लुटारू सज्ज झाले !

लुटारू सज्ज झाले !

लुटारू सज्ज झाले !

कोरोना काळात मृतदेहावर व्यवस्थित अंत्यसंस्कार न झाल्याने आत्मा भटकता राहू नये, म्हणून लोकांना घाबरवून लुटणारे विधी सुरू होतील, अशी भीती मी गेल्या दिवसांपासून सातत्याने बोलून दाखवतोय. ती सार्थ ठरलीय.

जोवर जगात शिकूनसवरूनही मूर्ख राहिलेल्यांची, देवाधर्माच्या नादी लागून अक्कल गहाण ठेवणारी बेअकली जमात आहे, तोवर ही लुटालूट सुरू राहणार ! जगात कुठे देवबिव, भूतंप्रेतं, आत्मापरमात्मा खरोखर असते, तर जग इतकं दु:खाने, संकटांनी भरलेलं नसतं, हे कोणाही सामान्य बुद्धीच्या व्यक्तिला सहज कळावं !

खरंच भूतं असती तर किमान बलात्कार होऊन हत्या झालेल्या महिलांच्या भूतांनी तरी बदला घेतलाच असता. पण समजून घेणार कोण ? बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या भोंदूंचा फोटो पुजणारी, आरती करणारी बुद्धीबधीरता समाजात भरभक्कमपणे पाय रोवून आहे. तथाकथित शिकल्यासवरलेल्यांनी तिला खतपाणी घातलंय. श्रद्धेची झापडं डोळ्यांवर चढली की तिचं अंधश्रद्धेत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.

जगात कुठेतरी परमेश्वर नावाची शक्ती आहे, तिने या सृष्टीची निर्मिती केलीय म्हणून कुठल्याही दिशेला हात जोडून कृतज्ञतापूर्वक नमन करणं एकवेळ समजण्यासारखं आहे. पण गल्लीतल्या कुठल्याही सोम्यागोम्याच्या पाया पडून साकडं घालणारे, नवस सांगणारे, गाऱ्हाणं घालणारे, छुछा करून आपले प्रश्न सोडवू पाहणारे लोक मानसिक आजारी असतात. त्यांना प्रयत्नपूर्वक बाहेर काढणारं कोणी भोवताली नसेल तर त्यांचा प्रवास विनाशाकडे होतो.

ही माणसं नकारात्मक मानसिकतेची असतात. लहानसहान गोष्टींवरून लगेच निराश होणारी असतात. त्यांना कोणी किती समजावून सांगितलं तरी श्रद्धेचा बाऊ करून आपल्या मूर्खपणाचं समर्थन करत राहतात. कारण स्वत:च्या मेंदूवरचं नियंत्रण त्यांनी केव्हाच गमावलेलं असतं.

कोविड आजारातून खरंतर अशा लोकांनी चांगला धडा घ्यायला हवा होता. धर्मस्थळंच बंद झाल्यावर तरी त्यातला फोलपणा समजायला हवं होता. पण झालं भलतंच. लुटारू सज्ज झालेत मेलेल्यांना मोक्ष द्यायला आणि सुशिक्षित अडाण्यांची झुंड हात जोडून उभी आहे लुटू द्यायला. दक्षिणा दामदुप्पट झालीय. मयतांचे विधी कधीही न करणारेही स्मशानाकडे वळू लागलेत.

गंभीर आजारातून बरं झालेली एक व्यक्ति एकदा मला म्हणाली होती, केवळ साधूबाबांची कृपा म्हणून मी वाचलो. मी त्यांना इतकंच म्हटलं, चांगली गोष्ट आहे. साधूबाबांनी वाचवलं. गेली कित्येक वर्षं तुम्ही साधूबाबांचे भक्त आहात. पण या आजारात तुम्हाला ढकललं कोणी ? साधूबाबा तेव्हा काय करत होते ?

 

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक आणि मिडिया भारत न्यूज चे संपादक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!