तू माझ्याबरोबर येशील का? ह्यांनी अनपेक्षितपणे प्रश्न केला. पण आपल्याला कुठे? केव्हा? कशासाठी? जायचं आहे ते तर आधी सांगा, मग मी येईन, असं म्हटलं खरं, पण इतकं तुला सांगायला मला आता खरंच वेळ नाही. तुझं मी नाव देतोय आणि तू माझ्याबरोबर येणार आहेस, बस्स ठरल तर मग. असं उत्तर मिळालं. मीसुद्धा "ठीक आहे येईन" असं बोलून मोकळी झाले.

दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून हे वैती साहेबांचा बंगलाच सर्वांसाठी बुक करून येतील याची मला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. त्यातही इतक्या लोकांचं आगतस्वागत, जेवण, सर्वकाही व्यवस्थापन इतक्या कमी वेळात करायचं? म्हणजे थोडं धास्तावणारंच होतं.
मला कळेचना इतकी धावपळ, इतकी धडपड हे कोणासाठी करत आहेत? मला उगीच घाम फुटला. माणसं नवी. कार्यक्रम नवा. काय तो नीट माहीत नाही. महिला येणार आहेत म्हणून मी औक्षणाची तेवढी तयारी करून आले होते. तिथे आल्यावर इतक्या लोकांना भेटल्यावर मला कळलं ह्यांच्या मानगुटीवर बसलेल हे गारुड नेमकं कोणाचं आहे?

"दिपक भाऊ" एक अवलिया. १५ वर्षांपासून ऑस्ट्रेलियात आहेत. दूर राहूनही ज्यांनी आपल्या जन्मभूमीशी घट्ट नाळ जोडून ठेवलीय. इथल्या काही मोजक्या लोकांचा वाॅटस्एप समूह त्यांनी बनवलाय. त्यांच्या भेटीचा सोहळा मुंबई ठाणेकरांनी ठेवला होता. किती प्रेमळ माणसं ही. भारी भारी.... एकदम भारी!
"बॉर्डरलेस पँथर्स" नावात नावीन्यपूर्णता असलेला एक what's up ग्रुप आणि त्यातही नावीन्यपूर्ण असलेली ग्रुपमधील मंडळी. ज्यांची कर्मभूमी जरी निराळी असली तर जन्मभूमीशी नातं हृदयातून पक्क जोडलेलं आहे.
सर्वाना भेटून मला भारी कौतुक वाटलं. किती उच्च विचारांची माणसं आहेत ही सारीच. ज्यांना कशाचाही गर्व नाही. फक्त प्रेम देणं- घेणं आणि एकमेकांना समजून घेऊन त्यांना समाजात मोठं करणं, हे काम हा ग्रुप करीत असतो. मदतीला धावत असतो. माणसं जोडत असतो.

सारीच मोठमोठ्याल्या हुद्द्यांवर असलेली मंडळी. विशी पासून ते पन्नाशीच्या पलीकडची ही मंडळी येऊरच्या रम्य संध्याकाळी एकत्र जमून छान गप्पांत रमून गेली.
या गप्पांमधून गावची ओढ प्रत्येकालाच लागलेली असते हे कळलं. हा सोहळा खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला. १० फेब्रुवारीला दीपकभाऊ ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ते नावालाच. बाॅर्डरलेस पॅंथर्सच्या माध्यमातून ते इथेच असतात. ठाण्यातल्या आपल्या गावात...आपल्या अवतीभवती...येऊरला झालेल्या छोटेखानी समारंभाच्या आठवणींतून !

नंदा संजय गवांदे
लेखिका शिक्षक आहेत.
gawandenanda734@gmail.com