प्रजासत्ताक दिनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांची प्रतिमा काढून टाकण्यास सांगून त्यांचा अपमान करणारे रायचूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती मल्लिकार्जुन गौडा यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बंगळुरुमध्ये सुमारे दीड लाख आंदोलकांच्या सहभागातून एक भव्य मोर्चा काढण्यात आला. ग्रँड फेडरेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शनच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बंगळुरूच्या मध्यवर्ती भागात आज 1.5 लाख कर्नाटक समतावादी रस्त्यावर उतरले समता आणि न्यायाची आंबेडकरी-पेरियारवादी चळवळ प्रत्येक जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहे. आम्ही तुमच्या सांप्रदायिक अग्नीचा थंडगार बर्फ आहोत; आम्ही तुमच्या वैचारिक आजारावर ठोस उपाय आहोत; आपण भविष्य आहोत ! अशी प्रतिक्रिया या मोर्चानंतर अभिनेता चेतन कुमार अहिंसा यांनी दिली आहे.
रायचूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांची बेंगळूरमधील कर्नाटक राज्य परिवहन अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून बदली करण्यात आली आहे, अशी अधिसूचना उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांनी शुक्रवारी जारी केली होती. मात्र गौडा यांची बडतर्फी न झाल्याने कर्नाटकातील पेरियार-आंबेडकरी जनतेत संताप होता.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी मोर्चा यशस्वी करण्यासाठी बंगळुरूला आले होते. दलित विद्यार्थी परिषद, बसपा, कर्नाटक दलित मुक्ती समिती, एसडीपीआय, भारतीय दलित फंतर अशा अनेक संघटनांनी ग्रँड फेडरेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शनमध्ये सहभागी होऊन निदर्शनं केली.
बंगळुरूच्या मध्य रेल्वे स्थानकापासून प्रेडम पार्कपर्यंत मोर्चा निघाला आणि संपूर्ण मिरवणुकीत जयभीमच्या घोषणांसह निळा झेंडा फडकला. निळी शाल आणि निळ्या टोप्या घातलेल्या आंदोलकांमुळे सत्यपतीकडे जाणारा संपूर्ण रस्ता जणू निळा झाला होता.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आंदोलन सुरू असलेल्या फ्रीडम पार्क मैदानावर यावे आणि आम्हाला ऐकावं, असा आग्रह आंदोलकांनी धरल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना आंदोलनस्थळी यावं लागलं.
आंदोलकांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. दलित समाजातील नेत्यांनी मला या घटनेबद्दल समजावून सांगितले आहे. झाल्या घटनेची गंभीर दखल आम्ही घेत आहोत. लवकरच संबंधितांना पत्र लिहिलं जाईल,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर जयभीमच्या घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.