उल्हासनगरातील श्रीमती चांदीबाई हिंमथमल मनसुखानी महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक वर्गाने दीपावलीच्या पूर्वसंध्येला दीपसंगीत या गाण्यांच्या मैफलीचा आस्वाद घेतला. महाविद्यालयाची माजी विद्यार्थी समिती आणि सिंधी सर्कल ऑफ सीएचएम कॉलेज यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
दीपावलीचं निमित्त साधून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे विद्युत रोषणाई, दिवे आणि रांगोळ्यांनी महाविद्यालयाचं आवार सजवलं होतं.

वैशाली साळवे-जांभुळकर, निषाद जोशी, शशांक चंदेल, कुणाल या माजी विद्यार्थ्यांनी संगीत मैफल रंगवली. त्यांच्या स्वरांनी महाविद्यालयाचं सभागृह प्रफुल्लित झालं. हिंदी -सिंधी-मराठी भाषांत सादर झालेल्या लोकप्रिय गाण्यांनी उपस्थित सर्वांची मनं जिंकली. विवेक भागवत, नरेंद्र सकते, विनोद निंबाळकर यांनी तबला, सिंथेसायजर, ऑक्टोपॅड, ढोलक यांची साथ दिली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजू लालवानी पाठक यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या गुणांचं कौतुक केलं. हे सगळं वातावरण नवी उर्जा देणारं आहे, असं प्राचार्या म्हणाल्या. माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष डॉ. नीतिन आरेकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं.
महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. मराठी विभागातील प्राध्यापक वृषाली विनायक यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.