मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
बाजारहाट करणाऱ्या एका महिलेशी एक युवक लगट करत असतानाचा व्हिडीओ भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केला. नेहमीच्याच आक्रमक पद्धतीने त्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आणि पोलिसांकडून उस्फूर्तपणे दखल घेत कारवाईची मागणी केली. मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या ट्विटला उत्तर देत सदरचा व्हिडिओ खोडसाळपणे प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल असून, आपण चुकीची माहिती पसरवू नये, अशी समज चित्रा वाघ यांनाच दिली आहे.
घटना मालेगावच्या आझादनगरमधील गांधी कपडा मार्केटमधली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला होता. गलिच्छ किळसवाणी क्लीप बघून तळपायाची आग मस्तकात जाते, असं त्यांचं ट्वीट होतं.
हे मालेगावच्या आझादनगर मधील गांधी कपडा मार्केट आहे
बघा ही गलीचछ किळसवाणी क्लीप
जी बघून तळपायाची आग मस्तकात जाते@SPNashikRural कुणाची तक्रार येण्याची वाट न पहाता स्युमोटोतं दखल घ्या
हा बिभत्स प्रकार करणारा व याचा असुरीआनंद घेत दात काढणार्यांवर तात्काळ कारवाई करा @maharashtra_hmo pic.twitter.com/BTinEuOQ2F— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 16, 2021
चित्रा वाघ यांच्याकडे सदरच्या घटनेची क्लिप तर होतीच, परंतु जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या बातमीचा संदर्भही होता. ‘ हि बातमी बघा ! इथला रिपोर्टर मालेगावमध्ये आहे व तिथून ग्राउंड रिपोर्टींग करून ह्या घटनेची माहिती देतोय. कुठलीही चुकीची माहीती पसरवण्याचा हेतू नाही, कृपया ही लिंक तपासून पहा, असं म्हणत त्यांनी बातमीची युट्यूबवरील लिंकही ( https://t.co/qxwjDVYxGK ) पोलिसांना दिलेल्या प्रत्युत्तरात सोबत जोडली होती. परंतु, ती लिंकही आता उघडली जात नाही.
हि बातमी बघा इथला रिपोर्टर मालेगाव मध्ये आहे व तिथून ग्राउंड रिपोर्टींग करून ह्या घटनेची माहिती देतोय
कुठलीही चुकीची माहीती पसरवण्याचा हेतू नाही
कृपया ही लिंक तपासून पहा https://t.co/qxwjDVYxGK https://t.co/0eJJBdG9fC https://t.co/v99ebocoBR
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 16, 2021
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने आणि बेजबाबदारपणे सदरची बातमी सादर करण्यात आलेली होती. मालेगावातील स्थानिक पत्रकार मनोहर शेवाळे यांनी तर मालेगावातील पूर्वपश्चिम अशा कोणत्या भागातला व्हिडिओ आहे, तेही बेधडकपणे सांगितले होते. विडिओत दिसणाऱ्या अनोळखी पीडित महिलांचा उल्लेख हिंदू महिला असा करून वृत्तवाहिनीने आरोपीचा तथाकथित धर्म अधोरेखित करण्याचा खोडसाळ प्रयत्नही केला होता.
वास्तविक मालेगावात हा व्हिडीओ हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होईल अशा मजकुरासोबत पसरवण्यात आला होता. व्हिडिओतील दृश्य जरी अत्यंत आक्षेपार्ह आणि किळसवाण्या पुरुषी विकृतीचं प्रदर्शन करणार असलं तरीही प्रथमदर्शनी कोण कुठल्या धर्माचा आहे, हे सांगणं मुश्कील होतं आणि ठरवणं बेजबाबदारपणाचं होतं. तरीही त्या त्या घटनेला हिंदू-मुस्लिम विद्वेषाचे रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची बातमी आगीत तेल ओतणारी होती.
त्यामुळे पोलिसांनी तातडीने सूत्रं हालवत व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिस नाईक संतोष घोडेराव यांच्या तक्रारीवरून, मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात उमाकांत कदम ह्या ४४ वर्षीय व्यक्तिविरोधात भादंवि १५३(ब) आणि ५०५(२) कलमांखाली गुन्हा ( ०५३५/२०२१) दाखल करण्यात आलाय. धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा सदर बातमीचा युट्युबवरील व्हिडीओही आता काढून टाकण्यात आलेला आहे. दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांनी ट्विट करून स्पष्टीकरण केलंय की पत्रकार मनोहर शेवाळे यांनीही सदरची घटना मालेगावातील नसल्याची खात्री केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही घटना दुसऱ्या राज्यातील असल्याचं म्हटलं आहे. मात्र ते राज्य कोणतं, याचा उल्लेख नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेला नाही.
मालेगावातील व्हायरल व्हिडीओ संदर्भात महत्वाचे अपडेट !
शहरात झालेल्या व्हायरल व्हिडीओची घटना मालेगावातील नसून या बाबतीत बातमी टाकलेल्या मालेगावचे प्रतिनिधी मनोहर शेवाळे यांनी खात्री केली असून हा व्हिडीओ ज्या इसमाने व्हायरल केला आहे त्यावर मालेगांव पोलिसांत— NASHIK RURAL POLICE (@SPNashikRural) July 17, 2021
मिडिया भारत न्यूज ने केलेल्या पाठपुराव्यात, सदरची क्लीप गुजरातच्या अहमदाबादेतील असल्याचं दिसून आलंय. प्रसिद्ध तीन दरवाजा मार्केटमधली ती घटना असल्याची माहिती आढळून आलीय.
१५ जुलै, २०२१ च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या Serial groper strikes in Ahmedabad’s Teen Darwaza या शीर्षकाखालील बातमीत याच विडिओचा उल्लेख आहे. कारंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सदरची घटना असल्याचं बातमीतून स्पष्ट होतंय.
समाजमाध्यमातील विविध मेसेजिंग एप्समुळे देशाच्या एका कोपऱ्यातील घटना काही क्षणात दुसऱ्या कोपऱ्यात पोहचतात. देशात सतत अस्थिर वातावरण ठेवू पाहणाऱ्यांना अशा घटना हव्याच असतात. स्वत:च्या मनाने मीठमसाला लावून जातीय धार्मिक तेढ पसरण्यास कारणीभूत होईल, अशा पद्धतीने त्या सादर केल्या जातात.
असे विडिओ वेगाने पसरवणाऱ्या धर्मांध विचारसरणीच्या टोळ्याही भारतात आहेत. अशावेळी सर्वसामान्य लोकांनीच अशा मेसेज/फोटो/विडिओजपासून सावध राहण्याची गरज आहे. आणि अशा विडिओजबाबत वेळीच पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी जशी मालेगाव प्रकरणी तातडीने कारवाईची पावलं उचलली तशी महाराष्ट्रातील सगळ्याच पोलिस ठाण्यांनी कारवाई केली तर खोडसाळ प्रवृत्तींना काही प्रमाणात आळा बसू शकेल. महाराष्ट्र सरकारने तसे रीतसर आदेशच पोलिसांना जारी करावेत, अशी मागणी कायद्याने वागा लोकचळवळ सरकारकडे करीत आहे.