मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
कोविड संकटकाळाचा गैरफायदा घेत मुंबई महापालिकेत शिवसेनेचा मनमानी कारभार सुरू असून, भोजन ते कफनपर्यंतच्या प्रत्येक विषयांत भ्रष्टाचार आहे. त्यासंदर्भात आम्हाला चर्चा करायचीय. पण महापौर किशोरी पेडणेकर महासभा बोलावण्याचं टाळताहेत. त्यामुळेच आम्ही महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणत आहोत, असं मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रभाकर शिंदे यांनी ‘मिडिया भारत न्यूज’ ला सांगितलं. महापौरांविरोधात भाजपाने अविश्वास ठराव आणण्याला शिवसेनेने स्टंटबाजी म्हटलंय. सभागृहात ते त्यांचं म्हणणं मांडतील, तेव्हा सडेतोड उत्तर देऊ, असं शिवसेना उपनेते व स्थायी समिती सदस्य यशवंत जाधव यांनी म्हटलंय.
मुंबईत कोविड रुग्णदर आणि मृत्यूदर वाढण्याला महापालिकेला परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश कारणीभूत आहे, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. सत्ताधारी आणि प्रशासनाचं लक्ष भ्रष्टाचारावर असून कोविड संकटाचा गैरफायदा घेण्यात त्यांना स्वारस्य असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. या काळात जी खरेदी झालीय, ती सगळी चढ्या दराने झाली असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय.
पीएमकेअर्समधून ८१० वेंटीलेटर्स महापालिकेला आले होते. त्यातला एकही इन्टाॅल झालेला नाही. त्याची ते काहीही उडवाउडवीची कारणं सांगतात. सद्याचं कोविड संकट हाताळणारी महापालिकेची यंत्रणा अपुरी आहे. त्यात प्रचंड त्रूटी आहेत व प्रचंड भ्रष्टाचार आहे, असं शिंदे यांचं म्हणणं आहे.
जी खिचडी सामाजिक संस्था १५ रुपयांत देतात, तिचाच महापालिकेने ४० रुपये दर लावला. सगळे मजूर गावी निघून गेल्यानंतरही महापालिकेने ६३ कोटींचं जेवणाचं कंत्राट काढलं. त्याविरोधात आम्ही हरकत घेतल्यावर ते मागे घेतलं. हाफकिन इन्स्टिट्यूटने जे मास्क ४ रुपये ८५ पैसे दराने विकत घेतले, तेच महापालिकेने ११ रुपये ७५ पैसे दराने खरेदी केले. १२०० ते १४०० रुपयांना मिळणाऱ्या बाॅडीबॅग्जसाठी सहा हजार मोजले, अशी विविध प्रकरणांची यादीच प्रभाकर शिंदेंनी ‘मिडिया भारत न्यूज‘ समोर ठेवली.
शहरातील हाॅस्पिटलांमधील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश असताना महापालिकेने ते केलेलं नाही. मुंबईकर रुग्णांची लूट सुरू आहे. पाच ते दहा लाखांची बिलं माथी मारली जात आहेत. दरपत्रक निश्चित करून ते प्रसारित करा, अशी मागणी आम्ही केली. पण टाळाटाळ सुरू आहे, असाही आरोप शिंदे यांनी केलाय. आयुक्त सांगतात, बेड उपलब्ध आहेत. पण प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी आहे. लोकांना बेडसाठी पाचपाच तास फिरावं लागतंय. महापालिकेच्या रुग्णालयातूनच रुग्णांना खाजगी रुग्णालयात जायला भाग पाडलं जात असल्याचा गंभीर आरोप शिंदेंनी ‘मिडिया भारत न्यूज‘कडे केला.
विरोधी पक्षनेते प्रभाकर शिंदे म्हणाले की असे भोजन ते कफनपर्यंतचे भ्रष्टाचाराचे व अनियमिततेचे कितीतरी विषय आहेत. ज्यावर महासभेत चर्चा होणं आवश्यक आहे. पण महापौर सभा बोलावणं टाळताहेत, त्यामुळेच आम्ही मुंबई महापालिका अधिनियमातील कलम ३६ खाली विशेष सभेची मागणी केलीय. कायद्याप्रमाणे ती सभा बोलावणं महापौरांना भाग आहे.
शिवसेनेने मात्र अविश्वास ठरावाची खिल्ली उडवलीय. महापौरांशी थेट संपर्क झाला नाही, पण शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ‘मिडिया भारत न्यूज‘ शी बोलले. महापौरांना पत्र देताना भाजपाने अविश्वासाची कोणतीही कारणं दिलेली नाहीत, असं नमूद करून यशवंत जाधव म्हणाले की महापौर किशोरी पेडणेकर गेले सहा महिने पायाला भिंगरी लावल्यागत मुंबईत फिरताहेत. भर पावसात त्या मुंबई शहराची पाहणी करत होत्या. अगदी त्यांनी जीवाची पर्वा न करता हाॅस्पिटलांना भेटी दिल्यात. त्यावेळी भाजपाचं कुठे कोण फिल्डवर होतं ? असा सवाल जाधव यांनी केला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत जाधव म्हणाले की पत्रात त्यांनी कुठलाही उल्लेख केलेला नाही. कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही जी जी पावलं तातडीने उचलणं गरजेची होती, ती उचलली आहेत. आज महापौर स्वत: आजारी आहेत. त्या काळात भाजपाने ही स्टंटबाजी चालवलीय. पण महापौरांना बरं वाटताच त्या योग्यवेळी सभा बोलावतील. तिथे भाजपाला काय बोलायचं ते बोलूद्या. शिवसेनेला लक्ष्य करून त्यांच्या सगळ्या हालचाली सुरू आहेत. पण भाजपा कधीच सफल होणार नाही. प्रत्येक गोष्टीचं आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असा आक्रमक पवित्रा जाधव यांनी घेतला.
मिडिया भारत न्यूज चे संपादक आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक
‘मिडिया भारत न्यूज‘ चं सकाळचं बातमीपत्र ‘मुडमाॅर्निंग दुनिया’ बुलेटीन – २८ ऐकण्यासाठी इथे क्लिक करा :