मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सध्याच्या घडीला आपण सर्वच जण सोशल मिडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करत आहोत. परंतू आपण जबाबदार कमी आणि बेजबाबदार जास्त आहोत. सोशल नेटवर्किंगचा वापर करत असताना अनेक दैनंदिन गोष्टी ,दैनंदिन घडामोडी, वेगवेगळ्या विषयांवरील बातम्या, लेख हे सर्व कितपत खरंय व कितपत खोटंय याचा आपण अभ्यास न करता भावूक होऊन बऱ्याच गोष्टी खऱ्या मानतो व पुढे ते सोशल मिडियावर फॉरवर्ड करत असतो. या सगळ्याची कुठलीही खातरजमा न करता आपण या गोष्टी करत असतो. त्यामुळे फेकन्यूजचे आपणही गुन्हेगार ठरत असतो.
भंडारा जिल्हयातील पद्मशीला तिरपुडे यांनी संघर्ष करून पी.एस.आय. हे पद मिळवलं. परिस्थिती संघर्षमय होती, तरीही त्यांनी मनात निश्चय केला आणि नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शिक्षण सुरू असताना स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. २०१२मध्ये स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण करून २०१३ साली नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक झाल्या. सध्या त्या नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत एक फोटो काढला व तो सोशल मिडियावरदेखील आपण पाहत आहोत. परंतु याच फोटोसोबत खलबत्ते विकणारी महिला व तिच्यासोबत पदरात असणाऱ्या बाळाचा फोटोदेखील जोडला आहे.
खलबत्ते विकणारी माहिला तिरपुडेच आहेत, असं अनेकांनी परस्पर ठरवलं व याची बातमी पुढे पसरवली. चेहरा साधर्म्याचा गैरफायदा घेऊन कुठल्याही प्रकारची माहिती न मिळवता,खातरजमा न करता तिरपुडेंबद्दल चुकीची माहिती सोशल मिडियावर प्रसारीत झाली. जे चुकीचं होतं. त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक तणावातून जावे लागले आहे व अजूनही जावे लागतेय.
विशेष म्हणजे ही मनकीबात पसरवण्याऱ्यांत छत्तीसगडमधील बिलासपूरचे आयजी दिपांशू काबरा यांच्यासारख्यांचाही समावेश आहे. यावर काय बोलावं ?
तिरपुडेंच्या फोटोसोबतची खलबत्ता विकणारी महिला कोण असेल व तिचा नेमका काय संघर्ष असेल, या पश्नांची उत्तरे माहीत नसली तरीही पद्मशीला तिरपुडे यांच्या मनाचा मोठेपणा असा की खलबत्त्ता विकणाऱ्या महिलेलाही यश मिळो व तिचा संघर्ष संपावा, अशी इच्छा त्या व्यक्त करतात.
पत्रकारांवर, माध्यमांवर आणि खातरजमा केल्याशिवाय काॅपी-पेस्ट, शेअर्ड-फाॅरवर्ड करणाऱ्या समाजावर तिरपुडे प्रचंड नाराज आहेत. कायदेशीर कारवाईच्याही तयारीत आहेत.
सध्याच्या बेभान जगात समाजाला सत्य व असत्य या दोन बाजू ओळखणं गरजेचं आहे. त्याची पडताळणी करून, अभ्यास करून मगच एखाद्या विषय प्रसारीत करावा, जेणेकरून पद्मशीला तिरपुडे यांच्यासारख्यांचं कौतुक करण्याच्या नावाखाली निदान त्यांच्या संघर्षाची अवहेलना होणार नाही.
उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी. कायद्याने वागा लोकचळवळ व मिडिया भारत न्यूज ची प्रतिनिधी.