दिल्लीत एका मोबाईल चोराने सहाय्यक पोलिस निरीक्षकाला भर रस्त्यात भोसकल्याची घटना घडलीय. हा हल्ला सुरू असताना भोवताली गर्दी होती. कोणीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिस अधिकाऱ्याने मात्र चाकूने वार होत असतानाही चोराला धरून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तो पळून जाण्यात सफल झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू ओढवला. त्याच्या कुटुंबियांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक करोड रुपयांची मदत घोषित केलीय.
देशाची राजधानी असूनही गुन्हेगारीच्या बाबतीत दिल्ली अग्रेसर आहे. भारतातली केंद्र सरकार अंकित माध्यमं दिल्लीतल्या गुन्हेगारीचा विषय फारसा उचलून धरत नाहीत. दिल्लीत आपचं सरकार असलं तरी दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत, पण दिल्लीतील गंभीर घटनांवेळीही माध्यमे चुकूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाब विचारताना दिसत नाहीत.
देशभरातील अर्ध्या अधिक लोकांच्या हे गावीच नसतं की दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत, त्यामुळेच वाढती गुन्हेगारी, दिल्ली पोलिसांची अरेरावी किंवा दिल्ली पोलिसांनाच पोलिस ठाण्यात घुसून चोपण्याचे प्रकार घडले तरी अमित शहा लोडला टेकून निर्धास्त असतात. त्यांना खात्री असते की धर्मांध झालेला या देशातला आपला पाठीराखा कुठल्याच गोष्टीसाठी आपल्याला जबाबदार धरत नाही.

राजधानी दिल्लीत सहाय्यक पोलिस निरीक्षक शंभू दयाळ यांना भर रस्त्यात भोसकलं गेलं, पण कुठलंही माध्यम या घटनेसाठी केंद्र सरकारला जाब विचारत नाही ; उलट आरोपीचं नाव मोहंमद अनीस आहे, हे ठसवण्यावर सगळ्या माध्यमांचा, वृत्तवाहिन्यांचा जोर होता. मुस्लिम द्वेषाच्या बाबतीत आता भारतातील वृत्तवाहिन्यांनी निर्लज्जतेचा आणि माणुसकीहीनतेचा कळस गाठला आहे. सुदर्शन नावाच्या विखारी वृत्तवाहिनीने तर घटना जेहाद पर्यंत नेली.
४ जानेवारीची घटना आहे. आरोपीने एकाचा मोबाईल हिसकावला होता. त्याची पत्नी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेली होती. तपास शंभू दयाळ यांच्याकडे आल्यावर ते तक्रारदार महिलेसोबत एका वस्तीत गेले. तिथे महिलेने आरोपीला ओळखले.

शंभू दयाळ यांनी आरोपीची गच्ची पकडली आणि रस्त्याने चालत पोलिस ठाण्याकडे जात असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला चढवला. भोवताली जमाव होता. कोणीही आरोपीला रोखलं नाही. जखमी अवस्थेत शंभू दयाळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ८ जानेवारीला त्यांचा मृत्यू ओढवला. आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहे. आरोपीचं नाव अनीश !
त्याचं माध्यमांनी केलं मोहंमद अनीस ! टाईम्स, एनडीटीव्हीपासून सगळ्या वृत्तवाहिन्या, दैनिकांनी आरोपीचं नाव मोहंमद अनीस असंच प्रकाशित केलं. संघभाजपाच्या टोळीने शंभू दयाळ यांच्या मृत्यूवर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार अगदी निलाजरेपणाने नेहमीसारखाच केला.

पण अल्ट न्यूज सारखी माध्यमं असल्याने या विखारी टोळीचं थोबाड वारंवार फुटत आलंय. अल्टन्यूजने दिल्ली पोलिसांच्या एका प्रसिद्धीपत्रकाचा हवाला दिला. शिवाय, पोलिस अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बोलून खात्री केली. पोलिस ठाण्यातून सांगण्यात आलं की आरोपी हिंदू आहे. इंडियन एक्स्प्रेसने आरोपीचं योग्य नाव प्रकाशित केलं होतं. ते होतं अनीश प्रल्हाद राज !
माध्यमांनी संघभाजपाचा विखारी अजेंडा राबवण्यासाठी प्रल्हाद राज गायब केलं आणि अनीश केलं. काहींनी धर्मांधतेचे अधिक तळवे चाटत ते मोहंमद अनीस केलं. आता तेच देशभर वेगाने पसरवत राहिलं जाईल. संघभाजपाला चांगलं माहितीये की या देशातला बुद्धीबधीर समाज हा सगळा खोटेपणा अभिमानाने आपल्या भाळी मिरवतो. कुणाला ना लाज ना खंत ना खेद !
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com