गुंतता हृदय हे जीव वेडावला !!

गुंतता हृदय हे जीव वेडावला !!

गुंतता हृदय हे जीव वेडावला !!

गुंतवणूक म्हटली की समोर उभा राहतो तो फक्त पैशांचा व्यवहार ! पण माहित आहे का, सोन्यापेक्षाही आणि पैशांपेक्षाही महत्त्वाची आहे ती भावना, अर्थात भावनेची गुंतवणूक ! दिल्या-घेतल्याने एक व्यवहार पूर्ण होतो, तसंच काहीसं भावनेचं आहे. साद-प्रतिसाद योग्य असेल तरच भावनेची गुंतवणूक योग्य होते; अन्यथा आपली गुंतवणूक चुकलीच म्हणून समजावी .

अशी अनेक नाती असतात जिथे भावनेची गुंतवणूक केली जाते. आई -मुलांचं नातं ,पती -पत्नीचं नातं, मित्र-मैत्रिणींशी जोडलेलं नातं, शेजारच्यांशी असलेलं नातं , बहीण-भावाचं नातं ! या नात्यांत खरोखरीच भावनेची गुंतवणूक योग्य असेल तरच ते नातं शेवटपर्यंत टिकून राहतं. नाहीतर उरतो तो फक्त व्यवहार.

व्यवहार आणि भावना गुंतवणुकीशी जरी जोडलेल्या असल्या तरीसुद्धा, व्यवहारात भावना आणि भावनेत व्यवहार असेल तर आपण फसलोच म्हणून समजा.

आपण अशाच ठिकाणी गुंतवणूक करावी, जिथे त्या गुंतवणुकीचा खरोखरीच दोन्ही व्यक्तींना फायदा होऊ शकतो. उत्कृष्ट समजशक्ती दोघांमध्येही गरजेची आहे. नाहीतर विचारच गुंतागुंतीचे होऊन जातात. गुंतवणुकीचे रिटर्न्स चांगलेच असावेत, म्हणजे ती गुंतवणूक आपल्यासाठी केव्हाही, कधीही आणि कोठेही कामास येते. डेड इन्वेस्टमेंट नेहमीच वेस्ट ठरते ! ती बेस्ट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असावं.

चांगल्या गोष्टींशी आपलं मन, भावना गुंतवाव्यात. ज्याने आपला उत्कर्ष होईल, प्रगती होईल. फक्त वेळीच माणसं ओळखणं आवश्यक आहे. एक गोष्ट आपल्या मनासारखी केली तर आणखी एखादी गोष्ट आपण समोरच्यांच्या मनासारखीही करावी. मग कितीही जटिल गाठी असल्या तरी सोडवता येतात.

या प्रेमळ गुंतवणुकीपायीच तर आई -मुले , नवरा -बायको, मित्रपरिवार, आपले शेजारी एकमेकांसाठी सतत झटत राहतात. जिथे भावना गुंतलेली असते, तिथे व्यवहाराला थारा राहत नाही, असते ते फक्त प्रेम ! प्रेमाने जग जिंकता येते !!

जेव्हा अशा फायदा देणाऱ्या गुंतवणुकी आपण करत असतो, तो खरंच आपल्यासाठी प्रगतीपथावर नेणारा मार्ग ठरतो. नुसतंच मन हळवं करून झुरत राहण्यापेक्षा अशा प्रेमळ गुंतवणुकी केलेल्या केव्हाही चांगल्याच नाही का?

प्रेमळ गुंतवणुकीतून दामदुप्पट आनंद आणि प्रेम, झटपट ; शिवाय दीर्घकाळ टिकणारं मिळतं. सांगा बरं , याच्या व्यतिरिक्त अशी कोणती स्कीम आहे का, जी आपल्याला कैकपट आणि झटपट दीर्घकाळ टिकणारी परतावा देते ?

द्वाड मुलं असतील तर अशा ठिकाणी पालकांनी केलेली भावनेची गुंतवणूक फोल आहे. पती-पत्नीमध्ये योग्य गुंतवणूक नसेल तर संसारही मातीमोल आहे. मित्रपरिवारामध्ये हीच भावनिक गुंतवणूक अयोग्य असेल तर, तुमची अधोगती, व्यसनाधीनता अटळ आहे. योग्यवेळी, योग्यठिकाणी केलेली भावनिक गुंतवणूक अतोनात आनंद मिळवून देते.

गुंतवणूक पैशांची असो वा प्रेमाची, एकदा व्यवहार फसला म्हणजे फसलाच. तो जागेवर आणण्यासाठी अतोनात यातना सहन कराव्या लागतात. प्रेमळ गुंतवणुकीत हरवून जाणं केव्हाही चांगलं ; कारण अशी माणसं फक्त माणसंच राहत नाहीत, ती होतात चैतन्याचे झरे, जे दुसऱ्यांची तृषा भागवून स्वतः तृप्त होतात.

ज्यांच्या लेखी आपली भावना शून्य असते, त्यांच्याशी गुंतवणूक काय कामाची ? त्यांना माहितच नसतं की , शून्यसुद्धा किती महत्वाचा आहे तो ! तो ज्यांच्या सोबत उभा राहील त्यांची किंमत वाढवल्याशिवाय राहत नाही. पण हे कळायलासुद्धा शुद्ध भावना असावी लागते.

उगीचच म्हणत नाहीत, गुंतता हृदय हे जीव वेडावला...हे जिवाचं वेडंपण गुंतवणुकीच्या नात्यांचा खरा आविष्कार असतो.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!