विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बुडवल्याला जबाबदार धरून पहिल्यांदाच संबंधित शाळेला दीड लाखांच्या अदायगीची नोटीस !

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बुडवल्याला जबाबदार धरून पहिल्यांदाच संबंधित शाळेला दीड लाखांच्या अदायगीची नोटीस !

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बुडवल्याला जबाबदार धरून पहिल्यांदाच संबंधित शाळेला दीड लाखांच्या अदायगीची नोटीस !


सर्वच शिष्यवृत्तीबाबत महिन्याभरात शिक्षण विभाग उचलणार निर्णायक पावलं !

कायद्याने वागा लोकचळवळीने धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जाग्या झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती बुडवल्याच्या मोबदल्यात कल्याणातील नूतन मराठी विद्यालयाला एक लाख ६८ हजार रुपये विद्यार्थ्यांना अदा करण्याची नोटीस बजावली आहे; विद्यार्थ्यांची बुडालेली शिष्यवृत्तीची रक्कम शाळेकडून वसूल करण्याची घटना शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच होत आहे, शिवाय, महिन्याभरात आर्थिक दुर्बल, अनुसूचित जातीजमातींसहित सर्वच शिष्यवृत्तींबाबत निर्णायक पावलं उचलणार असल्याचं लेखी पत्र शिक्षण विभागाने दिल्यानंतर धरणे आंदोलन तूर्त स्थगित केलं असल्याची माहिती कायद्याने वागा लोकचळवळीचे राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांनी दिलीय.

राष्ट्रीय साधने व गुणवत्ता शिष्यवृत्ती अर्थात (एन एम एम एस) व इतर शिष्यवृत्तीबाबत ठाणे जिल्ह्यात काय सद्यस्थिती आहे, याचा आढावा घेण्याची विनंती कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांना निवेदन देऊन केली होती.

हा आढावा घेतल्यानंतर वंचित विद्यार्थ्यांना त्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करणे तसंच सदर विलंबाला जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्या विरोधात कारवाई करणे, अशा दोन मागण्या असरोंडकर यांनी केल्या होत्या ; परंतु कल्याणातील नूतन मराठी विद्यालय या एका शाळेवर कारवाईची नोटीस बजावून त्या अनुषंगाने मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजीचं घोषित आंदोलन मागे घेण्याची विनंती शेषराव बडे यांनी लेखी स्वरूपात केली होती.

त्यावर आमचं आंदोलन मोजक्या एकदोन विद्यार्थ्यांशी संबंधित नसून ते ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी असल्याचं असरोंडकर यांनी स्पष्ट केलं होतं ; शिवाय फक्त एनएमएमएस या शिष्यवृत्तीबाबतच आम्ही प्रश्न उपस्थित केलेला नसून शिक्षण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सगळ्याच शिष्यवृत्तीची सद्यस्थिती काय आहे, हे समोर येणं गरजेचं असल्याचं असरोंडकर यांनी म्हटलं होतं.

या एकूण प्रकारात गेल्या दीड महिन्यापासून पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण विभागाचा जो अनुभव आला आहे तो एकूणच शिक्षणाबाबत व विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत बेफिकिरीचा असल्यामुळे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका असरोंडकर यांनी घेतली होती. त्यावर शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी कायद्याने वागा लोकचळवळीला चर्चेसाठी निमंत्रित केलं होतं.

या चर्चेत जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारीही उपस्थित होते. कायद्याने वागा लोकचळवळीचं प्रतिनिधित्व राज्य संघटक राकेश पद्माकर मीना, ॲड. भुजंग मोरे यांनी केलं. शिवाय ॲड. रोहन राऊत, ॲड. निलेश मोहिते, ॲड. दीपक पवार, ॲड. रुपेश कांबळे, ॲड. गणेश आखाडे यांचीही उपस्थिती होती.

केवळ एनएमएमएस नव्हे तर सर्व शिष्यवृत्तीच्या बाबतीत ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन किती सालापासून किती विद्यार्थ्यांची कोणती शिष्यवृत्ती रखडलेली आहे, याची माहिती व संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची नियमानुसार रक्कम मिळेल याबाबत कृती आराखडा आणि या विलंबास जबाबदार असलेल्या कर्मचारी अधिकारी किंवा संबंधित शाळा मुख्याध्यापक यांच्या विरोधात कारवाई याबाबतची स्वयंस्पष्ट पारदर्शक माहिती एक महिन्याच्या आत आपणास कळविण्यात येईल, असं लेखी आश्वासन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिलं.

त्यानंतर, महिनाभरासाठी धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज असरोंडकर यांनी केलीय. दरम्यानच्या काळात, संपूर्ण महाराष्ट्रभरातून सदरबाबत आढावा घेणार असल्याचं व गरज भासल्यास केंद्राशीही पत्रव्यवहार करणार असल्याचं असरोंडकर यांनी सांगितलं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!