अमान्य सावरकरांचा सत्तास्वार्थी उदो उदो !

अमान्य सावरकरांचा सत्तास्वार्थी उदो उदो !

अमान्य सावरकरांचा सत्तास्वार्थी उदो उदो !

विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची किती वेळा माफी मागितली आणि त्यांना मोहनदास गांधी यांनी कधी तसा सल्ला दिला होता काय, यापेक्षा सावरकरांचा उदो उदो करणारे मूळात सावरकरांचा अनुनय तरी करतात का, या प्रश्न वर्तमानात अधिक महत्त्वाचा आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संघभाजपाच्या नेहमीच्याच कूटनीतीला अनुसरून एक निराधार विधान केलं आणि अपेक्षेप्रमाणे सावरकर विषयावर देश पुन्हा नव्याने विभागला गेला. विनायक सावरकर हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व असल्याने सावरकरांना विरोध करणाऱ्या लोकांना हिंदुत्वविरोधी ठरवून त्यातून सत्तेच्या बेरजेची गणितं खेळत राहणं भाजपाचा एक कुटील डाव आहे.

हिंदुत्व, राममंदिर, काश्मीरी पंडित, अनुच्छेद ३७० आणि सावरकर असे काही विषय राजकीयदृष्ट्या भाजपाच्या अजेंड्यावर दिसत असले किंवा दुसऱ्या अर्थाने, या विषयांचं स्वामित्व हक्क भाजपाकडे असले तरी या विषयांवर भाजपाला पूरक भूमिका असणारे लोक सगळ्या पक्षात आहेत आणि तीच भाजपाची जमेची बाजू आहे.

लोक देश म्हणून कुठल्याही विषयांवर विचारविनिमय करत नसतात, तर ते जातपातधर्म, भाषा, प्रांतीय अस्मिता या दृष्टिकोनातून किंवा अनेकदा वेगळं पडू नये म्हणून झुंडींचा भाग होऊन काही कारण नसतानाही समर्थन किंवा विरोध करत असतात.

लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर असतो आणि त्यांचा इतिहास सोयिस्करपणे चुकीच्या पद्धतीने सांगणारे तथाकथित शिवशाहीरही गुरूतुल्य असतात. लोक भाजपाच्या हुकुमशाहीविरोधात असतात, पण त्यांना काश्मीरमधली दडपशाही मनातून गुदगुल्या करत असते.

तोच प्रकार सावरकरांच्या बाबतीत आहे. मोगलांनी जसे लढाया जिंकल्यावर हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले तसेच ते शिवाजी महाराजांसारख्या हिंदू राजांनीही मुस्लिमांना धडा शिकवायला करायला हवे होते, ही सावरकरांची अपेक्षा ! असे सावरकर अनुच्छेद ३७० हटवल्यावर काश्मीरातील मुलींना पटवण्याच्या 'पराक्रमी' बाता मारू लागणाऱ्यांचे नायक असतील तर त्यात नवल काय ?

भारतीय सैन्यातला एक निवृत्त अधिकारी एस पी सिन्हा वृत्तवाहिनीवर थेट चर्चेत काश्मीरात 'बलात्कार के बदले बलात्कार' अशी गुन्हेगारी भूमिका मांडतो. हा विकृत सिन्हा चर्चांमध्ये हिंदुत्ववादाचं प्रतिनिधित्व करतो. मग त्याच्या या गचाळ भूमिकेचं प्रेरणास्त्रोत काय आहे, समाजमाध्यमात विरोधक स्त्रियांना सतत सामुहिक बलात्काराची उघड धमकी देणाऱ्यांचा आदर्श कोण आहे, हे तपासलं तर वैचारिक गफलत लक्षात येईल.

आपल्या अपेक्षेनुसार न वागणाऱ्या हिंदू राजांची सावरकरही बुळचट अशी संभावना करतात. ज्या सद्गुणांसाठी छत्रपती शिवरायांना जग ओळखतं, ते सद्गुण ( ज्यात परस्त्री सन्मानाचा समावेश आहे ) सावरकरांना विकृती वाटतात.

आपण पाहतो की परस्त्री सन्मानावरून शिवरायांवर भरभरून लिहिणारे, बोलणारे लोक सावरकरांचाही अनुनय करत असतात. यापैकी कोणता तरी एक अनुनय निव्वळ ढोंग आहे, हे या तथाकथित शिवभक्त किंवा सावरकरभक्तांना स्पष्टपणे सांगायला हवं.

सावरकर गांधीहत्येतून दोषमुक्त झालेले असले तरी ते गांधीहत्येचे सूत्रधार होते, ही चर्चा जनमानसातून संपलेली नाही. हिंदू महासभेची एखादी विकृत मानसिकतेची तथाकथित नेता जेव्हा गांधीच्या पुतळ्याला नव्याने गोळ्या घालते, तेव्हा हिंदू महासभेचं गांधीहत्येशी असलेलं नातं हितसंबंधितांना नव्या पीढीसमोर ताजं करायचं असतं. आपोआपच सावरकरांचं नावही तिथे जोडलं जातं.

गांधीद्वेष हा हिंदुत्ववाद्यांचा एक ठळक स्वभावगुण असल्याने त्यांच्या नजरेत गांधींना संपवणारा संशयित आरोपी म्हणून सावरकर थोर ठरतात. सावरकर गांधीहत्येतील आरोपी म्हणूनच संघभाजपाई राजकारणाच्या उपयोगाचे आहेत, निर्दोष म्हणून नव्हें, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

माथेफिरू देशद्रोही नथुराम गोडसे जर लोकांच्या नजरेतला तारा असेल तर सावरकरांचं स्थान त्यावरचं असणार, हे सरळ आहे. देशातला हा गोडसेप्रेमी वर्ग भाजपाचा मतदार आहे. सावरकरप्रेमी हा शंभर टक्के मुस्लिमविद्वेषी असतो. भाजपाला सावरकर त्यासाठी लागतात ; कारण भाजपाचं वर्तमानीय सगळं राजकारण मुस्लिमद्वेषावर उभं आहे. शिवाय, रास्वसंघाचं स्वातंत्र्य चळवळीत योगदान काय असा प्रश्न अंगावर आला की संघाला हिंदू महासभेच्या सावरकरांआड काही क्षण दडता येतं.

आम्हालाही सावरकर भावतात, पण आम्हाला मुस्लिमांबद्दल द्वेष नाही, असं म्हणणाऱ्या लोकांचा वैचारिक लोच्या झालेला असतो. ते स्वत:ला आणि समाजालाही फसवत असतात.

ज्यांना सावरकरांबद्दल नितांत आदर आहे, असे लोक सावरकरांचे गायीबद्दलचे विचार पसरवताना किंवा अंमलात आणताना कधीच दिसत नाहीत. उलट, तो विषय काढला की ते सावरकरप्रेमी असतानाही अस्वस्थ होतात. इथे ते तात्पुरते सावरकरांपासून अलिप्त होऊ पाहतात आणि सपशेल उघडे पडतात.

"सुबुद्ध आणि दयाशील आणि प्रामाणिक माणसाच्या डोऴ्यांवर धर्माची झापड पडली, की त्याची बुद्धी भ्रंशते, असं सावरकर 'गाय एक उपयुक्त पशू' या निबंधात ठामपणे सांगतात. गोरक्षण आणि गोभक्षण दोन्हीही का केले जाऊ नये? ब्रह्मवादाने या दोन्हीला स्वीकारले आहे. भक्षण आणि रक्षण हा भेदच ब्रह्मसृष्टीत नाही. 'नासतो विद्येत भावः नाभावो विद्यते सतः' ही ब्रह्मसृष्टी. मग गोभक्षण का करु नये," असं ते म्हणतात. सावरकरांची ही भूमिका संघभाजपाला, हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे काय ?

मनुष्याहून सर्व गुणांमध्ये अत्युच्च असेलल्या प्रतिकासच मनुष्याच्या देवाचे प्रतीक मानणे उचित आहे. पाहिजे तर गाढवाने त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या गाईस देव मानावे, पण मनुष्याने तसे करण्याचा गाढवपणा करु नये, असं ते स्पष्ट करतात. गायीचं शेण आणि मूत्र प्राशन करण्यावर सावरकर अत्यंत कडक शब्दांमध्ये टीका करतात. पंचगव्य प्राशन करणं हा अत्यंत किळसवाणा प्रकार असल्याचं ते सांगतात. सावरकरांच्या या रोखठोक विचारांचा प्रसार सावरकरप्रेमी करणार आहेत काय ?

एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. हे सावरकरांचं मत !

यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून आणि त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. असं त्यांना वाटायचं.

पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील. असं स्पष्टपणे बजावणाऱ्या सावरकरांचा हा राष्ट्रवाद का सांगितला जात नाही संघभाजपाकडून ?

म्हटलं तर संघभाजपालाही सावरकरांबद्दल फारसं प्रेम नाही. पटेल, आंबेडकरांसारखे त्यांना तोंडी लावायला सावरकर लागतात. सावरकर हीसुद्धा भाजपाची उसनवारी आहे. भारतीय जनमानसावर व्यापक प्रभाव असलेलं एकही व्यक्तिमत्त्व संघभाजपाकडे नाही.

२०१४ पासून नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री या नात्याने देशविदेशात फिरताहेत. पण देशाबाहेर कुठेही मोदींनी मी रास्वसंघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होतो, असा अभिमान व्यक्त केला नाही. हेडगेवार, गोळवलकर, उपाध्याय, मुखर्जी आणि सावरकरांचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला नाही. आपल्या आदर्शांची मोदींना का लाज वाटते, हा प्रश्न खरं तर हिंदुत्ववाद्यांनी ठणकावून मोदींना आणि भाजपाला विचारायला हवा. देशाची फाळणी करणाऱ्या गांधींचा जगभर उदोउदो करता, तो बंद करा आणि सावरकरांबद्दल गौरवाने बोला, अन्यथा निवडणुकीत पाडू, असं मोदीभाजपाला धमकावायला हवं.

संघभाजपासाठी सावरकर काही आदर्शवगैरे नसून तो त्यांच्यासाठी त्यांच्या राजकीय दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांच्या आवडीचा 'माल' आहे. भाजपा खरोखर सावरकरांना मानणारी असती तर भारतात २०१४ नंतर पोथ्यापुराणांचं, धर्माचं, बाबाबुआंचं, गायगुंडांचं स्तोम वाढलं नसतं. भाजपाने लोकांना भावनिक मूर्ख बनवणारं स्वतंत्र गायमंत्रालय काढलं नसतं. कोविडकाळात शेणामूताचं महात्म्य सांगणारे संदेश पसरवून लोकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ केला नसता. भाजपाचे खासदार कोविड प्रतिबंधक उपचार म्हणून शेणात लोळताना दिसले नसते. सावरकरांनी ज्याचा उल्लेख गाढवपणा असा केला, त्याला भाजपाने सरकारी प्रतिष्ठा मिळवून दिली नसती.

भाजपाला सावरकरांच्या हिंदुत्वाशी काहीही देणंघेणं नाही. भाजपा सावरकरांच्या काव्यातील संवेदनेच्या जवळपासही नाही. भाजपाई राजकारणात कवी, लेखक, क्रांतीकारक सावरकरांचं काही काम नाही, काही स्थान नाही !

भटशाही संपवा म्हणणारे, आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करणारे, गाय हा उपयुक्त पशू आहे असं सुनावणारे सावरकर भाजपाला अमान्य आहेत. आज जर सावरकरांनी आपली मतं व्यक्त केली असती तर मोदी राजवटीत हिंदुत्ववादी झुंडींकडून त्यांची कदाचित हत्यासुद्धा झाली असती !

पण आज सावरकरांचा उदो उदो सुरू आहे; कारण भाजपाच्या कामाचा आहे, सावरकरांचा कमालीचा मुस्लिमद्वेष ! तो इथल्या युवापीढीच्या मनात पेरण्यासाठी सावरकर हे भाजपाचं प्रभावी माध्यम आहे, हत्यार आहे !

 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मीडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!