोलपाडा गावास रस्त्याच्या दोन्ही बाजूस स्वतंत्र सर्व्हिस लाईन व्हाल्व्हसहित म्हसोबा मंदिरापर्यंत दिल्यास व मुख्य लाईन वरील कनेक्शन सर्विस लाईन वर आणल्यास शहापुरला पाणी उच्च दाबाने जाऊ शकते. या सूचनेकडेदेखील दुर्लक्ष केले गेले आहे.
गावात ८४ जेष्ठ नागरिक असून १०० हुन जास्त निवृत्त शिक्षक आहेत. यांना या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार दर मानशी दरदिवशी १३५ लिटर पाणी मिळाले पाहिजे पण ते देखील नाही उलट एक दिवसा आड पाणी येते. सर्वच राजकीय पक्षांना ही समस्या कायम असण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे, असा आरोप राजन भगत यांनी केलाय.
राजन भगत
आपण या समस्येला वाचा फोडल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.