अशोक सराफ : अभिनयाची संस्था

काल झी मराठी चैनल वर "मराठी जीवन गौरव पुरस्कार" हा भव्यदिव्य कार्यक्रम दाखवला गेला. त्या कार्यक्रमात माननीय अशोक सराफ मामा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला गेला. कार्यक्रम पाहताना अशोक सराफ यांचे सगळे पाहिलेले चित्रपट, नाटकं नजरेपुढे तरळून गेलेत.

सिद्धार्थ जाधव यांनी अशोक सराफ यांच्या चित्रपटातील प्रवासावर, गाण्यांवर सामूहिक नृत्य करून तो प्रवास खरोखर उलगडला म्हटल्यासारखं होईल. सिद्धार्थ जाधव अशोक सराफ मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे  यांना देवस्थानी मानतात.

अशोक सराफ यांचा हा प्रवास उलगडून दाखवताना, सिद्धार्थ जाधव आणि सहकलाकार त्यांच्या आयुष्यातले प्रसंग ही दाखवत होते.

अशोक सराफ यांच्या एक्सीडेंट नंतर त्यांची आई जेव्हा गेली त्यावेळी त्यांची आईशी शेवटची भेट ही झाली नाही. तो प्रसंग या स्टेजवर दाखवताना सिद्धार्थ जाधव यांनी जो अप्रतिम अभिनय केला, त्याला तोड नाही. आई घास भरवते पण तो घास तोंडापर्यंत यायच्या आधीच आईची ती प्रतिमा नजरेआड होते. तेव्हा भरून आलेले डोळे पुसत, थरथरत्या पावलांनी जेव्हा सिद्धार्थ जाधव मागे होतात त्यावेळी कार्यक्रमातील प्रेक्षकांसोबत पाहणाऱ्यांचेही डोळे भरून आले असतील.

सिद्धार्थ जाधव यांनी पुरस्कार प्रदान करतांना त्यात सहभागी होताना, अशोक सराफ यांच्यासारखाच शर्ट घातला होता. त्यांचा परफॉर्मन्स संपल्यानंतर त्यांनी सरळ स्टेजवरून खाली जाऊन अशोक सराफ यांच्यासमोर साक्षात लोटांगण घालून मनीच्या भावना, निस्सीम आदरभाव व्यक्त केला. ते भावनांचं प्रकटीकरण, ते हृदयस्पर्शी दृश्य पाहून अशोक सराफच काय पण साऱ्यांचेच डोळे पाणवलेत.

अशोक सराफ यांना त्यांच्या मित्र असलेल्या सहकलाकारांच्या हस्ते पुरस्कार देऊन कार्यक्रमाचं औचित्य साधलं होतं ते फार आवडलं.

कार्यक्रम पाहताना अशोक सराफ यांना भरून येत होतं. ते आवंढे गिळत होते, हे स्पष्ट दिसत होतं. आपलंच आयुष्य आपल्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा प्रक्षेपित होतंय, ते आयुष्य ते पुन्हा जगताहेत असा त्यांच्याकडे पाहताना भास होत होता.

निवेदिता सराफ शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत पण जेव्हा त्यांनी व्हिडिओ मार्फत त्यांच्या शुभेच्छा दिल्या, त्यावेळी पतीविषयीचा अभिमान त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होत होता. एक नट, मुलगा, भाऊ, पती आणि पिता म्हणून प्रत्येक भूमिकेत अशोक सराफ कसे यशस्वी ठरत गेले हेही त्यांनी थोडक्यात  सांगितलं.

खरंच अशोक सराफ एक कलाकार नाही तर ते अभिनयाची संस्था आहेत. माणुसकीने भरभरून वागण्याची आणि अभिनय कसा करावा याचीही.

अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं "व्हैक्युम क्लिनर " हे नाटक मी डोंबिवलीत पाहिलं आणि त्यानंतर मी त्यांना जाऊन भेटले. त्यांना मी म्हटलं, सिने गीतांवर आधारित माझं, पडद्यामागचं गाणं पुस्तक मी पूर्वी प्रकाशित केलेलं आहे. तुम्हाला आणि निर्मिती ताईंना ते पुस्तक द्यायची माझी इच्छा होती. अशोक सराफ लगेच म्हटले, ठाण्याला माझा याच नाटकाचा प्रयोग आहे. त्यावेळी तुम्ही कोणाच्या हातून ते पुस्तक पाठवून द्या किंवा तुम्हीच जर स्वतः येऊन दिलं तर अधिक बरं होईल.

तेच पुस्तक मी ठाण्यात गडकरी रंगायतनला जाऊन , पुन्हा एकदा नाटक पाहून, ग्रिनरूममध्ये जाऊन त्या दोघांना दिलं. नाटक पाहण्यासाठी ज्येष्ठ, दिग्गज अभिनेते रवी पटवर्धन पण आले होते. एक प्रसिद्ध अशी मराठी नटी सुद्धा आली होती. पण ती नटी तिच्याजवळ भेटायला जाणाऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नव्हती. त्याचवेळी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत नाटक संपल्यानंतर मेकअप काढून नंतर खूप वेळ  थांबून प्रत्येक  भेटणाऱ्या रसिकाला फोटोग्राफ देत होते, ऑटोग्राफ देत होते. हसून बोलतही होते. हा फरक खूप जाणवला.

माणूस जितका मोठा होत जातो तितकाच तो विनम्र असतो. किंबहुना तो विनम्र असतो म्हणूनच तो मोठा होत जातो. हे प्रकर्षानं जाणवलं. अगदी जमिनीवर पाय रोवून उभा असलेला हा आभाळाएवढा कलाकार त्यामुळेच सगळ्यांच्या मनामध्ये आपलं स्थान अजूनही टिकवून आहे.

अशोक सराफ म्हटलं की लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उल्लेख निश्चितपणे येणारच पण दुर्दैवाने त्यांची या जगातील एक्झिट फारच लवकर झाली. "अशोक - लक्ष्या " ही जोडी मात्र अजरामर ठरली. "अशोक सराफ - रंजना " ही जोडीसुद्धा आपोआपच डोळ्यापुढे येते. " ओ पँट वालं " अशी ठसक्यात हाक मारणारी रंजना...कोण विसरू शकेल? त्यांचेही अशोक सराफ यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत मोठे स्थान आहे.

राम राम गंगाराम, पांडू हवलदार पासून अशोक सराफ यांची चित्रपटांची संख्या ही अगणित वाढतच गेली आणि त्या वेगवेगळ्या भूमिकांमधून अशोक सराफ जणू अभिनयाचं समृद्ध आयुष्य जगत गेले. आताही त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उत्तर देताना ते म्हणालेत,

"इतकं प्रेम मिळत असेल तर, मला प्रत्येक जन्मात नटच व्हायला आवडेल. "

त्यांचं हे वाक्यच त्यांची अभिनयावरची निष्ठा आणि प्रेम दाखवून देतं...

४ जून १९४७ रोजी जन्मलेल्या या कलाकाराने वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. १९९० साली निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. आई आणि वडील दोघेही  अभिनयाच्या क्षेत्रात असतानाही त्यांचा मुलगा अनिकेत मात्र चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. तो शेफ आहे. त्याच्या या निर्णयाला आई-वडिलांचा पूर्णपणे पाठिंबा होता.
८० ,९० चे दशक अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खऱ्या अर्थाने गाजवलं. त्या काळातले ते दोघं सुपरस्टार होते. अडीचशे पेक्षा जास्त चित्रपटात अशोक सराफ यांनी काम केलं. राम राम गंगाराम साठी त्यांना पहिला "फिल्म फेअर " पुरस्कार मिळाला. अत्यंत मानाचे जवळपास १५ पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेत आणि काल झी मराठीचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला.

अशोक सराफ यांची कारकीर्द चौफेर आहे. हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रामध्ये त्यांची कारकीर्द बहरली आहे. अठराव्या वर्षी "ययाती आणि देवयानी " हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी केलं. "जानकी " हा १९६९ साली प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला चित्रपट.

त्यानंतर दोन्ही घरचा पाहुणा, पांडू हवलदार, राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं, सावज, चोरावर मोर, ग्यानबाची मेख, दीड शहाणा, हीच खरी दौलत, गोंधळात गोंधळ, एक डाव भुताचा, दोन बायका फजिती ऐका, आता कशाला उद्याची बात, बहुरूपी, गुपचूप गुपचूप, नवरी मिळे नवऱ्याला, नवरा माझा नवसाचा अशा कित्येक चित्रपटात त्यांनी काम केले.

हिंदीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा झेंडा रोवलेला आहे. कोयला, गुप्त, खूबसूरत, येस बॉस, करण अर्जुन, सिंघम हे त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट. मुख्य भूमिका नसली तरीसुद्धा मुख्य भूमिकेतील हिरोइतकीच त्यांची भूमिका लक्षवेधी असायची.

हमिदाबाईची कोठी, मनोमिलन, डार्लिंग डार्लिंग, सारखंच छातीत दुखतंय, व्हैक्युम क्लिनर, ययाती आणि देवयानी ही त्यांची गाजलेली नाटकं.

१९६९ पासून ते आत्तापर्यंत अशोक सराफ यांचा चित्रपटांचा, अभिनयाचा प्रवास हा सुरूच आहे. त्यांना जीवन गौरव पुरस्कार देताना जे भव्यदिव्य, भावपूर्ण सादरीकरण केलं ते अत्यंत आवडलं, म्हणूनच ही पोस्ट लिहिण्याची तीव्र इच्छा झाली. पुरस्काराचे काही क्षण टि व्ही मध्ये कार्यक्रम दिसत असताना टिपून तेच शेअर करत आहे.

अशोक सराफ यांची कारकीर्द अशीच बहरत राहो, त्यांना दीर्घायुरारोग्य प्राप्त होवो आणि मराठी कलाकाराचा झेंडा हा चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक क्षेत्रात असाच अभिमानाने फडकत राहो हीच मनोमन प्रार्थना...

 

 

 

 

 

 

अजिता सोनाले

सिने अभ्यासक | पडद्यामागचं गाणं या बहुचर्चित पुस्तकाच्या लेखिका | सेवानिवृत्त शिक्षक

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!