सगळं उलथवून टाकलं पाहिजे !

‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ ही काही विध्वंस करण्यासाठी मारलेली घोषणा , लक्ष वेधण्यासाठी केलेली tag line किंवा स्वतःचे काहीही जळू न देता सोशल मेडिया वरं पोकळ वाद घालणाऱ्या समाजहितचिंतकाची ओळ नाही तर एका टोकाच्या हळव्या पण अत्यंत निर्भीडपणे समाजातील विसंगती वर अचूक बोटं ठेवणाऱ्या देवा झिंजाड यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे शीर्षक आहे.

काव्यसंग्रहाच्या नावातूनच बंडाची, विद्रोहाची कल्पना रसिक वाचकाला येते. देवा झिंजाड यांच्या कविता पुस्तक रूपाने आत्ता प्रकाशित होत असल्या तरी खळखळून हसवत डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा पहिला हास्यसम्राटमधला एक कलाकार म्हणून, ग्रामीण जीवनातील पिळवटून टाकणाऱ्या सामाजिक वास्तवावर अचूक टिप्पणी करत मर्मभेदी कविता लिहिणारा आणि उत्तम सादरीकरणाद्वारे रसिकांच्या ह्रुदयांत स्थान मिळवलेला कवी म्हणून देवा दादाला आज सगळा महाराष्ट्र ओळखतो.

‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या देवा दादांच्या काव्यसंग्रहातील कविता त्यांच्या जीवनातील संघर्षातून अन अनुभवातून आलेल्या वास्तवाचं भेदक दर्शन घडवत असल्या तरी त्या फक्त तेवढेच दाखवत नाहीत तर शोषण करत असलेल्या व्यवस्थेवर , व्यवस्थेच्या तळाशी असलेल्यां शोषित घटकांवर , वंचितांच्या दुःखावर ,भवतालच्या परिस्थितीवर त्या भाष्य करतात. त्यांची कविता वर्तमानातील समाजव्यवस्थेवर जागतिकीकरणानंतर सुजलेल्या अर्थव्यवस्थेत सर्वस्व हरवून बसलेल्या शेती मातीतल्या माणसांच्या करपून गेलेल्या आयुष्यावर सणसणीत शब्दांत भाष्य करते.

‘टायघाल्या ‘ या पहिल्याच कवितेत शेतकऱ्यांच्या आयुष्याची परवड मांडताना देवा दादा लिहितात,

‘उन्हानं रापलेल्या अन कुसळांनी माखलेल्या पडीक जमिनीत
मायकल शुमाकरनं जर धरला असता त्याचा वेगवान नांगर
तर त्यालाही कदाचित कळलं असतं
फाशीसाठी दोरसुद्धा
उसना का आणावा लागतो
ह्याचा नंबरवन फॉर्म्युला’

या पहिल्याच कवितेत आलेल्या आर्थिक विषमतेचे अन सामाजिक विसंगतीचे वास्तव वाचकाला भानावर आणते.

पानं , फुलं , स्वप्नं , प्रेम , आदर्शवाद या सगळया विषयांपासून त्यांची कविता कोसो दुर आहे . त्यांच्या कवितेत स्वप्नाळू चंद्र , तारे कधीच येत नाहीत उलट उन्हातानात घामेजलेली आणी रोजच्या जगण्याच्या संघर्षात पिचलेली स्त्रीची व्यथा येते. त्यांची लेखणी स्वप्नरंजन करणारी नाही , गोड , मधुर रस निर्माण करणारी नाही तर स्वप्नाळू काव्य रंजनाला वास्तवाचा आरसा दाखवणारी आहे. दुर्बलाच्या जगण्याला या स्वप्नं रंजन करणाऱ्या दुनियेपुढे बेडर पणे मांडणारी आहे . त्यांच्या या बेडर आणि धारदार शब्दांच्या वेगवान माऱ्या पुढे सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या सुसंस्कृत शहरी मेंदुंना झिण्याझिण्या आल्याशिवाय राहत नाहीत .

देवा दादाच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे काव्य समाजातील विसंगती वरं अचूक बोट ठेवत उपहासात्मक शैलीत आशय विकसित करत जाते. यातूनही आणखीन महत्वाचा विशेष म्हणजे हे करतांना त्यांच्या या शैलीत ते वाचकाला सहज सामावून घेतात अन त्यांच्या पुढे प्रश्न उभे करतात. वाचकाला प्रश्न करत त्याच्या विवेकाला जागं करण्याचा महत्वाचा आणि लक्षणीय गुण त्यांच्या कवितेत आढळतो.

 

हे ही वाचादोन संग्रह : मुखवटा उतरवल्यावर आणि बाईपणातून बाहेर पडताना

 

त्यांच्या काव्यातून अभिव्यक्त झालेला सामाजिक प्रश्नांचा आंतरिक उमाळा हा केवळ सामाजिक भान दाखवण्याकरीता आलेला नाही . भेदातून ,विषमतेतून निर्माण झालेल्या पिचलेल्या, गांजलेल्या माणसांच्या वेदना हाच कवितेचा केंद्रबिंदू ठरतो. सातत्याने त्यांची कविता या सामाजिक वास्तवाला भिडत राहते .

हे करत असताना त्यांची कविता फक्तं वरवरचे घाव घालून थांबत नाही तर खोलवर रुजलेल्या – प्रस्थापितांना, स्वार्थी , निगरगठ्ठ व्यवस्थेला आणि सामाजिक विसंगतीला मुळापासून ओढून काढते. नुसता चटका नाही तर जाळ लावणाऱ्या त्यांच्या काव्यात वास्तवाचा अंगार असा काही फुललेला असतो की बोटचेपी भूमिका घेणाऱ्या , सुरक्षित आयुष्य जगत असणाऱ्या पांढरपेशा समाजाला सभ्यतेचे , सुसंस्कृततेचे सगळे मुखवटे उतरवून उघडं नागडं सत्य पाहायला हे शब्द भाग पाडतात. लोकांना सामाजिक वास्तवाचे भान यावे , त्यांच्यातील माणूसपण जागे व्हावे या हेतूनेच त्यांची प्रत्येक कविता लिहिलेली असते .

खरं तर व्यवस्थेने केलेल्या अन्यायाला अन तीव्र संघर्षाला सामोरे गेल्या नंतर एखादा संवेदनशील कवी काव्यातून तीं वेदना व्यक्त करतो तेव्हां तो उपरोधिक होता होता कधी कधी निराशही होतों.म्हणूनच आधुनिक काळातील वास्तववादी कवितेला समीक्षक वैफल्यवादी आणि आशावादी या दोन प्रवाहात ढोबळमानाने विभागतात .

देवा दादांची कविता मात्र उपरोधिक असली तरी निराशेचा सूर आळवत नाही. निराश होवून हातात काठी घेऊन ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ असं ती म्हणत नाही तर संघर्षात पिचून गेलेल्या माणसांच्या वेदनेची, त्याच्या दुःखाची थोडी तरी जाणीव बथ्थड झालेल्या या व्यवस्थेला व्हावी आणि झोपी गेलेल्या , आत्ममग्न असलेल्या, सुखवस्तू घटकाला जरा जाग यावी यासाठी हे सगळं उलथवून टाकलं पाहिजे अश्या बंडखोर शब्दांचा आसूड देवा दादां हातात घेतात. यांत कुठेही निराशा नाही तर अपेक्षा आहे की काहीतरी चांगला बदल घडेल.

त्यांची कविता आईने मारलेल्या चापटी सारखी आहे जिच्या मधे संताप आहे पण तो स्वतःच्या लेकराला सुधारण्यासाठी आहे, त्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे, तो संताप विध्वंसक नाही.

देवा दादाच्या कवितेचे आणखीन एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काव्यात नेमकेपणाने आलेल्या आणि ग्रामीण जीवनात रोज वापरात असलेल्या बोलीभाषेतील अचूक शब्द प्रतिमा. या शब्दप्रतिमां एवढ्या चपखलतेने कवितेत येतांत की त्या प्रतिमांमुळे त्यांच्या काव्याचे अवकाश अर्थाच्या दृष्टीने कमालीचे व्यापक होते , गहिरे होते. या सगळया शब्द प्रतिमा साध्या दैनंदिन जीवनातील असल्या तरी त्या खूपच अनपेक्षित असतात. अश्या दृष्टीने कधी त्यांचा विचारसुध्दा केलेला नसल्याने वरवर साध्या वाटल्या तरी आशय ठसवण्यात त्या कमालीच्या परिणामकारक ठरतात.

इथे दुसरी प्रतिमां बसूच शकत नाही असे वाटण्या एवढ्या त्या आशयाच्या दृष्टीने पूरक अन बिनचूक असतात. या प्रतिमांची आशयसूत्र विकसित करत व्यक्त करण्याची ताकद एवढी अफाट आहे की या शब्द प्रतिमाच देवा दादाच्या काव्याचे मर्म होतात.
या शब्द प्रतिमांमधून कवी ज्या विसंगती वरं बोटं ठेवतो आहे ज्या वेदनेला मांडतो आहे ते मांडताना तो स्वतःही अलिप्त नाही अन वाचकालाही अलिप्त राहू देत नाही. ‘मनगटाशी इमान राखणारी बांगडी’, ‘चुंभळ’, ‘म्याकडोनाल्ड जातीच्या जीभा’,
‘वयात आलेल्या पोरी-बोरी’ , तसेच जागतिकीकरण -‘अगतिकीकरण’ , ‘चिंचा’, अश्या विविध प्रतिमांमधून त्यांच्या कविता वाचकाच्या मनावर खोलवर परिणाम करतात.

‘दौरा ‘या कवितेतील दोनच ओळी वाचल्या तर याची कल्पना येते

‘दुष्काळाच नखुडं झालेल्या
बोटावर शाई चोळायला भाग पाडणाऱया
अन दौऱ्यांत मश्गुल लाल दिव्यांना
एखाद्या तरी देशातल्या पुस्तकात दिसोत
आत्महत्येनंतर मागे राहिलेल्या
पाखरांच्या डोळ्यांतून ओघळणारे
भारतीय अश्रू…
चुकूनमाकून…
एखादा शब्द जरी आला तुमच्या तोंडातून
मातीत उगवून मातीतच मरणाऱ्या पिकांसाठी
तरी बांधावर दौरा केल्यासारखं वाटेल’

या ओळी वाचल्यानंतर त्यातली ‘नखुडं’ ही प्रतिमां एवढी परिणामकारक आहे की अश्या नखुडं झालेल्या बोटावर शाई चोळनारी व्यवस्था ,यातली वेदना वाचकाच्या मनात सतत ठसठसत राहते झोंबत राहते. ठणका मारत राहणारी नस अचूक पकडल्यानंतर जसे होते तसे देवा दादाच्या या शब्द प्रतिमांचा परिणाम होतों.

‘ चुंभळ ‘या कवितेत आलेली चुंभळ ही प्रतिमा सुद्धा अत्यंत सोपी ,सरळ आहे . वर्षानुवर्ष होणाऱ्या शोषणाचे अन् कष्टाचे ओझे पेलणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याला अत्यंत नेमकेपणाने या प्रतिमेद्वारे व्यक्त केले आहे आणि त्यामूळे होत असलेला गहिरा परिणाम या काव्यात ताकदीने दिसतो .

 

हेही वाचाजमिनीखालच्या माणसांच्या जमिनीवरच्या गोष्टी

 

संघर्षमय आयुष्यातली वेदना स्वतः अनुभवताना देवा दादांचे संवेदनशील मन इथल्या व्यवस्थेचे सगळे कंगोरे अगदी बारकाईने तपासत आहे, हे सगळे ते कोवळ्या वयात असल्यापासून टिपत आले आहेत़. या स्व:अनुभूतीच्या वेदनेतूनच देवादादांची कविता निपजलेली असली तरी ती कधीच फक्तं वैयक्तिक होवून राहत नाही. त्यांच्या कवितेत फक्तं त्यांच्या दुःखाची मांडणी किंवा त्याचा प्रचारकी वापर नाही तर त्या दुःखाचा शोध सुद्धा त्यात आहे. त्यामुळेच त्यांनी लिहिलेले उपहासात्मक शब्दरुप हे फक्तं त्यांचे न राहता समूहाचे होते आणि म्हणूनच त्यांची कविता स्व:अनुभवापासून विस्तारत गावागाड्यातील स्त्रियांचा, शोषण होत असलेल्यां सगळ्या घटकांचा, विषमतेचा, जागतिकीकरणामुळे विस्कळीत होवून सर्वस्व हरवत शहरांकडे येणाऱ्या दिशाहीन लोंढ्यांचा सामूहिक आवाज होते. यांत आलेल्या स्त्रियांचे दुखः पराकोटीचे असले तरी जीवन जगण्याची लढाई त्या एक हाती लढतात .

भुंड्या हातांनी या कवितेत,

‘पृथ्वीच्या अंतापर्यंत होत राहतील
नांगराच्या आत्महत्या
पण करते का कधी माती आत्महत्या?
कारणं तीला चालावायचा असतो
त्याने नाईलाजाने त्यागलेला
चिमण्या पाखरांचा संसार’

यातच शेवटी ते लिहितात,

‘नांगरत राहते त्याच्यादेखत
स्वतःचा उर
अन सावरत राहते त्याच्या स्वप्नातलं शिवार
तिच्या भुंड्या हातांनी’

नांगरत राहते स्वतःचा उर हे वाचतांना कष्टकरी स्त्रियांची चिवट झुंझ, परिस्थितीवर मात करण्याची ताकद आणि तिचे रितेपण एकाच वेळी मनात रुतत राहते .

देवा दादाची आई उमेद न हारता प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध वाघासारखं लढत राहिली. वडीलांचा अकस्मात मृत्यु आणी त्यानंतरची आईची आणि देवा दादाची रोजचे जीवन जगण्याची लढाई त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आपल्या काव्यातून मांडली आहे .

अर्धी शिळी भाकरी खाऊन झोपणाऱ्या आणी दिवसभर भाकरीसाठी गुरांसारखं राबणाऱ्या आईच्या कष्टकरी हातांची वेदना वाचताना अनेकदा आपल्या काळजाला घरं पडतात .

‘तरण्याबांड देवा’ या कवितेत
आईच्या या कष्टाबद्दल ते लिहितात,

ओढायची बारा परसाच पाणी
अन भरायची रांजण दोन रुपयांसाठी लोकांचे

या संपूर्ण कवितेत आईचे बेसुमार कष्ट तर आलेच आहेत़ पण आता परिस्थिती सुधारली तरी आईला म्हातारपण आल्याने झिजलेल्या देहाला काहीही सहन होत नाही. तीला होणाऱ्या शारीरिक वेदनेचा ताप सहन न होवून कवी देवालाच उपरोधाने ‘तरण्याबांड देवा’ माझ्या आईला का म्हातारे केलेस असा प्रश्न विचारतात.

परंतु परिस्थितीने कितीही झोडपले तरी स्वाभिमानाला अन विवेकाला मात्र सातत्याने जागं ठेवत , देवा दादाच्या आईने त्यांना डोळ्यात तेल घालूंन वाढवले . एक पेन्सिल चोरली म्हणून तीं त्यांना कोंडून मारते कारण तीं स्वाभिमानी आई होती. नैतिकतेचे अन सुसंस्कृततेचे क्लास तीला मुद्दाम लावावे लागले नव्हते. माणुसकी अन् विवेकी विचार तिच्यात उपजत होता. म्हणूनच तर देवा दादाला अस्सल माणूस म्हणून या मायच्या हातांनी घडवले आहे. देवा दादाचे आई सोबतचे नाते एवढे घट्ट आहे की त्यांच्या श्वासांश्वासांत आई आहे. तिच्या डोंगरा एवढ्या कष्टाची कविता सादर करताना प्रत्येक वेळी त्यांचा गळाभरून येतो अन श्रोत्यांचे मन ही हृद्य होते.

देवा दादाच्या कवितांचा संग्रह आत्ता प्रकाशित होतो आहे आणि हे पहायला ‘माय’ मात्र नाही पण असंख्य डोळ्यांनी ,अभिमानाने आणि कौतुकाने तीं नक्कीच पाहते आहे आणि सुरकुतलेल्या हातांनी त्यांच्या गालावरून हात फिरवत आहे …

देवा दादाच्या कवितेने जसे माझे समाजिक वास्तवाचे भान व्यापक केले तसेच या संग्रहातील कविता वाचल्यानंतर, संवेदनशील वाचकांच्या मनात उपेक्षित ,कष्टकरी ,शेती मातीशी निगडीत असलेल्यां समाजघटकांच्या वेदनेची अन् विषमतेची जाणीव मोठ्या प्रमाणात वाढेल याची मला खात्री आहे. या शोषित अन्याय्य व्यवस्थेला उलथवून टाकण्यासाठी लागणारे बळ या कवीता सगळ्यां वाचकांमधे नक्कीच पेरतील .

देवा दादांचे व माझे नाते शब्दांनी अन् कवितेने अतूट जोडलेले आहे. मनातील अस्वस्थ धागा आम्हांला आपोआप एका अश्या समान पातळीवर घेऊन येतो की त्यांच्या सृजनतेतून निर्मिलेले एखादे काव्य ऐकवण्यासाठी देवादादाचा फोन येतो तेव्हां एकापेक्षा एक कविता ऐकत किती वेळ जातो कळतही नाही. काव्याच्या अनुषंगाने आमच्या अनेक गोष्टींवर चर्चा होतात . त्यांच्या काव्य उर्मींची प्रेरणा समजून घेता घेता, त्याची खोलवर गेलेली मुळं शोधता शोधता त्या सृजन तत्वाचा छोटासा कण माझ्या वाट्याला येतो अन् मला समृद्ध करून जातो.

खरोखरच सगळं उलथंपालथं करण्याची क्षमता त्यांच्या कवितेत आहे. परंतु ही शब्दांची काठी कोणाला विनाकारण झोडपून काढण्याकरीता नाही तर विवेकी बंडाची मशाल पेटवत उलथापालथ करून सकारात्मक बदल करण्या करीता आहे. समाजाला मानवतेकडे घेऊन जाण्यासाठी पुन्हा उभा करणारी आहे.

असे हे भेदक सामाजिक काव्य लिहिणारे देवा दादा एक टोकाचे संवेदनशील , हळवे मन जपणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीत त्यांच्या काव्यातील विचार प्रत्यक्षात उतरलेला दिसतो. ग्रामीण जीवनात असलेले टोकाचे कष्ट , दारिद्र्य , विवंचना , दुःख हे सगळे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात भोगले आणी आईच्या कष्टाचे पांग फेडत आज एक सुशिक्षित यशस्वी व्यक्ती म्हणून , कवी म्हणून नाव कमावले पण या सगळया यशाबरोबर महत्वाचे आहे ते त्यांचे माणूसपण आणी संवेदनशीलता जी त्यांनी या मुखवट्यांच्या गर्दीत कधीच हरवली नाही .

प्रतिकूल परिस्थिती सोबत लढताना त्यांनी आईला भोगाव्या लागणाऱ्या वेदनेसाठी देवा सोबत भांडण केले परंतु मनात वागण्यात कुठेही त्या वेदनेचा , परिस्थितीचा कडवट पणा किंवा किल्मिश येवू दिले नाही . अश्या या अन्याय्य व्यवस्थेला उलथवून टाकण्यासाठी लेखणीतून बंड करत राहणाऱ्या माझ्या प्रतिभावंत बंधूचा काव्यसंग्रह “सगळं उलथवून टाकलं पाहिजे ” रसिक वाचक नक्की वाचतील आणि त्यांच्या कवितेला आणखीन बळ देतील याची खात्री आहे.

मुल्यहीन समाज व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत असताना ‘ सगळं उलथवून टाकलं पाहिजे ‘सारखे साहित्य जेव्हा प्रकाशित होते तेव्हां त्याचे महत्व समाज घटकातील मूल्यांवरं विश्वास असणाऱ्यांसाठी मोलाचे बळ देणारे असते.

अशी वास्तव कविता जेव्हा निर्धोकपणे लिहिली जाते तेव्हां सगळंच अजून संपलं नाही ,चहूं बाजूने अंधार दाटला असला तरी असा उजेड पेरणाऱ्या पणत्या नक्कीच क्रांतीची मशाल पेटवतील याबद्दल विश्वास वाटतं राहतो. नव्वदी नंतरच्या साहित्यात वास्तववादी काव्याचे भरण पोषण करण्यासाठी देवा दादांचा काव्य संग्रह नक्कीच पौष्टिक खुराक देणारा अन साहित्य क्षेत्रात मोलाची भर घालणारा ठरेल. चुकीच्या धारणांना विलग करत जाणिवांना सजग करणाऱ्या निर्मितीचे त्यामुळेच मनापासून स्वागत करायला हवे .

कवी देवा झिंजाड, हर्मिसचे सुशील धसकटे सर यांचे मनापासून अभिनंदन व आभार. सुशील धसकटे ह्यांच्यासारख्या तत्वांशी प्रामाणिक राहून अतिशय जबाबदारीने पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या माणसाने देवा दादांच्या कवितेला न्याय देताना ‘एकही रुपया’ न घेता पुस्तक छापलं. सुशीलदांच्या ह्या कृतीतून हेच अधोरेखित झालं की अजूनही चांगल्या साहित्याच्या पाठीशी प्रकाशक उभे राहतात. हे उत्साह वाढवणार आहे. आशादायी आहे.

काव्यसंग्रहाला अनेक अनेक शुभेच्छा!

पुस्तकासाठी संपर्क: 9890697098, 7249008824

 

डॉ सुवर्णसंध्या धुमाळ जगताप

(बारामती)

पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या. अभ्यासू व्यक्तिमत्त्व. हजारों पुस्तकांचं वाचनालय बाळगणाऱ्या वाचक. आ ह साळुंखे यांच्या विचारांच्या पाईक. 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!