नारायण दाभाडकर प्रकरणात संघभाजपाची मन की बात आणि विरोधकांचाही आततायीपणा !

नारायण दाभाडकर प्रकरणात संघभाजपाची मन की बात आणि विरोधकांचाही आततायीपणा !

नारायण दाभाडकर प्रकरणात संघभाजपाची मन की बात आणि विरोधकांचाही आततायीपणा !

Discharge Against Medical Advice ( DAMA ) अर्थात, वैद्यकीय सल्ल्याविरोधात रुग्णालयातून पाठवणी ! ही सोय कोविडसारख्या जागतिक संसर्गजन्य आजारात असू शकते काय, हा एक कळीचा मुद्दा नारायण दाभाडकर प्रकरणाच्या निमित्ताने उपस्थित झालाय. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील परिशिष्ट ड मधील प्रकरण १४ कलम ३६ नुसार, संसर्गजन्य आजार झालेल्या रुग्णाला घरी पाठवण्यापूर्वी तो राहत असलेली जागा आजार पसरू नये, या दृष्टीने सुयोग्य आहे का, हे आधी निश्चित करावं लागतं.

दाभाडकर यांना कोविड बाधा झालेली असल्याचं तपासणी अहवालातून निश्चित झालेलं होतं. १९ एप्रिलला त्यांचा कोविड बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतरही ते घरीच राहून उपचार घेत होते. मात्र २२ एप्रिल रोजी त्यांची प्राणवायू पातळी कमी झाल्यावर तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात हालवण्यात आलं होतं. खूप शोधाशोध केल्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था झाली.

नागपुरात दाभाडकर ज्या मुलीकडे आसावरी कोठीवान यांच्याकडे होते, ज्या भाजपाच्या पदाधिकारी आहेत. त्यांचे सासरे अत्यावस्थेत असल्याने त्यांना घर सोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे दाभाडकरांची दुसरी मुलगी व जावई त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. तिथे तपासलं गेल्यावर त्यांची प्राणवायू पातळी ५५ पर्यंत खाली उतरलेली होती. एक्सरेतूनही त्यांना झालेली बाधा शरीरात भरपूर पसरल्याचंही दिसून आलं होतं. तिथे त्यांना कृत्रिम प्राणवायू देऊन उपचार सुरू करण्यात आले. परंतु, दाभाडकरांना तिथे थांबायचं नव्हतं. माझं जे होईल, ते घरी व्हावं, अशी त्यांची इच्छा होती.

दाभाडकर यांनी आपली इच्छा मुलीला व जावयाला बोलून दाखवली. त्यांनी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. मग त्यांचं आसावरी यांच्याशी मोबाईलवर बोलणं करून देण्यात आलं. डाॅक्टरांनी समजावलं. पण ते ऐकेनात ; शेवटी त्यांना DAMA करून घरी पाठवण्यात आलं.

हा सगळा आसावरी यांनीच सांगितलेला प्रसंग. त्यांचा सदरबाबतचा विडिओ समाजमाध्यमात आलाय. आसावरी यांच्याच म्हणण्यानुसार, नारायण दाभाडकर यांनी आपलं घरी जाण्याचं कारण रुग्णालयात कोणालाही सांगितलेलं नव्हतं. ते त्यांनी केवळ आपल्या मुलींनाच सांगितलेलं होतं.

बीबीसी ने केलेल्या वृत्तांकनात त्या दिवशीच्या घटनाक्रमाबद्दल इंदिरा गांधी रुग्णालयाच्या कोव्हिड विभागाचे प्रमुख अजय हरदास यांनी दिलेली माहिती आलीय.

त्यात ते म्हणतात,

“22 एप्रिल 2021 रोजी आमच्या पूर्णत: कोव्हिड रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात नारायण दाभाडकर यांना आणण्यात आले. आम्ही त्यांच्यावर लागलीच उपचार सुरू केले. पण उपचारादरम्यान ते मला घरीच जायचं आहे. मला हॉस्पिटल मध्ये ठेऊ नका असा आग्रह करु लागले. ते घरी जाण्याचा आग्रह का करु लागले, याची आम्हाला माहिती मिळाली नाही.”

डॉ. हरदास पुढे म्हणतात, “22 एप्रिल रोजी आमच्या रुग्णालयात कोरोना पेशंट्सची मोठी गर्दी होती. आमचे महापालिकेचे रुग्णालय असल्यामुळे आम्ही कुणालाही परत पाठवत नाही. त्या दिवशी तर आम्ही खुर्चीवर बसवूनही अनेक रुग्णांना ऑक्सिजन सपोर्ट दिला होता. नारायण दाभाडकर कॅज्युअल्टीमध्ये काही वेळ उपचार घेत असताना त्यांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये सुधारणा होत होती. आम्ही त्यांना कोव्हिड वॉर्डात हलवणार होतो. पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी नेण्याची परवानगी मागितली, ती आम्ही त्यांना दिली.”

डॉ. हरदास यांच्या वक्तव्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात. दाभाडकर कॅज्युलिटिमध्ये उपचार घेत होते, त्यांना कोविड वार्डात हालवण्यात येणार होतं, ते वेंटिलेटरवर नव्हते. महत्त्वाचं हे की ते घरी जाण्याचा आग्रह का करू लागले, याची डॉक्टरांना माहिती नव्हती.

लोकसत्ता दैनिकाने गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीलू चिमुरकर (गंटावार) यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या,

नारायणराव दाभाडकर यांना २२ एप्रिलच्या संध्याकाळी रुग्णवाहिकेतून येथे आणण्यात आले. ते स्वत: चालत आल्याने त्यांची प्रकृती स्थिर वाटत होती. त्यांना करोनाची लक्षणे असल्याने तातडीने रुग्णालयातील आकस्मिक विभागात दाखल केले. प्राणवायू आणि इतर औषधोपचार सुरू झाले. रात्री ७.५५ वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णालयात राहायचे नसल्याचे सांगत घरी जाण्याचा आग्रह धरला. तुमचे वय अधिक असून, करोनामुळे जीवाला धोका संभावतो, असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. परंतु, त्यांनी स्वत: जोखीम पत्करून रुग्णालयातून सुटी घेतली. या वेळी त्यांनी माझी खाट दुसऱ्या रुग्णाला द्या, असे काहीही सांगितले नाही. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना असे काही सांगितले असेल तर मला कल्पना नाही. त्यांच्या नातेवाईकांनीही मला याबाबत काहीही कळवलेले नाही !

याचा अर्थ, समाजमाध्यमात रंगवण्यात आलेला आजूबाजूचा कोलाहल, महिलेच्या पतीचा प्रसंग वगैरेची कुठेच सुसंगती लागत नाही. वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे, समाजमाध्यमात असा बिनधोक दावा करण्यात आला की दाभाडकर यांनी रुग्णालयाला लिहून दिलंय की माझा बेड मी स्वेच्छेने सोडतोय. तो अमुकतमुकला देण्यात यावा. प्रत्यक्षात अशा प्रकारचं कसलंही पत्र दाभाडकरांनी रुग्णालयाला दिलेलं नाही.

जे पत्र दिलं गेलंय ते त्यांच्या जावयाचं दोन ओळींचं पत्र आहे, ज्यात लिहिलंय की आम्ही आमच्या जबाबदारीवर रुग्णाला घरी घेऊन जात आहोत.

इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की नारायण दाभाडकरांनी कोणासाठी तरी बेड सोडला, याला रुग्णालयातून पुष्टी मिळत नाही. ती बाब त्यांच्या कुटुंबियांकडून पुढे आलेली आहे. तीही रुग्णालयातून घरी गेल्यावर तब्बल आठवडाभराने ! मृत्यूनंतर तीन दिवसांनी !

नारायण दाभाडकर रास्वसंघाशी संबंधित असल्याने, संघातून ही बाब माध्यमांकडे पेरण्यात आली.

शिवानी दानी वखारे ह्या भाजयुमोच्या महाराष्ट्र महासचिवपदी असलेल्या युवतीने २६ एप्रिलला पहाटे साडेबारा वाजता सदरबाबत पोस्ट लिहिली.

त्यातला काही भाग पुढीलप्रमाणे :

काकांना श्वास लागला होता, पण ते पूर्ण शुद्धीवर होते. स्वतः एम्ब्युलन्समधून उतरून ते दवाखान्यात चालत गेले. एडमिशनची प्रोसेस लहान जावयांनी केली आणि काकांना बेड मिळाला. उपचार सुरु झाले. एव्हाना काकांच्या नजरेस एक दाम्पत्य पडले, ज्यात चाळीशीत असलेल्या नव-याच्या बेड साठी बायको जीवाचे रान करत होती, ओक्सबोक्सी रडत होती. पण बेड काही उपलब्ध होईना. अश्यात एक स्वयंसेवक काय करू शकतो ?? काका डॉक्टरांना म्हणाले, “मी आता ८५ वर्षांचा आहे, माझे जे काही आयुष्य होते ते आता जवळपास पूर्ण झाले आहे. मी समाधानी आहे. ह्या तरुणाचे वाचणे मात्र खूप खूप महत्वाचे आहे.त्याचे अजून खूप आयुष्य बाकी आहे. त्यांची मुले लहान आहेत .मला बेड नको. तुम्ही माझा बेड त्यांना द्या, त्यांना तातडीने वाचवा.”

हीच पोस्ट शेफाली वैद्य यांनी इंग्रजीत भाषांतरित केल्यानंतर या घटनेला व्यापक प्रसिद्धी मिळाली. संघभाजपाच्या जाळ्यातून ती मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आली. पहिल्यांदा आॅप इंडिया, स्वराज्य वगैरे सारख्या संघभाजपा प्रणीत माध्यमांनी दाभाडकरांची बातमी केली.

दाभाडकरांचा संघ स्वयंसेवक असा आवर्जून उल्लेख आल्याने पाठोपाठ मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमात कोणतीही खातरजमा न करता फेसबुक पोस्ट आणि ऐकीव माहितीच्या आधारावर बातम्या प्रसारित करण्यात आल्या. रास्वसंघ, भाजपाशी संबंधित बातमी असली की ती पडताळून पाहण्याची गरज नसते, असा एक अलिखित नियम आपल्याकडे प्रस्थापित झालाय. या बातम्यांमधील युवकासाठी बेड सोडला, या माहितीला काहीच ठोस आधार नाही.

शिवानी दानी वखारे यांच्या पोस्टमधील काका डाॅक्टरांना म्हणाले हा भाग आसावरी कोठीवान यांनी जारी केलेल्या विडिओतील माहितीतही खोटा ठरला आहे. आसावरी यांनी स्पष्ट केलंय की दाभाडकर यांचं घरी जाण्याबाबत डाॅक्टरांसोबत काहीही बोलणं झालेलं नव्हतं.

अर्थात, आपलं वय झालंय आणि आपण बेड अडवून ठेवण्यापेक्षा तो दुसऱ्या कोणासतरी मिळेल, असं दाभाडकर यांच्या मनात आलं असण्याची किंवा त्यांनी तसं मागाहून कुटुंबियांना बोलून दाखवलं असल्याची किंवा ते तशा प्रकारे अनौपचारिकरित्या व्यक्त झाले असण्याची व कुटुंबातून ही बाब निकटवर्तीयांत बोलून दाखवले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु, दाभाडकरांच्या आडून रास्वसंघाची भलामण करण्याच्या नादात माहितीत मनकीबात घुसडली गेली आणि आपण बेड अडवून ठेवू नये, असं दाभाडकरांच्या खरोखर मनात आलं असेलही, पण वाढवून सांगितल्या गेलेल्या माहितीमुळे व डॉक्टरांशी न झालेल्या संवादात त्यांच्या तोंडी घातलेल्या कपोलकल्पित उदगारांमुळे त्यांच्या मनातल्या उदात्त हेतूचं ( जर असेल तर ) मातेरं झालं.

दाभाडकरांच्या कुटुंबियांना समाजमाध्यमातील उलटसुलट चर्चांमुळे जो मनस्ताप झाला असेल किंवा त्यांच्यावर दु:खद काळात खुलासा करण्याची पाळी आली असेल, तर त्याला संघभाजपाई मंडळींचा आततायीपणा आणि प्रसिद्धीलोलूपता जबाबदार आहे. इतकंच नव्हे, तर एखादं प्रकरण केवळ रास्वसंघाशी संबंधित आहे, म्हणून दाभाडकरांसारख्या एखाद्या वयोवृद्धाची ज्या रीतीने खिल्ली उडवली गेली, ते सुद्धा समर्थनीय ठरू शकत नाही.

दाभाडकर प्रकरणात दोन्ही बाजूच्या लोकांनी धडा घेण्याची गरज आहे, अर्थात तशी शक्यता नजिकच्या काळात तरी दिसून येत नाही.

 

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मिडिया भारत न्यूज / संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!