बहुजन महाराष्ट्राच्या विकासाचं चाक असलेली एसटी ताबडतोब सुरू करा : एसटी वाचवा एसटी वाढवा कृती समितीची मागणी

बहुजन महाराष्ट्राच्या विकासाचं चाक असलेली एसटी ताबडतोब सुरू करा : एसटी वाचवा एसटी वाढवा कृती समितीची मागणी

बहुजन महाराष्ट्राच्या विकासाचं चाक असलेली एसटी ताबडतोब सुरू करा : एसटी वाचवा एसटी वाढवा कृती समितीची मागणी

आज सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी मंत्रालयासमोर मुलींचं धरणं आंदोलन


तालुक्यात असलेल्या शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी चाललेली मुलगी, शहराकडे असलेल्या कंपनीत रोजगारासाठी निघालेला तरुण, वीस किलोमीटर अंतरावरच्या मोठ्या गावातील आठवडी बाजाराला निघालेली गृहिणी, शेतीचं बी-बियाणं, खतं आणायला निघालेला शेतकरी, या सर्वांना घेऊन जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरच्या शेजारी जिल्ह्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना गावाकडून पाठवलेले डबे हे चित्र सध्या स्तब्ध झालं आहे. कारण या चित्राला गतिमान करणारी एसटी गेले चार महिने बंद आहे .यामुळे बहुजन महाराष्ट्राचा विकास थांबला आहे .या विकासाचं चक्र पुन्हा गतिमान करावं आणि त्यासाठी ताबडतोब एसटी सुरू करावी ही भूमिका आणि मागणी एसटी वाचवा एसटी वाढवा समितीच्या बैठकीत एकमताने करण्यात आली.

ही मागणी कृतीत उतरवण्यासाठी आज गुरुवारी दहा मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी मंत्रालयासमोर जनता दल धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र कचेरी एलआयसी मुख्यालयासमोर ( मंत्रालय जवळ ) येथे शाळकरी मुलींसह राज्यभरातील कार्यकर्ते, शिक्षक-प्राध्यापक निवृत्त अधिकारी ज्येष्ठ नागरिक आदी सकाळी ११ पासून धरणं आंदोलन करणार आहेत.

गोरगरीब बहुजन समाजातील मुला-मुलींचं शिक्षण आणि ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या विकासात महत्वाचा वाटा असणारी 'लालपरी' सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील विविध संघटनांनी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात ११ मार्च रोजी मुंबईत आंदोलनाने होईल.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या झालेल्या विकासात एसटीचं भरीव योगदान आहे. महाराष्ट्रात एसटी नसती तर पुरोगामी प्रगतीशील महाराष्ट्राचं आजचं चित्र दिसलं नसतं,असं ठामपणे म्हणता येईल इतकं एसटीचं त्यात योगदान आहे. शिक्षण गोरगरिबांना मिळण्यात एसटीचा खूप मोठा वाटा आहे. एसटी नसती तर आज ग्रामीण भागातील जे लोक शिक्षण घेऊन मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, ते तिथे पाहचू शकले नसते. म्हणून बहुजन समाजाच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी एसटी सुरू होणं, अत्यंत गरजेचं आहे. एसटी बंद, तर मुलींचे शिक्षण बंद, अशी परिस्थिती अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांत आली आहे.

नोकरी, व्यवसाय, रोजंदारी, शेतीमाल विक्रीसाठी रोज शहरांत ये-जा करून, आपलं कुटुंब जगविणाऱ्या ग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांना खुप अडचणीचंं ठरत आहे. विकासामध्ये प्रवास करणं महत्त्वाचं ठरलं आहे. हा प्रवासच सध्या ठप्प झाला आहे आणि अगदीच आवश्यकता पडली तर या प्रवासासाठी ग्रामीण जनतेला अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत. महिलांचा रोजगार सुटला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबं आर्थिक अडचणीत फेकली गेली आहेत. म्हणून भारतामध्ये मुलींचं शिक्षण सुरू करणाऱ्या सावित्रीबाईंचा स्मृतीदिन यावेळी एसटी सुरू करण्याचा आग्रह धरुन पाळण्यात येईल.

मान्यवरांचं पाठबळ

या सर्व परिस्थितीचा विचार करून सरकारने एसटी सुरू करावी, अशी मागणी मोहिम सुरू झाली आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, कलाकार, लेखक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, निवृत्त अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य अशा सर्व स्तरातील मान्यवरांच्या सह्यांची निवेदनं राज्य सरकारला पाठविली जाणार आहेत.

खाजगीकरणाला विरोध

एसटी वाचली पाहिजे, त्यासाठी एसटी वाढली पाहिजे. जर एसटी वाचवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत एसटीचं खाजगीकरण होता काम नये, अशी भूमिका या मोहिमेची आहे.

खाजगीकरणामुळे ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण बंद पडेल, खेडोपाड्या-वाडीवस्त्यांची वाहतूक बंद झाली आहे, गरिबांचा प्रवास महागलंय, लोकांच्या हक्काची एसटी कुण्या भांडवलदारांची खाजगी मालकी होणार, हे आम्हाला मान्य नाही, म्हणून आमचा एसटीच्या खाजगीकरणाला विरोध असेल, अशी कृती समितीची भूमिका आहे.

एसटी कामगारांचं आंदोलन सध्या सुरू आहे. त्यांना विनाअट कामावर घेण्याची तयारी सरकारने दाखवावी. कामगारांनीही एसटीचं शासनात विलीनीकरणाची मागणी सूर तुटो वा पारंबी अशी निर्णायकी करू नये. या मागणीसाठी समिती त्यांच्या बरोबर असेल. त्यासाठी सनदशीर मार्गाने पुढील काळातील प्रयत्न करता येतील, करावेत. मात्र सध्या वरील परिस्थिती लक्षात घेता तातडीने कामावर येऊन एसटी सुरू करावी, असं आवाहनही कामगारांना समिती करत आहे.

शासनानेही कोणताही आकस न ठेवता आणि कसलीही शिस्तभंगाची कारवाई न करता कामगारांना कामावर ताबडतोब येऊ द्यावंं, असंं शासनाला समितीचे आवाहन आहे.

समितीतील अनेक नेते कार्यकर्ते एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी आणि प्रश्ना बरोबर कालही त्यांच्याबरोबर होते, उद्याही असतील.

एसटी कामगारांच्या विश्रांती गृह, स्वच्छतागृहाच्या प्रश्नापासून, आठ तासांपेक्षा जास्त तास काम करण्याच्या व्यवस्थेच्या प्रश्नांपासून ते शासनाला द्याव्या लागणाऱ्या वाहतूक कर टोल प्रश्नापर्यंत अनेक विषय या पुढील काळात आपण संयुक्तपणे मार्गी लावू, असं कामगारांना समिती ठामपणे सांगू इच्छिते. हा लढा एसटी सुरू करण्याचा जसा असेल, तसा तो एसटी वाचविण्याचा, एसटी वाढविण्याचा व ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा लढा आहे, अशी भूमिका कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार, सुभाष लोमटे, प्रभाकर नारकर आणि धनाजी गुरव यांनी मांडली आहे.

संपर्क क्रमांक : 9270432153 | 94222 02203 | 9422616531 | 9820507342

आंदोलनाचे निमंत्रक धनाजी गुरव यांची भूमिका ऐकण्यासाठी क्लिक करा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!