भाऊ रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

भाऊ रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

भाऊ रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊ रंगारी यांचं नाव आता पुढे आलं आहे. भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाने गेली अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर पुणे महानगरपालिकेनेही हा दावा मान्य केला असून, लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावरील माहितीत बदल करण्यात येणार आहे, असं गेल्या वर्षी जाहिर करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाचं आजचं सार्वजनिक रूप आणण्यात लोकमान्य टिळकांचा मोठा वाटा असला तरी गणेशोत्सवाचं सार्वजनिकीकरण सर्वप्रथम भाऊ रंगारींनी केल्याचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. स्वतः टिळकांनीच केसरीतून याबाबत रंगारींचं कौतुक केलं आहे.

१८९२ मध्ये श्रीकृष्णाजीपंत खासगीवाले एका कामासाठी तत्कालीन मराठी राज्य असलेल्या ग्वाल्हेरला गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे एक पारंपारिक कार्यक्रम पाहिला, जो सार्वजनिकरीत्या आयोजित केला गेला होता. त्यांनी पुण्यात आल्यावर ती गोष्ट त्यांचे जवळचे मित्र भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊ रंगारी व बाळासाहेब नातू यांना सांगितली. त्याच वर्षी भाऊ रंगारी यांनी गणेशाचं मूर्तीदर्शन सर्वांना खुलं ठेवलं. त्याच्या पुढल्या वर्षी बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात गणेशाची प्रतिष्ठापना केली व त्याचे दर्शन सार्वजनिक केले. त्या वर्षीच्या केसरीत टिळकांनी गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव करणाऱ्यांचं कौतुक केलंय.

१८९२ साली सर्वप्रथम भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सव सुरु केला. २६ सप्टेंबर १८९३ च्या केसरीच्या अग्रलेखात टिळक स्वतः लिहतात की, सालाबादपेक्षा यंदा गणेशोत्सवास अधिक सार्वजनिक स्वरुप आले असुन ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत. ते गृहस्थ दुसरेतिसरे कोणी नसुन भाऊसाहेब रंगारी हेच होते. आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी ब्रिटिशांविरोधात क्रांतीकार्य चालविले होते. नुकताच त्यांच्या वाड्यातील शस्त्रासाठाही सापडला आहे. भाऊसाहेबांचा शालुंना रंग देण्याचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांचे जावळे आडनाव मागे पडुन रंगारी हे नाव प्राप्त झाले. ते उत्तम राजवैद्य होते. त्यांच्या राहत्या घरी आयुर्वेदिक दवाखाना होता.

Richard I. Cashman यांच्या The Myth of Lokmanya : Tilak and Mass Politics in Maharashtra या पुस्तकात त्यांचा उल्लेख “Bhau Lakshman Javle, was a Maratha whom the police considered an extremely dangerous and troublesome man” असा उल्लेख आला आहे, यावरुन त्यांचा दरारा लक्षात येईल.

तत्कालीन सामाजिक जीवनातही भाऊसाहेबांना मानाचे स्थान होते. दारुवाला पुलावरील हिंदू-मुस्लिम दंगल थांबवणारे व्यक्तिमत्व म्हणुन दस्तुरखुद्द टिळकांचे सहकारी न.चि. केळकर यांनी भाऊसाहेबांचा उल्लेख केला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची सुरुवातही भाऊसाहेबांनीच केली. टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग घेतला. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचं जनकत्व भाऊ रंगारींकडेच जातं. १९०५ मध्ये आधीच आपले मृत्युपत्र बनवुन स्वतःच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची तजवीज करणाऱ्या भाऊसाहेबांनी आपली सर्व संपत्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दान दिली होती. विशेष म्हणजे आपल्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणुन त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीची साक्ष घेतली होती.
जुन १९०५ रोजी भाऊसाहेबांचे निधन झाले.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाली व हळूहळू तो महाराष्ट्रभर साजरा होऊ लागला. दिल्ली, कलकत्ता, गोवा, मद्रास यांसारख्या इतर प्रांतांतील शहरीही तो छोट्या प्रमाणावर सुरू झाला.

सार्वजनिक गणेशोत्सवामुळे पोवाडे, मेळे, भावगीते, नकला, जादू इ. कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन मिळाले. नवे नवे कलाकार उदयास आले. कार्यक्रम विनामूल्य असल्याने सर्वसामान्य जनतेलाही उत्सवात सहभागी होता आले.

सार्वजनिक गणोशोत्सव कोणी सुरू केला? बीबीसीचा वृत्तांत काय म्हणतो?

पुणे, मुंबई इ. शहरी पेठापेठांतून हा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी उत्सवमंडळे स्थापन झाली. मनोरंजन करण्याचे सार्वजनिक मेळा हे एक प्रभावी साधन ठरले. अनेक मेळे निघाले. मेळ्यांतील पदांची रचना देशाभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने करण्यात आली. उल्लेखनीय अशा पुण्यातील मेळ्यांत ‘सन्मित्र समाज मेळा’, ‘भारत मित्र समाज मेळा’, ‘वज्रदेही शूर मेळा’, ‘बाल सन्मित्र पथक’, ‘रणसंग्राम मेळा’, ‘बाल संगीत मेळा’, ‘स्वातंत्र्य मेळा’, ‘काळभैरवनाथ मेळा’, ‘यशवंत मेळा’, ‘पैसा फंड मेळा’, ‘मावळी मेळा’, यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मेळ्यांप्रमाणे अनेक शाहीर, भावगीतगायक, जादूगार, नकलाकार यांचेही कार्य महत्त्वाचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रमांना प्रतिष्ठा प्राप्त झाली व त्यांत समाजाच्या सर्व थरांतील स्रीपुरुष उत्साहाने भाग घेऊ लागले.

मराठा क्रांती मोर्चाचं काय म्हणणं आहे?

सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्याने व प्रवचने देण्यासाठी बहुश्रुत पंडित, निष्णात वक्ते व थोर पुढारी येत. लो. टिळक, न. चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, चिंतामणराव वैद्य, लोकनायक अणे, दादासाहेब खापर्डे, सरोजिनी नायडू इत्यादींचा त्यांत अंतर्भाव होतो. हिंदुमुस्लिम जमातींतील तेढ कमी करण्यास त्या काळी सार्वजनिक गणेशोत्सव हे साधन प्रभावी ठरले होते.

(विविध वेबसाईटस्, माध्यमांतील बातम्या, मराठी विश्वकोश यावर आधारित)

बातमीखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर द्या.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!