गरीब-श्रीमंत, लहान-मोठा कोणीही असो दिवाळी म्हटली की आपण आनंदून जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. जिकडेतिकडे रोषणाई. दिवाळीची प्रसन्नता मनामनाला भावते. वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून गणला जातो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवतो , तो सण म्हणजे दिवाळी.
आपापल्या परीने अतिशय उल्हसित मनाने दीपावली साजरी होते. दिवाळीचा फराळ, विविध वस्तूंची, नवीन कपड्यांची खरेदी अशा एक ना अनेक गोष्टींची रेलचेल सुरू असते. जो - तो आपल्या ऐपतीप्रमाणे अशी अनुभूती घेत असतो. संपूर्ण कुटुंब एकत्र येणं , अनेक नातेवाईक घरी येणं , त्यांच्या येण्याने घरचं वातावरण अति उत्साहित होणं हे याच सणात पाहायला मिळतं.

सासुरवाशिणी माहेरी येतात. मुली , बहिणी माहेरी आल्या की जुन्या आठवणींना आपोआप उजाळा मिळतो. बालपणीच्या गप्पागोष्टी होतात. हास्याची आनंदी कारंजी घराघरात फुलतात, तर कधी अश्रूंचे बांध फुटतात. दोन वर्षांत कोरोनाने अनेक घरांतले सदस्य गेले. या दिवाळीत त्यांच्या आठवणी मनाला अस्वस्थ करतील, हे विसरुन कसे चालेल. एक ना अनेक आठवणी दाटून येतील .
घरातल्या सर्वांनी मिळून केलेली घराची साफसफाई, घरात एकत्रपणे केलेला फराळ, एकमेकांना दिलेले सरप्राईज गिफ्ट हे खरंच खूप आनंद देणारं असतं.

प्रचंड काळोखात जसा एकटा असलेला दिवासुद्धा खूप प्रकाशमान वाटतो, तसंच इतरांचं आयुष्य उजळून निघण्यासाठी एक तरी दिवा त्यांच्याही अंगणात लावावा, ज्यांना दुःखाने ग्रासलं आहे. मदतीचा हात दिल्याने थोडसं त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य येईल .
एक दिवा संकटात असलेल्यांसाठी, एक दिवा आजारग्रस्तांसाठी, एक दिवा अक्षरओळख नसलेल्यांसाठी, एक दिवा आधार नसलेल्यांसाठी होता आलं तर जरुर व्हावं आणि एक दिवा कोरोनाने जे आपले विश्वबांधव गेले त्यांच्यासाठीही लावूया.खूप नाही पण निदान जितकी आपल्याने करता येईल, तेवढी मदत जरी आपण गरीबाला केली तरी त्यांच्याही आयुष्यात आपल्याला आनंद आणता येईल .

प्रत्येक मदत ही पैशातच करायला हवी, असं मुळीच नाही. जे आपण देऊ शकू इतरांसाठी ते देऊ. कधी आपला थोडासा वेळ , कधी त्यांच्यासाठी केलेले जमेल तेवढे शारीरिक कष्ट , कधी मनमोकळं बोलणं , कधी शाब्दिक आधार , तर कधी सुंदर साधलेला संवाद , कधी अन्नदान ! ज्या स्वरूपात आपल्याला मदत करता येईल तेवढी करावी .
दिवाळी माझी , दिवाळी तुझी , दिवाळी आपल्या सर्वांची लाडकी होऊन जावो. सर्व घराघरांत आनंद देऊन जावो. अशा या सुंदर दीपावलीच्या सर्वांना मनापासून सदिच्छा !
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com