मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आदिवासी-हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा यांची ओळख आहे. आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी.
बिरसा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला. बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते. बिरसांना शिक्षणाची आवड होती. शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला होता. परंतु, शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणामध्ये मुंडा आदिवासींबद्दल ठग, चोर, बेइमान इत्यादी शब्दांचा वापर केला. तेव्हा बिरसा यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बिरसांना शाळेतून काढण्यात आले.
हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट (Birsaites) धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले, तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली.
१८५७ च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत
मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख ज्यांना ‘सरदारʼ म्हटले जात, त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. तो ‘सरदारी लढाईʼ म्हणून प्रसिद्ध झाला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता.
त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला.
१८९४ मध्ये आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट, इंग्रजांनी आदिवासींकडून जमीन महसूल ठरावीक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली. त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार व जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या. भरमसाठ व्याजदरांमुळे तारण जमिनी सोडवून घेणे आदिवासींना अशक्य बनले. जमीनमालकी असणारा आदिवासी भूमिहीन व वेठबिगार बनला. त्यामुळे बिरसांनी इंग्रजांविरुद्ध आदिवासी तरुण बांधवांचे संघटन केले.
समाजबांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावे, त्यामुळे आपले राज्य येईल, असे बिरसा सांगत. त्यांच्या शब्दांमुळे अनेक मुंडांनी ठेकेदार व इंग्रजांच्या कामास जाणे बंद केले. इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य आहोत, असे सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत. बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले. त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसांना बंदी करण्याचे ठरविले.
ब्रिटिशांनी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले (२६ ऑगस्ट १८९५). बिरसांच्या अटकेमुळे पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर ३० नोव्हेंबर १८९७ रोजी बिरसांची सुटका झाली.
कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे ५,००० आदिवासी सामील झाले. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून २५ डिसेंबर १८९९ पासून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली.
सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुंटी, कोरा, तामाड या प्रदेशांतील पोलीसचौक्या जाळण्यात आल्या. या मुक्तीआंदोलनाला मुंडारी भाषेत ‘उलगुलानʼ असे म्हणतात. या आंदोलनात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या तिरकामठ्यांद्वारे हजारो पोलीस व मुंडा आदिवासी मारले गेले.
अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला. बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांकडून ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना पकडण्यात आले. रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे निधन झाले.
Team MediaBharatNews