सिमेंटच्या जंगलात निसर्ग हरवत चाललाय !

सिमेंटच्या जंगलात निसर्ग हरवत चाललाय !

मार्चएप्रिलचे कडक ऊन जरा जास्तच जाणवत होते. नेहमी हिरवेगार असणारे डोंगर या महिन्यांमध्ये फारच रुक्ष वाटतात. भीमाशंकरला जाताना काही ठराविक वळणावर गाडी हिरव्या मखमली झाडांच्या कमानीतून जाते. ती जागा माझ्या फार आवडीची. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच वाढलेली झाडे...वड, पिंपळ व काही रान झाडे रस्त्याच्या मधोमध हातात हात गुंफून अशी उभी असतात, जणू खेळ खेळताहेत ! छान घनदाट जाळी तयार होते या अशा झाडांमुळे संपूर्ण रस्त्यावर ! आल्हाददायक सावली पसरलेली असते.

लहानपणी प्रवास करताना गाडीच्याविरुद्ध दिशेला धावणारी पळती झाडे आता दिसत नाहीत. कुठे हरवली कोण जाणे ! फिरायला बाहेर पडलं की आता झाड शोधावं लागतं. शाळेत पूर्वी आम्हाला निबंध लिहायला सांगायचे 'वृक्ष माझा मित्र' , 'विज्ञान शाप की वरदान' , वगैरे.... आम्ही तो निबंध, सुभाषिते, सुविचार ,अभंगातील ओळी वगैरे लिहून छान पूर्ण करायचो.

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे", पण आता मात्र काय दृश्य दिसतं तर बेसुमार होणारी झाडांची कत्तल आणि वाढणारे सिमेंटचं जंगल. "सिमेंटचं जंगल" ! शब्द लिहिताना फार काल्पनिक वाटायचं ,कारण सिमेंटचं कुठं जंगल असतं का? जंगल म्हणजे झाडांचं, वेलींचं, त्यावर विहरणाऱ्या पक्ष्यांचं. जिथे खरोखर वनचर यांना आश्रय मिळेल त्यांचं ; म्हणून ते वृक्षवल्ली खरे सोयरे होते.

रान फुलांचा सुवास आणि गोड रम्य वातावरण ! त्या जंगलाची पण एक वेगळी भाषा होती असं वाटायचं इतकं गूढ. त्यात एक ओढा किंवा पाणवठा असणारच हे आमचं गृहीतक कारण गोष्टीतले प्राणी जंगलात पाणी पिण्यासाठी तिथेच जातात ना ? फार छान होतं सगळं !!

निसर्ग साखळी आणि माणसाचं एकमेकांवर अवलंबून असणारं जीवन...हे सगळं खरोखर अस्तित्वात होतं म्हणूनच आजीच्या गोष्टीतून त्याचं हुबेहूब वर्णन अगदी समोर प्रसंग घडतोय इतकं जिवंत वाटायचं.

उंचच उंच गगनाला गवसणी घालणाऱ्या इमारती आणि मोठ्या शहरांना जोडणारे चौपदरी महामार्ग यांना 'अडथळा 'ठरणारी असंख्य झाडे नष्ट केली व होत आहेत. आधुनिकतेच्या व प्रगतीच्या या ध्यासासाठी आधी जंगलतोड केली आणि आता जंगलं वाचवण्यासाठी मोर्चे, भाषणे,उपोषण वगैरे ...सर्व प्रकार सुरु झाले, पण त्यावर ठोस उपाय मात्र कोणीही केला नाही.

' फाॅरेस्ट मॅन आ‌ॅफ इंडिया 'या नावाने सन्मानित 'जादव मोलाई 'ची खरीखुरी जीवनकथा मात्र अंतर्मुख करते....

ब्रम्हपुत्रा नदीला वारंवार येणारे महापूर, त्यात बळी जाणारे जलचर व इतर प्राणी, याला कारण झाडांची व जंगलाची उणीव. मोलाईने या समस्येवर स्वतः च उत्तर शोधले. कोणतीही सरकारी मदत किंवा निधीची वाट पाहिली नाही. रोजचा दिवस त्यांचा रोपे लावण्याने सुरु झाला. सुरूवातीला बांबूची व नंतर असंख्य रोपे प्राण्यांच्या आवडीची व माणसांना उपयोगी असलेली लावली.

१९७९ पासून घेतलेला 'झाडे जगवण्याचा' हा वसा त्यांचा आजही चालू आहे. 'पद्मश्री' पुरस्काराने मोलाई हे विभूषित असून अनेक राज्य पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

१३६० एकर इतके क्षेत्र व्यापलेले हे जंगल आता 'मोलाई फाॅरेस्ट' नावाने ओळखले जाते. हे जंगल पूर्ण आशिया खंडातच नाही तर जगातील एकमेव मानवनिर्मित जंगल आहे. बंगाल वाघ, हत्ती , मोर, हरीण, गेंडे आणि वेगवेगळ्या पक्षांचे निवासस्थान झालेले आहे.

आपण हौसेने जंगलसफारी करतो, सहली काढतो, नदी किनारी जातो फोटोसेशन करतो. 'नेचर इज माय मदर ' वगैरे.....बरंच काही छान लिहितो. आपलं निसर्गप्रेम म्हणजे बाल्कनीत, दारासमोर तुळशीचे रोप लावणे, शोभेची शकिंवा चारदोन फुलझाडे लावणे या हौसेवर आपल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा पूर्णविराम होतो !!!

प्रगतीची वाटचाल नेहमीच सुखद असते, आनंद देणारी असते; पण ती एकमेकांच्या हातात हात घालून झाली तरंच. एका जीवन साखळीचा बळी देऊन, ऱ्हास करून साधलेली प्रगती नंतर मात्र पश्चातापाची वेळ आणते. प्रगतीचे शिखरं गाठलेल्या माणसांच्या आणि पुढच्या पीढीच्या डोळ्यात पाणी आणते हेच खरं !!!!

 

 

 

लीना तांबे

लेखिका शिक्षिका आहेत.

leena.adhalrao.tambe@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!