जागल्याच्या भूमिकेतील माझा बाप …!!

जागल्याच्या भूमिकेतील माझा बाप …!!

जागल्याच्या भूमिकेतील माझा बाप …!!

मागच्या महिन्यात ६ तारखेला वडिलांचं भिवा गायकवाड यांचं निधन झालं. अचानक निर्माण झालेली अशी पोकळी भरून निघणं तसं अशक्य असतं. बापाचं छत्र काय असतं आणि पोरकेपणाची जाणीव काय असते, ते अशा वेळी गडद होत जातं. वडिलांचं माझ्याशी नातं जरा शिस्तीचं वगैरे. मोठा मुलगा असल्याने माझ्याकडून खूप अपेक्षा. अगदी माझ्या लहानपणापासून,त्यामुळे सुरुवातीला भीती आणि नंतर कामापुरत्या संभाषणामुळे दोघांमधील दरी कायम होती. ती आता आता कुठे मी चाळीशीला पोहोचल्यावर मिटत आली होती आणि बाप गेला.

 

 

 

 

 

 

 

 

वडिलांसोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायची, बोलणं व्हायचं. वडील सरकारी कर्मचारी होते, त्यामुळे तरुणपणात तसे ते कुठल्याही राजकीय पक्षात काम करू शकले नव्हते. दलित चळवळीशी मात्र त्यांची नाळ जोडली गेलेली होती. मुंबईतील वडाळ्यात कर्मचारी वसाहतीत वास्तव्य असल्याने त्याकाळी पँथर भाई संगारे यांच्या सोबत ते असायचे, एवढंच काय ते मला माहित होतं. पुढे निवृत्त झाल्यावर त्यांच्यातील या समाजकार्य करण्याच्या वृत्तीने उभारी घेतली आणि त्यांनी निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात झपाट्याने भाग घेतल्याचे मला समजले, ते त्यांच्या मृत्यूनंतर हातात आलेल्या त्यांच्या ट्रंकमधील कागदपत्रांच्या ऐवजावरून. मृत्यूनंतर पेन्शन, बँक खाते, विमा पॉलिसी तसेच मालमत्ता वगैरेच्या कागदपत्रांची पाहणी करावी, म्हणून त्यांची पेटी (जिला कुणी हाथ लावलेला त्यांना आवडत नसे) आम्ही उघडली.

वेगवेगळ्या रंगांच्या प्लास्टिक फोल्डर वर त्या त्या विषयांच्या नावाची चिट्ठी लिहून संबंधित कागदपत्रं ठेवलेली होती. कामांची विभागणी भाऊ बहिणींना करत असताना त्यांच्या एक दोन डायरींवर लक्ष गेलं. कात्रणं, पत्रव्यवहार, महत्वाचे हिशोब, काही फोटो, कविता, आमच्या शाळांचे निकाल, लहानपणीचे फोटो असं बरंच काही ..

मदर तेरेसा म्हणतात त्याप्रमाणे ” Not all of us can do great things, but we can do small things with great love “

खरंच, समाजात वावरत असताना मोठमोठाले राष्ट्रीय ज्वलंत प्रश्न ते आपापल्या विभागातील लहानसहान विविध भेडसावणाऱ्या समस्या, आपण पाहत ऐकत असतो. समाजात दोन प्रकारची माणसे असतात. एक या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपलं समोर येईल ते आयुष्य जगत असतात आणि दुसरे जे हे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात. एक सामान्य नागरिक म्हणून सर्वच गोष्टी आपल्या हातात असतील, असं होत नाही, पण जिथे आपण आपल्या परीने बदल करू शकतो, समाजाला ज्यातून फायदा होईल अशी भूमिका घेऊ शकतो, तिथे ती घेणाऱ्या लोकांची संख्यासुध्दा कमी नाही. हे सायलेंट सोशल वर्कर आपलं काम इमानेइतबारे करत असतात. अजिबात जाहिरातबाजी, बडेजाव न करता, असे लोक समोर येणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याचं महत्वाचं काम अविरत करत असतात. देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणवून घेताना आपल्या हक्क अधिकारांसोबत आपल्यावर जबाबदारीसुद्धा नकळत आलेली असते. त्या जबाबदारीचे भान ठेऊन समाजोपयोगी कार्य करत राहणे हेच तर सजग नागरिकांचे कर्तव्य आहे, नाही का ? मला दिसले की माझे वडिल एक जबाबदार नागरिक म्हणून जगले.

मालमत्ता पेपर आणि बँक खाते पुस्तकांपेक्षा मला वडिलांच्या अवांतर कागदपत्रांनी भुरळ घातली. हे आमचे वडील आम्हालाच कधी माहित नव्हते. कधी समजले नव्हते. आपण आपल्या परीने कमावते झालो आहोत आणि आई वडिलांना योग्य त्या सुविधा पुरवतोय, त्यात ते खुश आहेत या समजुतीवर आम्ही खुश होतो, पण वडिलांना कविता करायची आवड होती, सिनेमाची कथा लिहिण्याची आवड होती, हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं. खूप काही ओघवतं अवांतर लिहिलेलं आढळलं.

अजुनी तुम्हांस नाही, कसलाच ठाव माझा, मज ओळखाल तुम्ही, तुमच्याच नसेन तेव्हा…

राज असरोंडकर यांच्या कवितेच्या ओळींतून क्षणभर माझे वडीलच माझ्याशी बोलू लागले होत

वसाहतीतील कित्येक लहानसहान समस्यांना सोडवण्यासाठी नगरसेवक ते पोलिसांशी केलेला पत्रव्यवहार होता. त्यांना पत्रकार व्हायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा एक कोर्स केला होता, हे सुद्धा नव्याने समजलं. पत्रकार कसा असावा, यावर त्यांनी लिहून ठेवलेले काही पेपर्स होते. ते सर्व त्यांनी कुण्या नवख्या पत्रकाराला दाखवलं असेल का ? कि हे स्वतःची उजळणी म्हणून लिहिलं होतं? याचा अंदाज घेत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सुपूर्द करतानाचा एक फोटो सापडला. आंबेडकरी चळवळीत काम करताना फक्त रस्त्यावर येऊन मोर्चा आंदोलने, मोठमोठाली भाषणे केली पाहिजे, असं नाही. आपण आपलं काम वेगळ्या मार्गाने सुद्धा करू शकतो आणि तो सुद्धा चळवळीचा भाग आहे, असं ते नेहमी सांगत.

आम्ही राहत असलेल्या नवी मुंबईच्या घणसोली परिसरात त्यांनी बरेच समाजोपयोगी कार्य केले, घणसोली रेल्वे स्थानकात महिलांसाठी आरक्षित तिकीट विंडो असावी, घणसोली स्थानक ते सेक्टर ६ दरम्यान फुटपाथवरील पेव्हरब्लॉक काढून सिमेंट कोबा असावा, तसेच याच परिसरात असलेल्या मोठ्या नाल्याला वळसा मारून यावे लागे, त्यावर लोखंडी पुलाचे काम, विद्यार्थ्यांना वेगळा बस थांबा, प्रत्येक कॉलनीत (८ इमारतींची एक वसाहत) महामानवांचे जयंती उत्सव, रात्री पोलिसांची गस्त किंवा लहान पोलीस बिटची मागणी अशा कित्येक समस्यांचे पत्रव्यवहार आढळले. ही फक्त राहत असलेल्या वसाहतीतील कामे, परंतु इतर मागण्या जशा, लोकल ट्रेन मधील सूचनांची भाषा आणि लहेजा, ठाणे वाशी शेवटची लोकलची मागणी, ट्रॅक क्रॉसिंगच्या इथे बॅरिकेड किंवा संरक्षक भिंत अशा अनेक मागण्या वृत्तपत्रातून त्यांनी केलेल्या होत्या. त्यांची कात्रणे जमवून ठेवली होती. निवृत्त झाले असले तरी ताकद आहे तोपर्यंत आपल्या परीने आपण समाजाचं काम करत राहायचं, याचा जणू वसाच वडिलांनी घेतला होता.

प्रत्येक पान मी अधाशासारखं वाचून काढत होतो. वाचताना अक्षरं धूसर दिसायला लागायची, कारण ही ओळख वडिलांनी स्वतः कधी करून दिली नव्हती आम्हाला.

रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेत असलेले बुद्ध विहार अतिक्रमणाच्या जाणार होते. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयावर लोक नाराज झाले, पण तो निर्णय योग्य होता ते आज सर्वांना समजून आलंय. कोणतेही देवस्थान मग ते मंदिर असो वा विहार जर वाहतुकीला अडथळा ठरत असेल, आणि त्यामुळे रस्ता रुंदीकरणासारखे महत्वाचे प्रश्न प्रलंबित राहतं असतील तर अशी विहारे मंदिरे तोडली तरी चालतील, असं त्यांचं म्हणणं होतं.  परंतु त्याच बरोबर प्रशासनाने दुसरी पर्याप्त जागा मिळवून द्यावी, अशी सुद्धा त्यांचं मागणी होती. या प्रसंगात त्यांना समाजाचा विरोध सहन करावा लागला, पण असं असलं तरी त्यांनी त्यांचं कार्य बंद केलं नाही.

सोसायटीचे अध्यक्ष ते खजिनदार अशा महत्वाच्या पदांवर त्यांनी शेवटपर्यँत कार्य केले. पावसात इमारतींना लावायचे पत्र्यांचे शेड ते गटार साफ करून घेणे या सर्व कामांवर त्यांचे जातीने लक्ष असायचे, त्यामुळेच त्यांना पुन्हा पुन्हा निवडून दिले जायचे, असे त्यांच्या शोकसभेला त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते ते नगरसेवक आणि विभागातील पोलीस ऑफिसर्स या सर्वांसोबत वडील का ओळख ठेवत असत, याचं कोडं होतं. ते त्यांच्या पेटीतील तमाम पत्रव्यवहारावरून  लक्षात आलं. “आपण समाजाचं देणं लागतो” या बाबासाहेबांच्या संदेशाला माझे वडील खऱ्या अर्थाने जगले, काहीही न करताना दिसणारी माणसंसुद्धा बरंच काही करत असतात, आपल्याला त्याची कल्पनाही नसते.

वडिलांच्या कवितांना कवितेचे कुठलेही नियम नसतील, पण समाजाविषयीची तळमळ होती.

एका कवितेत ते म्हणतात,

सांगून गेले बाबा आम्हाला, माणुसकी तारा शत्रुबुद्धी नको, राहूदे प्रेमाचा पिसारा

बाबासाहेबांचा संदेश जो कुठल्याही भेदभावाला थारा देत नाही आणि माणुसकीची कास धरायला सांगतो, ते वडिलांना मांडायचं होतं.

एके ठिकाणी ते म्हणतात,

“अरे अरे बघा कसा जमाना आला, धर्माच्या नावाखाली कर्मा विसरून गेला, खोटे खोटे सांगून पहा मिळवतो मत कसा, नाही राहिला राजकारण्यांचा भरवसा ..

सामाजिक संदेश देताना ते सध्याच्या धार्मिक राजकारणावर सुद्धा टीका करतात आणि लोकांना उपदेश करतात कि खोटे नाटे सांगून राजकारणी लोकांना कसे फसवतात.

वडील तर निघून गेले त्यांचा पुढच्या प्रवासाला, पण त्यांच्या मागेही विचारांची तमाम संपत्ती आणि सामाजिक समतेचा आणि समाजकार्याचा संदेश देऊन गेले, त्यांची ही शिकवण सतत लक्षात ठेऊन त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करत राहू, कारण वडील खऱ्या अर्थाने जागल्याच्या भूमिकेत आयुष्य जगले, तो जागल्या आता आम्हाला व्हावं लागेल. वारसा चालवायचाच, तर तो सामाजिक बांधिलकीचा, जबाबदार नागरिकत्वाचा चालवावा लागेल.

 

– अमोल गायकवाड

(लेखक सामाजिक कार्यकर्ते, कवी, नाट्यचित्रपट समीक्षक आहेत.)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!