मागास जातीतील जातीयवाद आणि पुरुषसत्ताकतेने संपवलं एका युवतीचं उभारतं आयुष्य !

मागास जातीतील जातीयवाद आणि पुरुषसत्ताकतेने संपवलं एका युवतीचं उभारतं आयुष्य !

मागास जातीतील जातीयवाद आणि पुरुषसत्ताकतेने संपवलं एका युवतीचं उभारतं आयुष्य !

मुलगा मुलगी दोघेही मागास ; तरीही भिन्न जातीचे असल्याने इथे जातीयवाद आडवा आला. म्हणायला धम्माचा मार्ग लग्नासाठी वापरला पण पैशाची लालसा सुटली नाही ! आणि नवरा मुलगा ? तो तर अगदी कोणत्याही साचेबद्ध पुरुषासारखाच वागला ! त्यातून जीव गेला एका युवतीचा ! जगणं काय असतं ते अनुभवायच्या आधीच तिचं आयुष्य संपलं. तथाकथित नवऱ्यानेच अत्यंत क्रूरतेने तिला संपवलं.

घटना मुंबईतील चेंबूर भागातील अशोकनगर परिसरातील. मुलगी आणि मुलगा एकाच प्रवर्गातील अर्थात अनुसूचित जाती; पण जाती वेगवेगळ्या असल्याने दोघांच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे मग दोघांनी विवाह करण्याचा निर्णय परस्पर घेतला. बुद्ध धम्म सोसायटी या संस्थेत ७ डिसेंबर २०१९ रोजी झाला. विवाह झाल्याचं दोघांनी मागाहून जाहीर केलं.

घरच्यांना ही बाब कळलीच. मुलीकडचा विरोध अधिक असल्याने पुन्हा समाजात रीतसर लग्न व्हावं, अशी भुमिका मुलाच्या आईवडलांनी घेतली. ही बाब या मुलीच्या सासूसासऱ्यांनी मुलीला बोलूनही दाखवली. मुलगीही तयार झाली ; मुलगा तर तयार होताच म्हणा!

रीतसर लग्नाचं आयोजन जानेवारी महिन्यात केलं गेलं. जसं आयोजन केलं तसा मुलाच्या आईनं मुलीकडे लग्नाचा अर्धा खर्च आईवडलांकडून मागून घे म्हणत पैशाची मागणी केली.

मुलीने ही बाब आईला बोलून दाखवली. आईने घरातले राजी नाहीत, आमची परिस्थिती बिकट असल्याने एवढा खर्च देऊ शकत नाहीत, पण मुलीचं आम्ही स्वतः लग्न केलं असतं तेव्हा खर्च करावाच लागला असता, याचा विचार करुन ५० हजार रुपये अन काही दागिने देऊ केले. ज्यात अडीच तोळ्याचा मुलीला नेकलेस मुलाला अंगठी वगैरेंचाही समावेश होता.

लग्नाच्या दिवशी मुलीचे आईवडील आज्जी मामा आणि इतर मोजके नातेवाईक उपस्थित राहिले. नवरी मुलगी मुलगा स्टेजवर आणि नातेवाईक स्टेजच्या खाली बसले. यात पहिल्या रांगेत मुलीची ८५ वर्षाची आज्जी बसली. त्या आज्जीला मुलाच्या आईने, तुमची अवकात नाही पहिल्या रांगेत बसण्याची ! जिथं चपला बुटं सोडतात त्या ठिकाणी जाऊन बसा, 'अशी भाषा वापरली.

दुसरी घटना मुलीच्या आईचा मुलाच्या आईला धक्का लागल्याची घटना; ज्यात मुलीच्या आईने जाणीवपूर्वक धक्का मारल्याचा बोभाटा मुलाच्या आईने केला. यावरून भांडण वाढत गेलं. यावर मुलीने मुलाला घरच्यांना आवरायला सांगत भांडण थांबवायला सांगितले, पण मुलाने आईवडलांची बाजु घेतली. पुढे या जोरदार भांडणाचं पर्यावसान मुलाने स्टेजवरच मुलीच्या कानाखाली मारण्यात झालं.

या घटनेचा जबरदस्त आघात मुलीवर झाल्याने तिने स्टेजवरच रितसर लग्न करण्यास नकार दिला. मुलीने नकार दिल्याने मुलीचे आईवडील मुलीला लग्न न लावता घरी परत घेऊन गेले. विवाहमंडपातून नवरी मुलगी निघून गेल्याने समाजात नाचक्की होऊ नये म्हणून नवरदेवाकडची मंडळी आरसीएफ पोलीस ठाण्यात पोहचली.

नंतर मुलगी तीन-चार महिने आईवडलांकडे राहीली तिकडे हा मुलगा तिला माफी मागण्यासाठी सारखं ये-जा करू लागला. यापुढे होणार नाही, आपण वेगळं राहू वगैरे बोलू लागला. ही बाब मुलीने आईला सांगितली. मुलीने एक चान्स देऊ, अशी भुमिका घेतल्याने आई आणि वडीलही, 'होत असतात अशा घटना, विसरून जाऊ, असा विचार करुन 'हो' म्हणाले.

२०२१ मध्ये मे महिन्यात मुलीच्या आईने मुलगी आणि जावयांसाठी भाडेतत्वावर खोली करून दिली. घरभाडं, किराणा भरून दिला. संसाराला लागणारं सामान घेऊन दिलं. पंधरा दिवस नीट गेल्यावर जेवण चांगलं बनवता येत नाही आणि इतर कारणावरुन मुलगा त्रास देऊ लागला. दारू पिऊन मारू लागला. ही गोष्ट मुलीने आईला सांगितली.

दोघांना समजावून सांगण्यासाठी म्हणून मुलीची आई या दोघांकडे गेली. तिथे दोघांनाही समजाऊन सांगितलं व तिथेच चारपाच दिवस राहिली. सासू रहायला आल्याने नवरा मुलगा घर सोडून त्याच्या आईवडलांकडे गेला. तो पंधरा दिवस वाट पाहूनही न आल्याने मुलीने भाड्याची रुम सोडली अन् ती आईवडलांकडे राहायला गेली.

एका लाईफ केअर हाॅस्पिटलमध्ये तिने रिसेप्शनिस्टची नोकरी पत्करली. पण नवरा मुलगा तिला पैशासाठी त्रास देऊ लागला. याबाबत अदखलपात्र गुन्हाही आरसीएफ पोलीस ठाण्यात नोंद आहे.

दरम्यान दोघांचा परस्पर सहमतीने नोटरी घटस्फोट झाला. एकमेकांची अडवणूक करणार नाही, दावा देणार नाही, पोटगी मागणार नाही अशा बाबींचा उल्लेख त्यात होता. पण मुलगा तरीही तिला फोन करून त्रास देत असे.

९ नोव्हेबर २०२१ रोजी सदर मुलीचा वाढदिवस होता. तो तिने तिचे कुटुंबीय आणि मोजक्या मित्र मैत्रीणीसोबत साजरा केला. या दिवशी त्याने सतत तिला फोन करून बोलवले, पण तिने भेटणे टाळले. याचा राग मनात धरून त्याने दुसऱ्या दिवशी १० नोव्हेबरला तिचा तिच्या घरापासूनच गाडीवर पाठलाग केला.

ज्या रिक्षाने ती प्रवास करत होती, त्यामध्ये इतरही प्रवासीही होते. त्याने रिक्षातून ओढून तिला बाहेर खेचत चाॅपरने सपासप वार केले. ती जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत तो मारत होता. तिचा एवढ्या क्रुर पद्धतीने आणि सुडभावनेने खून केला की, तिच्या डोक्याच्या बटा जाग्यावर तुटुन गळून पडल्या. तिचा दातावर मार लागल्याने तिचे दात हिरड्यासहीत तुटुन पडले होते. एक देखणी पोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघून बघणाऱ्यांचा जीव हळहळत होता.

या गुन्ह्यात फक्त नवराच अटक आहे. मुलाचे आईवडील आणि इतर जण परिसरातून पळून गेलेत. लग्नानंतर सात वर्षाच्या आत विवाहितेचा मृत्यू झालाय. त्या दृष्टिकोनातून प्रकरण हाताळले जायला हवं होतं. हुंडा मागितला गेलाय, तिकडे दुर्लक्ष करण्यात आलं. याच घटनेला जातीय, धार्मिक रंग असता तर महाराष्ट्र पेटला असता ! पण इथे दोन्हीही मागासवर्गीय असल्याने घटना गांभीर्याने घेतली गेली नाही.

मागासवर्गीय जातीमधील उपजातीमध्ये जातीयता कशी भयंकर पद्धतीने वाढते आहे, याचं हे ज्वलंत उदाहरण !

लग्नाच्या स्टेजवरच नवऱ्या मुलीला मुलगा कानाखाली मारतो. तो पितृसत्तेने किती झपाटलेला असेल ? माझी नाहीस तर कुणाचीच होऊ देणार नाही, ही जी हिंसक भाषा वापरत दलितांमध्येही पुरुष स्त्रीवर कसं नियंत्रण ठेवू पाहतात, ते या घटनेतून दिसतं.

प्रेमात असतानाचा छपरी व्यसनी प्रियकर पुढे नवरा झाल्यावर मात्र तो दारूड्या बेवडा वाटू लागतो. जो सहन होत नाही. अशा मुलांना मुली नवरा म्हणुन निवडताना विचार करीत नसतील का? मुलीचा बाप अपंग ,लहान भाऊ शाळा शिकतोय, आई प्रायव्हेट नर्स म्हणून नोकरी करते. त्यांची एकुलती एक मुलगी माणुसकीचा लवलेश नसलेल्या नालायक व्यक्तिने मारून टाकली.

सदरील मुलीचा जी वाचवता आलं असतं, जर मुलगी मेल्यावर बघे जमा होण्यापेक्षा तिचा जीव वाचवण्यासाठी जमा झाले असते तर ! आपण बघे लोकं भारतीय संविधानातील नागरीकांची कर्तव्ये का बजावत नसू ! पोलीस नवराबायकोची भांडणं कुठवर दखलपात्र ठरवणार आहेत? या मुलाविरोधात वेळोवेळी तक्रारी दिल्याचे पुरावे त्यांच्याकडे असतानाही पाहिजे तशी दखल का घेतली गेली नाही?

नोटरीवरील घटस्फोट हा कायदेशीर घटस्फोट असतो का? कारण कित्येक मुलींचं आयुष्य या नोटरी घटस्फोटामुळे उध्वस्त होतानाच्या घटना वाढत्या आहेत. आता तर महाराष्ट्रात दारू आणखी स्वस्त करण्यात आलीय. ही जीवघेणी स्वस्ताई महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणारेय कोणास ठाऊक ?

 

 

 

 

सत्यभामा सौंदरमल

सचिव, निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था
sattayabhamasaundarmal@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!