बालभवनचा लाभ लवकरच राज्यभरातील मुलांना !!!

बालभवनचा लाभ लवकरच राज्यभरातील मुलांना !!!

बालभवनचा लाभ लवकरच राज्यभरातील मुलांना !!!

शिक्षण म्हणजे केवळ साक्षर करणे नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे खरे शिक्षण होय. मागील सहा दशकाहून हे कार्य महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मंडळ करत असून नुकतीच या मंडळावर राज्य शासनाने शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते व भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र राज्य बालभवन मंडळावर त्यांच्या नियुक्तीबाबत व बालभवन बद्दल त्यांच्याच शब्दात जाणून घेऊ.

मुले ही देशाचे भविष्य असतात. हे भविष्य उज्वल व्हावे यासाठी मुलांना शिक्षणासोबत संस्कार मिळण्याची गरज असते. बालकांचे जीवन चैतन्यदायी, आनंदमय, सृजनशील व समृद्ध करण्यासाठी सहा दशकाहून अधिक काळ बाल भवन विविध उपक्रम राबवित आहे.

२४ मे १९५० रोजी भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते विशाल अरबी समुद्राच्या किनारी गिरगाव चौपाटी जवळ बाल भवनाच्या इमारतीचा कोनशीला रचली गेली. २४ फेब्रुवारी १९५२ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी बाल भवन इमारतीचे उदघाटन केले. ६ डिसेंबर १९५२ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची कन्या इंदिरा गांधी समवेत बालभवनाला भेट दिली.

मुलांचे नाचणे, खेळणे, गाणे, बागडणे, चित्र काढणे, नवीन कलाकृती तयार करणे, नकला करणे, मातीशी खेळणे खूप आवडते आणि हेच करण्याची मुक्त संधी मुलांना या बालभवनामध्ये दिली जाते.

बाल भवनामार्फत सुरू असलेला एक ठळक उपक्रम म्हणजे, बालश्री पुरस्कार.

बालकांमधील सृजनशीलतेला यथोचित सन्मान देण्याच्या उद्देशातून १९९५ पासून राष्ट्रीय बालभवन नवी दिल्ली तर्फे बालश्री स्पर्धा घेतली जाते. आजवर राज्यातील ५० विद्यार्थी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते मानपत्र, गौरव चिन्ह व रोख रकमेच्या स्वरूपात मिळणारा पुरस्कार बालकातील उपजत कलागुणांना प्रोत्साहित करतो. सृजनात्मक विज्ञान, रंगमंच कला, सृजनात्मक लेखन यामध्ये ही स्पर्धा होते.

या सोबतच शिक्षकांसाठी कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी अभिनय, काव्यवाचन, बालनाट्य, किशोरी हितगुज,आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, भेटकार्ड, स्कीबलिंग पेंटिंग, मारबल पेंटिंग, आकाश कंदील, पणत्या रंगविणे, संगीत, तबला, भरतनाट्यम, कथक, हस्तकला, शिल्पकला, कराटे, स्केटिंग, एरोबिक्स, समुपदेशन केंद्र तसेच मुलांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषेतील १७ हजार पुस्तकांचे पुस्तकालय आहेत.

सद्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील अनेक शाळांचे विद्यार्थी या कलाभवनातील उपक्रमांचे लाभ घेतायंत. पण, पुढील एक वर्षांमध्ये राज्यभरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या कलाभवनाचा फायदा होण्यासाठी उपकेंद्र सुरू करणे, विद्यार्थी साहित्य संमेलन, ग्रंथ महोत्सव, कला दालन सुरू करण्याचा माझा मानस आहे.

शिक्षकांच्या हक्कांसोबतच कर्तव्याची जाण ठेऊन चारभिंतींच्या शिक्षणापालिकडे जाऊन अध्यापन करण्यावर माझा नेहमीच भर राहिला आहे. वाचन संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे साहित्य संमेलन, ग्रंथ महोत्सव, पुस्तक पेटी उपक्रम, शाळेत येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत बुके नव्हे बुक देऊन करण्याची संकल्पना दहा वर्षांपूर्वी सुरू केली. त्याधर्तीवर महाराष्ट्र शासन त्यांच्या विविध विभागात ही संकल्पना राबवित आहे, यांचा मला निश्चितच आनंद वाटतो.

शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा मला आता बालभवनसोबत काम करतानाही होणार आहे, ते करताना उपक्रमशीलता आणि नाविण्यपूर्णता जपण्याचा मी प्रयत्न करणार आहे.


अनिल बोरनारे

चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूल मध्ये शिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले असून राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे अनेक व्यावसायिक प्रश्न सोडविले आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!