प्रिय नानिवडेकर सर…

प्रिय नानिवडेकर सर…

प्रिय नानिवडेकर सर…

काल पहाटे सुरू झालेला धुवांधार पाऊस अजूनही कोसळतोय.. बाहेर आणि आतसुद्धा… प्रचंड प्रेम तुमचं पावसावर.. तुम्ही असण्याचीच जाणीव करून देतोय जणू दरक्षणी.. दर आठ पंधरा दिवसांनी येणारा तुमचा फोन सुद्धा असाच तर असायचा… शब्द-काव्य सरींचा वर्षाव झेलत ओलेचिंब होत रहावे ऐकणाऱ्याने…

तुमचा आवर्जून येणारा फोन घेतला की, “उर्मिले” या शब्दांनी सुरू होणारा संवाद “लिहिती रहा” शब्दांनी तुम्ही आटोपता घ्यायचात… या दोन शब्दांच्या मध्ये कमीतकमी तासभर जे काही असायचं ती म्हणजे कवितेची, साहित्याची आणि नैसर्गिक माणुसपणाची एक कार्यशाळाच जणू..

वीस बावीस वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “उर्मिले” कवितेवर त्यावेळी तुमचं फिदा होणं माझ्या त्या पोरसवदा वयाला अपूर्वाईचं असणं हे काही नवल नव्हतं… भारावून जायचे दिवस होते ते पण त्यांनतर आतापर्यंत कधीही मी भेटल्यावर, माझ्याशी बोलताना माझा “उर्मिले” असाच उल्लेख करून माझ्या त्या कवितेची तुम्हाला आजही असलेली आठवण तुम्ही ताजी करायचा हे म्हणजे माझ्यासाठी मोठ्ठा पुरस्कारच असायचा.. कवितेचा असा सन्मान तुमच्यासारखा नखशिखांत संवेदनशील माणूसच करू शकतो.

अनेक प्रसंग आहेत तुमच्या सोबतचे …तुमच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचे.. तुमच्या उपस्थितीत कविता सादर करण्याचे.. तुमच्या सोबत एका व्यासपीठावर विराजमान होण्याचे.. तेव्हाच्या पुढारी नवांकुर पुरवणी मध्ये लिहिणाऱ्या आम्ही दोघी बहिणी (सीमा पवार )  आणि आमच्या प्रत्येक लिखाणाला मिळणारं तुमच्या कौतुकाचं बळ.. तेव्हाही मोठेपणाची झुल (जी तुम्ही कधी पांघरलीच नव्हती खरंतर ) सहज बाजूला सारत आमच्या सारख्या नवोदितांशी आपण केलेल्या गप्पागोष्टी, सोबतची कविसम्मेलने आणि सततचा संवाद आम्हाला समृद्ध करत राहिला.

तसे तर प्रत्येक वळणावर तुम्ही सोबत राहिलात. तुमच्यातील लोभस माणूसपण भुरळ घालत राहिलं.

नामानंद मोडक सर यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भरवलेलं चित्रप्रदर्शन.. तुमच्या हस्ते उदघाटन .. तेथील दिवा उजळताना उपस्थितांमध्ये असलेल्या मला हाक मारून तुम्ही पुढे बोलावले… एक दिवा माझ्याही हाती दिलात.. आणि पाण्यार्पण करायला लावलात .. सर्वार्थाने आपल्याहून लहान असलेल्या व्यक्तीला किती सहज मान दिलात.. आणि बाजूला एका आश्वासक वडीलधाऱ्या प्रमाणे उभे राहिलात. तुमच्या मनाची अस्सल श्रीमंती ही अशी सहजगत्या प्रकट व्हायची कारण तो तुमच्या जगण्याचाच एक अविभाज्य भाग होता.

फेसबुकवरील पोस्ट असो किंवा एखादया यशाची वर्तमानपत्रातील बातमी … तुमचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा फोन आला नाही असं कधीही झालं नाही.. माझ्या घरी असलेला रेंज प्रॉब्लेम खूप त्रासदायक असायचा तुमच्यासाठी .. तुम्ही तशी प्रेमळ तक्रार वारंवार करायचात.. पण पुढच्या वेळी पुन्हा आठवणीने फोन करणं काही थांबवलं नाही तुम्ही…

एखादया तीव्र मतभेदाच्या मुद्द्यावर सुदधा अगदी ऋजु , प्रेमळ शब्दांत सुसंवाद साधता येतो याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे तुमचं बोलणं… कोणतीही वैयक्तिक कटुता न ठेवता सगळ्यांशी माणूस म्हणून कसं जोडून रहावं हे तुमच्याकडूनच शिकावं.. आणि एखाद्याचं छोट्यात छोटं यश सुद्धा आपल्या कौतुकभरल्या शब्दांनी कसं सेलीब्रेट करावं याचा वस्तुपाठ म्हणजे तुमची निखळ शाबासकीची थाप…

माझा भाऊ डॉ. सतीश पवार याच्या कवितासंग्रहासाठी शुभेच्छा लिहिताना … तुम्हाला भावलं होतं ते त्याच्यातील प्रांजळ माणूसपण..

“कविता वाचतीलच ग सगळे पण आपल्याला माणूस वाचता यायला हवा.. समजून घेता यायला हवा अंतर्बाह्य…” हा तुमचा ठाम आग्रह.. तुम्ही त्याला लिहिलेल्या शुभेच्छांमधून शब्दाशब्दांत जाणवतोय.

अगदी हाच जिव्हाळा राजनने स्वतःचं डिजिटल न्यूज सुरू केलं तेव्हाच्या तुमच्या बोलण्यात होता. “या माध्यमातून आपल्या हातून अधिक व्यापक अशी जनसेवा घडत राहू” असे निखळ आशीर्वाद दिलात तुम्ही आम्हाला…

“नदी वाहते वाहू दे काठ आपण व्हायचे
जागा सोडून स्वत:ची नाही वाहत जायचे…”

हेच सांगत राहिलात सतत.. असंख्य डोळ्यांतील पाणी खळलं नाहीय सर गेल्या चोवीस तासांत.. अनेक लिहित्या हातांतील शब्द अक्षरशः थरथरलेत… पोरके झालेत कारण अनेकांच्या नवख्या लेखन प्रवाहाचे काठ होता तुम्ही…! प्रवाहाला त्याचं स्वतःचं स्वातंत्र्य देऊन त्याचं बांधेसूद रूप घडवणारे कातीव काठ..!

फक्त पाचच दिवस झालेत … अशाच एका मुसळधार पावसाच्या सरीतच तुमचा फोन आला होता. उर्मिले, अशी नेहमीची सुरुवात झाली.. बेबंद कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजात आणि रेंजच्या बेभरवशी किरकोळ जीवावर तुमचे शब्द कानात साठवायचा माझा प्रयत्न सुरूच राहिला… एकाक्षणी रेंजने डाव साधला आणि संवादच तुटला. व्यवस्थित रेंज मध्ये जाऊन पुन्हा फोन करेन हा स्वतःला दिलासा देत फोन बाजूला ठेवला गेला… आणि “लिहिती रहा” हे तुमचे फोन ठेवतानाचे नेहमीचे शब्द ऐकायचेच राहून गेले सर… ते ही कायमचे .

आता तो खळाळता , निर्व्याज आवाज आणी ते मधूहास्य परत कधीही ऐकू येणार नाही हे समजून घेण्याइतके पोक्त आम्ही नाहीय अजून..

कदाचीत आता “लिहिती रहा” हे मला सांगायची आवश्यकता उरली नाहीय हा तुम्हाला दृढ आत्मविश्वास असावा जो आता माझी जबाबदारी बनलाय..

माझीच नव्हे तर … ज्या लिहित्या हातांमागे तुम्ही ठाम उभे होता त्या साऱ्यांचीच ….

तुमचे शब्दरूपी अनेक आशीर्वाद व्हाट्सएप प्रोफाईलला आहेत.. काल दिवसभर त्याची अनेकदा पारायणे झाली … आता तुम्हाला तिथेच शोधावं लागणार अधूनमधून…

माझी मैत्रीण योगिता कदम पवार म्हणते… नानिवडेकर सर = एक निरागस मूल

आता ते निरागस मूल तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला स्वतःत जिवंत ठेवायला हवंय हीच खरी तुम्हाला आदरांजली सर … !!

 

 

 


सरिता पवार

कवयित्री ( कणकवली, सिंधुदुर्ग)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!