मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातला सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख विरोधक तसंच प्रमुख स्पर्धक राजकीय पक्ष मानला जातो. हा पक्ष कायम धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व तसंच स्त्रियांच्या अनुसूचित जाती जमातींच्या व अल्पसंख्यांकांच्या हिताची भाषा बोलत आला आहे. भारतीय संविधानाबद्दलसुद्धा हा पक्ष भरभरून बोलतो ; परंतु काँग्रेस स्वत:ची पक्षांतर्गत घटनासुद्धा पाळत नसल्याचं महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्याने घोषित कार्यकारणीवरून दिसून आलं आहे.
नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद आल्यानंतर पहिल्यांदाच प्रदेश कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे ! खरं म्हणजे पक्षीय घटनेनुसार प्रदेश कार्यकारिणीत निवडणुकीच्या माध्यमातून सदस्य जाणं अपेक्षित आहे.
ब्लॉक समित्यांनी गुप्त मतदानाच्या माध्यमातून प्रदेश समितीवर सदस्य निवडून पाठवायचे आहेत. परंतु लोकशाहीच्या बाता मांडणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षात अंतर्गत निवडणुका हा फक्त फार्स असतो, हे गेल्या कित्येक वर्षात भारतीयांनी पाहिलं आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारणी ही निर्वाचित नसून ती घोषित आहे.
काँग्रेसच्या पक्षीय घटनेनुसार प्रदेश समितीमध्ये महिलांचं ३३ टक्के व अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्यांकांचे २० टक्क्यांहून कमी नाही, इतकं प्रतिनिधित्व ठेवण्यात आलेलं आहे.
यामध्ये अपवादात्मकरित्या तडजोड करण्याची तरतूदही असली तरी नव्याने घोषित महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत महिलांना स्पष्टपणे डावललं गेलं असल्याचं दिसून येत आहे.
काॅंग्रेस प्रदेश कार्यकारणीतील अध्यक्षांसह एकूण सदस्य संख्या ही जवळजवळ दोनशेच्या आसपास आहे. पक्षाच्या घटनात्मक आरक्षणानुसार किमान 60 हून अधिक महिला या कार्यकारिणीत असणं अपेक्षित होतं ; परंतु महाराष्ट्र काँग्रेसला आपल्या प्रदेश कार्यकारिणीत घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून वीससुद्धा महिला लायक आढळलेल्या नाहीत.
ज्या काॅंग्रेस पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व एका महिलेकडे आहे आणि जो पक्ष पुरोगामित्वाच्या बाता मारतो, त्या पक्षाच्या पुरोगामी राज्य असलेल्या महाराष्ट्र कार्यकारणीची ही हालत आहे.
घोषित कार्यकारिणीत १८ उपाध्यक्ष आहेत, त्यात एक महिला आहे. त्याही राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव ! महासचिव ६५ आहेत, महिला फक्त ६ ! सचिव १०४ आहेत, महिला फक्त १० ! ६ प्रवक्त्यांत १ महिला आहे. शिस्तपालन समितीत तर एकही महिला नाही.
विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १४५ जागा लढवल्या होत्या. पैकी फक्त १४ जागांवर महिलांना उमेदवारी दिली होती. त्यातल्या ५ निवडून आल्या. यशोमती ठाकूर, प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके, वर्षा गायकवाड आणि प्रणीती शिंदे या पाचही महिला आमदारांना कौटुंबिक राजकीय वारसा आहे. एकंदरीत महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र काॅंंग्रेसमध्ये आनंदीआनंद आहे.
संपादक, मिडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com