राकेश पद्माकर मीना हे कायद्याने वागा लोकचळवळीचे महाराष्ट्र राज्य संघटक आहेत. पुण्याच्या भारती विद्यापीठातून समाजसेवेची पदवी घेतलेल्या राकेश यांनी नामांकित सामाजिक संस्थांसोबत गेल्या ५-६ वर्षात शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांवर महाराष्ट्रातील विविध भागात काम केलं आहे...मूळचे कल्याण येथील असलेले राकेश पद्माकर मीना यांचं शालेय आणि महाविद्यालयीन तसंच एम. ए पर्यंत शिक्षण ठाणे आणि मुंबईत झालंय. महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामजिक उपक्रमात सहभागी होत, तिथे नेतृत्व करण्याची संधी त्यांना हमिळाली; त्यातूनच विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी युनियनचीही जबाबदारी आली. नंतरच्या काळात योग्य त्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यात येत असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन पक्षाविरहित काम करण्याचा निर्णय घेतला. समाजसेवेची पदवी घेतल्यानंतर एका सामाजिक संस्थेसोबत कार्यरत असताना कायद्याने वागा लोकचळवळीची ओळख झाली आणि आपणसुद्धा याच पद्धतीनं काम करू पाहतोय, हे लक्षात आल्यानंतर संघटनेची जबाबदारी २०१६ मध्ये स्वीकारली. आधी कल्याण शहर समन्वयक आणि आता महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून ते कार्यरत आहेत. याच माध्यमातून महाराष्ट्राभर चळवळीचे काम पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अभिनयाची आवड जोपासत असताना राज्य नाट्य स्पर्धा, विद्यापीठ स्तरावरील वकृत्व, निबंध, पथनाट्य स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग त्यांनी नोंदवला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील याच सर्व कामगिरीसाठी त्यांना २०१५ -२०१६ साठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.