भारतीय विमान निर्मितीचं त्याचं स्वप्न अखेर आकाशात झेपावलंच…!

भारतीय विमान निर्मितीचं त्याचं स्वप्न अखेर आकाशात झेपावलंच…!

भारतीय विमान निर्मितीचं त्याचं स्वप्न अखेर आकाशात झेपावलंच…!

शाळेत असताना कागदाचे विमान उडवताना कधी आपण स्वतः बनविलेले विमान आकाशात झेप घेईल, ह्याची पुसटशी कल्पना नसणारे अमोल यादव हे भारतातील संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले वहिले विमान बनविणारे पहिले मराठमोळे युवक ठरले आहेत … नुकतीच १५ ऑगस्ट २०२० रोजी उड्डाण चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे …

वयाच्या १८ वर्षी अमोल अमेरिकेत वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. काही महिन्यातच मित्रांनी मिळून अवघ्या २१ हजार ६०० डॉलरमध्ये स्वतःचे विमान विकत घेतले. त्या विमानाची निगा राखत असताना त्याचे व्यवस्थित निरीक्षण करून आपण हे बनवू शकतो, हा विचार अमोल यांच्या मनाला शिवला आणि तेव्हापासूनच त्यांच्या संकल्पनेतलं विमान आकाशाला गवसणी घालू लागलं होतं.

भारतात ते परतले, ते देशात जाऊन आपलं विमान बनवायचं हे निश्चित करूनच ! प्रशिक्षण पूर्ण होतातच भारत गाठला…तो पर्यंत ते कसे ,कुठे बनवायचे ह्या बाबत मात्र प्रश्नचिन्ह होतं !

यादव परिवारातून कधीच कोणी त्यांच्या ह्या स्वप्नांवर आक्षेप घेतला नाही की खिल्ली उडवली नाही. वडील एस. एस .यादव यांची आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी. योग्य प्रश्न उपस्थित करून ते वेळोवेळी मुलाच्या स्वप्नांना मजबुती देत असत …

सर्व सामान्य घरातला एक युवक कुठल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना, जागा उपलब्ध नसताना विमान बनविण्याचे स्वप्न पाहतो, त्याच्या पूर्ततेसाठी जिवाचे रान करतो आणि घरावरच्या गच्चीतच विमान बनवायला सुरुवात करतो …हा प्रवास उल्लेखनीय तितकाच उत्सुकतापूर्ण आहे !

पहिले इंजिन विकत घेण्याकरिता आईने मंगळसूत्र गहाण ठेऊन पैसे दिल्याचे अमोल यांना उशिरा कळले. सलग दोन प्रयोग करताना आयुष्याची असली नसलेली जमापुंजी खर्च झाली. हाती मात्र अपयश आले; अखेर जेट एअरवेजमध्ये वैमानिक म्हणून नोकरी पत्करली. पण नोकरीत रुजू होऊनही अमोल यांचं स्थिरावलेले आयुष्य मात्र आतल्या आत खदखदत राहीले.

आईच्या मंगळसूत्राची आठवण त्यांना पुन्हा विमान निर्मितीकडे घेऊन आली आणि पुन्हा एकदा अनेक वर्षांची साठवलेली पुंजी घेऊन अमोल यांनी आपले विमान निर्मितीचे स्वप्न रनवेवर आणले.

मेक इन इंडियामध्ये निग्रहाने जागा मिळवून केलेले विमानाचे प्रदर्शन स्वप्नाच्या पूर्ततेचे पहिले पाऊल ठरले. गच्चीवरच्या विमानाने आता हैदराबाद गाठले होते. तोवर भारतभरात या धडपडींचा गाजावाजा झाला होता.

विमान बनविताना मात्र कुठल्याही प्रकारचा आर्थिक हिशोब ठेवला गेला नाही ; कारण त्याचा विचार केला असता तर हे स्वप्न पूर्ण झालेच नसते ! स्वप्नं नुसती पाहून चालत नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठलागही करावा लागतो , तुमच्या स्वप्नांना तुम्ही दिलेली किंमत महत्वाची असते. त्याशिवाय ती अमोल होत नाहीत. प्रयत्नांच्या सातत्याने भारतात आजतागायत कोणाला जमले नाही, ते संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान बनवून एक आदर्श उदाहरण अमोल यादव यांनी जगासमोर ठेवले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष स्वतःसाठी नसून लोककल्याणासाठी होता ; त्यामुळे माझे स्वप्न आजही पूर्ण झाले नाही ! जेव्हा भारत स्वतःची विमान निर्मिती करू शकेल आणि परवडणाऱ्या खर्चात महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक विमान प्रवास करू शकतील, तेव्हा माझे स्वप्न पूर्ण होईल, असे स्वप्न पाहणारा हा युवक भारताचा अभिमान बिंदू होतो !

 

 

पुजा मुधाने

कल्याणच्या अग्रवाल महाविद्यालयाची पदवीची विद्यार्थीनी. विद्यार्थी भारतीची महाराष्ट्र अध्यक्ष.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!